इटलीतील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे सरोवर. यास ‘लॅरीओ सरोवर’ असेही म्हणतात. उत्तर इटलीतील लाँबर्डी प्रांतात सस.पासून १९९ मी. उंचीवर, आल्प्स पर्वताच्या दक्षिणेकडील पायथ्याशी चुनखडक आणि कणाश्मयुक्त (ग्रॅनाइट) पर्वत श्रेणीने वेढलेल्या एका खळग्यात, हिमानी क्रियेतून या सरोवराची निर्मिती झाली आहे. या सरोवराच्या किनाऱ्यालगत असलेल्या पर्वतातील माँते लेन्यॉने (२,६१० मी.) हे सर्वोच्च शिखर आहे. सरोवराची कमाल लांबी सु. ४७ किमी., कमाल रुंदी ४.४ किमी., क्षेत्रफळ १४६ चौ. किमी., सरासरी खोली १५४ मी., तर कमाल खोली ४१४ मी. आणि किनार्‍याची लांबी १६० किमी. आहे. यूरोपातील सर्वांत खोल सरोवरांपैकी हे एक आहे. सरोवराच्या काठावरील कॉमो (कॉमूम) शहरावरून सरोवराला कॉमो हे नाव पडले आहे.

कॉमो सरोवराचा आकार उलट्या इंग्रजी ‘वाय’ अक्षरासारखा असून त्याच्या तिन्ही फाट्यांची लांबी सर्वसाधारणपणे सारखी म्हणजे प्रत्येकी सुमारे २६ किमी. आहे. त्यांपैकी उत्तरेकडील फाटा कॉलिकॉ शहराच्या पुढे गेला असल्यामुळे त्याला कॉलिकॉ सरोवर म्हणून ओळखले जाते; तर आग्नेयेकडील फाटा लेको शहराच्या पुढे गेला असल्यामुळे त्यास लेको सरोवर या नावाने ओळखले जाते. नैर्ऋत्येकडील तिसरा फाटा कॉमो शहरापर्यंत गेला असून तेथेच सरोवराचे अखेरचे टोक संपते. हा फाटा कॉमो सरोवर या नावाने ओळखला जातो. आद्दा नदी ही या सरोवराला पाणीपुरवठा करणारी प्रमुख नदी आहे. उत्तर टोकाशी असलेल्या कॉलिकॉ शहराजवळ ती सरोवराला मिळते, तर आग्नेय फाट्यावरील लेको शहराजवळ ती सरोवरातून बाहेर पडते. प्रत्यक्षात कॉमो सरोवर हे आद्दा नदीचा नैसर्गिक रीत्या रुंदीकरण झालेला भाग आहे. याशिवाय इतरही अनेक नद्या आणि पर्वतीय प्रवाहांद्वारे सरोवराला पाणीपुरवठा होतो. त्यांपैकी मेरा नदी महत्त्वाची असून ती उत्तर टोकाशी सरोवराला मिळते. सरोवराचा उत्तर फाटा एके काळी क्याव्हेन्नापर्यंत पसरला होता. सध्या हा भाग मेझोला सरोवराने वेढलेला आहे. दक्षिणेकडील दोन्ही फाट्यांदरम्यान असलेला पर्वतीय प्रदेश लॉरिअन ट्रँगल किंवा ट्रँगोलो लॅरिआनो या नावाने ओळखला जात असून लँब्रॉ नदीचा उगम येथेच होतो. येथील अधिक उंचीच्या पर्वतीय प्रदेशात हिमवृष्टी होत असते. सरोवरपरिसरात मे महिन्यात सर्वाधिक, तर हिवाळ्यात सर्वांत कमी पर्जन्यवृष्टी होते. ऋतूनुसार सरोवरातील पाण्याच्या पातळीत चढउतार होत असतात. कॉमो सरोवर तुलनेने उबदार पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्याच्या मध्यातही सरोवरातील पाण्याचे तापमान ५० ते ७० सेल्सि. असते. सरोवराचे तिन्ही फाटे जेथे एकत्र येतात, तेथील पश्चिम किनार्‍यावर मेनाजिओ आणि ट्रेमेत्सॉ नगरे, पूर्व किनार्‍यावर बेलानॉ, तर आग्नेय व नैर्ऋत्य फाट्यांच्या दुबेळक्यात बेलाज्या अशी प्रमुख नगरे वसली आहेत. नैर्ऋत्य फाट्याच्या शिरोभागी वसलेले प्रसिद्ध कॉमो शहर औद्योगिक केंद्र असून तेथील बंदर हे स्वित्झर्लंडकडून येणार्‍या रस्ते व लोहमार्गांचे प्रवेशद्वार मानले जाते. पूर्वीपासून ते रेशीमविणकाम व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. चौदाव्या शतकातील संगमरवरातील सुंदर कॅथीड्रल, तसेच १२१५ मध्ये बांधून पूर्ण झालेला टाउन हॉल (ब्रॉलेतो) येथे आहे. आग्नेय फाट्याच्या शिरोभागी वसलेले लेको शहरही निर्मिती उद्योगांचे प्रमुख केंद्र आहे.

