यतिवृषभ : (इ. स. पाचवे, सहावे शतक). एक थोर दिगंबर जैन ग्रंथकार. ह्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती मिळत नाही. इ. स. ४७८ ते ६०९ च्या दरम्यान तो केव्हा तरी होऊन गेला असावा. अलीकडील संशोधनानुसार तो सातव्या शतकात होवून गेला असावा असे सांगितले जाते. यतिवृषभाचे तीन ग्रंथ आहेत : (१) तिलोयपण्णत्ति हा जैन शौरसेनीत लिहिलेला, ८,००० श्लोकांचा भूगोल–खगोलविषयक प्राकृत ग्रंथ (२) गुणधरकृत कसायपाहुडावरील ६,००० श्लोकांची प्राकृत चूर्णी किंवा टीका आणि (३) षट्करणस्वरूपप्रमाण. ह्या तीन ग्रंथांपैकी तिलोयपण्णत्ति हा प्रसिद्ध झालेला असून कसायपाहुडावरील चूर्णी वीरसेन जिनसेन ह्या गुरुशिष्यांनी आपल्या जयधवला नामक प्राकृत टीका ग्रंथात अंतर्भूत केली आहे.जयधवला टीकेतील सूचनेनुसार आचार्य यातिवृषभ यांनी आर्यमंक्षु आणि नागहस्ती यांच्याकडून कसायपाहुडाच्या कथांचा अभ्यास करुन अर्थ निश्चित केला आणि कसायपाहुडावर चूर्णिसूत्रांची रचना केली. दिगंबर संप्रदायातील चूर्णिसुत्रांचे पहिले लेखक असल्यामुळे यतिवृषभ आचार्यांना मोठे महत्त्व आहे. षट्करणप्रमाण हा ग्रंथ अनुपलब्ध आहे. यतिवृषभाने स्वतःच्या नावाचा किंवा गुरुपरंपरेचा प्रत्यक्ष उल्लेख कोठेही केलेला नाही. तो उमास्वातीचा शिष्य आणि समंतभद्राचा गुरू होता असे मानतात.
संदर्भ :
- http://hi.encyclopediaofjainism.com/index.php
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.