कॅनडाच्या मध्य भागातील एक सरोवर. कॅनडाच्या सस्कॅचेवन आणि मॅनिटोबा या प्रांतांच्या उत्तरेकडील सरहद्दीदरम्यान हे सरोवर विस्तारलेले आहे. हे कॅनडातील नववे, तर सस्कॅचेवन प्रांतातील दुसऱ्याक्रमांकाचे मोठे सरोवर आहे. उत्तर कॅनडाच्या ओसाड प्रदेशात आढळणाऱ्या कॅरिबू (रेनडियर) या प्राण्यावरून या सरोवरास रेनडिअर हे नाव पडले आहे. सरोवराचे सुमारे ९२ टक्के क्षेत्र सस्कॅचेवन प्रांतात, तर उर्वरित फक्त ८ टक्के क्षेत्र मॅनिटोबा प्रांतात आहे. स. स. पासून ३३७ मी. उंचीवर असलेल्या या सरोवराचा आकार बराच अनियमित आहे. सरोवराची लांबी २४५ किमी., रुंदी ५६ किमी. आणि क्षेत्रफळ ६,६५० चौ. किमी. आहे.
सरोवराला अनेक प्रवाहांद्वारे पाणीपुरवठा होतो. दक्षिण भागातून बाहेर पडणार्या रेनडिअर नदीद्वारे सरोवरातील पाण्याचा विसर्ग होतो. या नदीत जाणार्या पाण्याचे नियमन व्हाइटसँड धरणाद्वारे केले जाते. रेनडिअर नदी दक्षिणेस ९६ किमी. वाहत जाऊन चर्चिल या मुख्य नदीला मिळते. चर्चिल नदी पुढे हडसन उपसागराला मिळते. सरोवराच्या परिसरात ब्लॅक स्प्रूस, व्हाइट स्प्रूस, जॅकपाइन इत्यादी वृक्षांची विरळ अरण्ये आढळतात. रेनडिअर सरोवरात कँब्रियन-पूर्व कालखंडातील काही ज्वालामुखीजन्य खडक आढळतात. सरोवरात अनेक बेटे आहेत. सरोवराचा किनारा बराच दंतुर आहे. सरोवरात व्यापारी तसेच हौसी मासेमारी चालते.
डेव्हिड टॉम्पसन यांनी १७९५ ते १७९७ या काळात सरोवराचे समन्वेषण केले. त्यानंतर अनेक समन्वेषकांनी या सरोवराचे समन्वेषण केले आहे. फर व्यापाराच्या काळात वाहतुकीसाठी हडसन्स बे कंपनीचे व्यापारी या सरोवराचा वापर करीत असत; परंतु येथील फर व्यापाराची ठाणी अल्पकालीन होती. त्यामुळे फर व्यापाराच्या दृष्टीने हे सरोवर विशेष महत्त्वाचे ठरले नव्हते. सरोवराच्या उत्तर किनार्यावरील ब्रोशेट (मॅनिटोबा), पूर्व किनार्यावरील किनूसाओ व दक्षिण किनार्यावरील साउथएन्ड (सस्कॅचेवन) ही असंघटित इंडियनांची प्रमुख वस्तीस्थाने आहेत.
समीक्षक : वसंत चौधरी