कॉमो सरोवरपरिसर म्हणजे युरोपातील सुंदर स्थळांपैकी एक आहे. सरोवरालगतच्या पर्वत उतारावर सॅक्रो माँटे दी ऑसूजिओ हे अभयारण्य आहे. रमणीय भूप्रदेश, हिरव्यागार दाट वनश्रीने आच्छादलेल्या सभोवतालच्या पर्वतश्रेण्या, त्यांतील वन्य जीव, आल्हाददायक हवामान, किनार्‍यावर ओळीने असलेले व्हिला, बगिचे, द्राक्षमळे, स्पा, सरोवरातील नौकाविहार व हौशी मासेमारीच्या सुविधा इत्यादींमुळे रोमन काळापासून हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विशेष प्रसिद्ध आहे. त्या वेळेपासून अमीरउमराव, धनवान व्यक्तींचे राजवाडे आणि घरे सरोवराच्या काठावर आहेत. धाकट्या प्लिनीने इ. स. पहिल्या शतकात या सरोवराच्या काठावर कॉमेडिआ आणि ट्रॅजेडिया हे दोन सुंदर व्हिला बांधले. चेरनॉब्यॉ येथील द ईस्ट व्हिला (इ. स. १५६८), ट्रेमेत्सॉ येथील कार्लोत्ता (१६९०), ईझॉला कॉमासिना येथील देल बाल्बी ॲनलो (१७८७), बेलाज्यॉ येथील मेल्झी द एरिल (१८०८ – १८१०) व सेर्बेलोनी (१९५९) हे प्रसिद्ध जुने व्हिला आहेत. यांशिवाय येथील कॉमो, लेको, मेनाजिओ, व्हारेन्ना, ऑल्मो, सेर्बेलोणी, कॅरोल्टा इत्यादी व्हिला, राजवाडे व व रिसॉर्ट विशेष प्रसिद्ध आहेत. कॉमो शहराला दरवर्षी असंख्य पर्यटक भेट देतात. किनार्‍यावरील नगरे अतिशय उत्तम आणि जलद अशा सार्वजनिक फेरी, आगबोट आणि मोटरशिप सेवेने एकमेकांशी जोडलेली आहेत.

युनेस्कोने २००३ मध्ये या परिसराचा समावेश जागतिक वारसास्थळांत केला आहे. येथील वातावरणाची तुलना भूमध्य समुद्रकिनार्‍यावरील रिव्हिएरा (Riviera) या जगप्रसिद्ध पर्यटन क्षेत्राशी केली जाते. सरोवरपरिसरातील सूक्ष्म हवामान, उत्कृष्ट पर्यावरण, किनार्‍यावरील ख्यातनाम व्हिलाज आणि गावांमुळे हफिंग्टन पोस्टने २०१४ मध्ये जगातील अतिशय सुंदर सरोवर म्हणून याचा उल्लेख केला आहे. कला आणि सांस्कृतिक दृष्ट्याही हा परिसर प्रसिद्ध आहे. या सरोवरपरिसरात अनेक प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटाचे चित्रिकरण झाले आहे आणि आजही होतात. प्रसिद्ध जलरंग कलाकार आणि ट्रिलॉजी (एकाच विषयावरील तीन साहित्यकृती)चे लेखक पॉल राईट यांचे या सरोवराच्या काठावरील ऑर्गेन्नो हे घर आणि कलामंदिर आहे. डॉल्स व गब्बाना या फॅशन कंपनीचे २०१८ चे फॅशन-प्रदर्शन या सरोवराच्या सान्निध्यात झाले होते.

सरोवराच्या परिसरातून मध, ऑलिव्ह तेल, चीझ, दूध, अंडी, सॅलामी ही उत्पादने मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. रेशमी किड्यांची जोपासना आणि रेशीमविणकाम हा या परिसरातील महत्त्वाचा व्यवसाय आहे. सरोवरात मत्स्यव्यवसायही चालतो; परंतु प्रदूषणामुळे त्यातील माशांची पैदास कमी झाली आहे.

इटलीचा हुकूमशहा बेनीतो मुसोलिनी स्वित्झर्लंडकडे पळून जात असताना सरोवराच्या अगदी उत्तर टोकाजवळ असलेल्या दाँग्गा येथे २८ एप्रिल १९४५ रोजी त्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले.

समीक्षक : वसंत चौधरी