नॉर्वेतील सर्वांत मोठे आणि चौथ्या क्रमांकाचे खोल सरोवर. नॉर्वेच्या आग्नेय भागात, ऑस्लो या देशाच्या राजधानीपासून उत्तरेस ५६ किमी. वर हे सरोवर आहे. हे लांबट आणि अरुंद आकाराचे सरोवर आहे. सरोवराची कमाल लांबी १०० किमी., रुंदी १.६ ते १४ किमी, कमाल खोली ४४९ मी. आणि क्षेत्रफळ ३६८ चौ. किमी. आहे. सामान्यपणे वायव्य-आग्नेय दिशेत हे सरोवर विस्तारलेले आहे. येथील गुडब्रान्डसडाल खोर्‍यात हे हिमानी क्रियेतून निर्माण झालेले असून ते वैशिष्ट्यपूर्ण इंग्रजी ‘Y’ (वाय्) आकाराचे आहे. त्यातील उजवीकडील फाट्यापेक्षा डावीकडील फाटा बराच लांब आहे.

सरोवराला उत्तरेकडून लॅगन नदी मिळत असून दक्षिण भागात ती व्होर्मा या नावाने बाहेर पडून पुढे ग्लॉमा या नदीला मिळते. सरोवराच्या साधारण मध्यात हेलगामा बेट आहे. सरोवराच्या उत्तर टोकाशी लिल्लहामर, दक्षिण टोकाशी मिनेसूंद, पूर्व किनार्‍याच्या साधारण मध्यावर हामार, तर त्याच्याचबरोबर समोर पश्चिम काठावर यव्हिक ही प्रमुख शहरे आहेत. ही शहरे उद्योग, व्यापार आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. सरोवराच्या पश्चिमेस स्क्रेफजेल पर्वतश्रेणी, तर पूर्वेस हामार पर्वतश्रेणी आहे. असे असले, तरी सरोवरालगतचा प्रदेश मंद उताराचा आणि सुपीक असून कृषीक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. सरोवराला

सरोवराच्या काठावरील लिल्लहामर शहर

पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व असून त्यात नौकाविहार आणि हौसी मासेमारी या सुविधा उपलब्ध आहेत. पूर्वी हा सरोवर एक महत्त्वपूर्ण वाहतुकीचा मार्ग होता; मात्र सरोवर परिसरातून गेलेल्या रेल्वेमार्गामुळे आज सरोवरातील रहदारी कमी झाली आहे.

१९७० च्या दशकात सरोवरात प्रचंड प्रमाणात शैवल वाढले होते. तसेच पाणी प्रदूषणही झाले होते; मात्र नंतर तेथील शासनाकडून त्यादृष्टीने वेगवेगळ्या योजना हाती घेण्यात येऊन १९८० पर्यंत त्या पूर्णही केल्या. त्यामध्ये प्रक्रिया न केलेले वाहितमल सरोवरात सोडण्यावर निर्बंध घालण्यात आले. सरोवराला मिळणारे प्रवाह आणि नदीतील पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा केल्या आणि सरोवरात पोहण्यास मज्जाव करण्यात आला. पोप ॲड्रीअन चौथे यांच्या काळात सरोवराच्या पूर्व किनार्‍यावरील हामार शहराच्या उत्तरेस बाराव्या शतकात बांधलेल्या कॅथीड्रलचे अवशेष आढळतात. येथे बर्फावरून घसरण्याचे स्कीईंग व स्केटिंग हे लोकप्रिय खेळ उन्हाळा आणि हिवाळा या दोनही ऋतूत खेळले जातात.

 

समीक्षक : वसंत चौधरी