चार्ली कॉफमन : (१९ नोव्हेंबर १९५८).

अमेरिकन चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम पटकथाकार, निर्माता, दिग्दर्शक, नाटककार व गीतकार. त्याचा जन्म न्यूयॉर्क (अमेरिका) येथे झाला. चित्रपट, दूरचित्रवाणी व नाटक या तिन्ही क्षेत्रांत कॉफमन कार्यरत आहे.

कारकिर्दीचे प्रमुख टप्पे : १९९१ ते १९९७ या दरम्यान कॉफमन दूरचित्रवाणीवर कार्यरत होता. बीइंग जॉन मॅलकोव्हिच हा त्याने पटकथालेखन केलेला पहिला चित्रपट (१९९९). हा चित्रपट ७२ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट स्वतंत्र पटकथा, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन या विभागांत नामांकित झाला. त्याची पटकथा असलेल्या ह्यूमन नेचर (२००१) या चित्रपटाबद्दल समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या. अडॅप्टेशन (२००२) आणि कन्फेशन्स ऑफ अ डेंजरस माइंड (२००२) या त्याने लिहिलेल्या चित्रपटांचे समीक्षकांनी कौतुक केले. अडॅप्टेशन आणि त्याच्या आधीचा बीइंग जॉन मॅलकोव्हिच हे दोन्ही चित्रपट स्पाईक जोंझ याने दिग्दर्शित केले होते, तर जॉर्ज क्लूनी या सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्याने कन्फेशन्स ऑफ अ डेंजरस माइंडचे दिग्दर्शन केले होते व त्यात अभिनयदेखील केला होता. केट विन्स्लेट आणि जिम कॅरी यांची मुख्य भूमिका असलेला कॉफमनचा इटर्नल सनशाइन ऑफ दि स्पॉटलेस माइंड (२००४) हा सर्वाधिक चर्चित व पुरस्कारप्राप्त चित्रपट ठरला.

२००८ साली कॉफमन दिग्दर्शक झाला. त्याचा सिनेक्डॉकी न्यूयॉर्क हा चित्रपट प्रदर्शित झाला. अगोदर या चित्रपटाचे दिग्दर्शन स्पाईक जोंझ करणार, असे ठरले होते; तथापि काही कारणास्तव तो या चित्रपटापासून वेगळा झाला आणि कॉफमनवर दिग्दर्शन करण्याची जबाबदारी आली. तत्पूर्वी २००५ साली कॉफमनने आकाशवाणीसाठी दोन नाटके लिहिली होती. त्यांपैकी अनॉमलीसा हे नाटक स्टॉप मोशन ॲनिमेशन या चित्रपटाच्या रूपात प्रदर्शित झाले (२०१५). त्याने दिग्दर्शन केलेला त्याचा हा दुसरा चित्रपट. ड्यूक जॉन्सन हा या चित्रपटाचा सह-दिग्दर्शक होता. हा चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटासाठी कॉफमनला फार परिश्रम घ्यावे लागले. या चित्रपटाची निर्मिती ‘किकस्टार्टर’ या संकेतस्थळामार्फत जमलेल्या निधीतून (crowd funding) झाली.

शैलीचे वैशिष्ट्य : प्रसिद्ध समीक्षक रॉजर इबर्ट म्हणतो, “कॉफमनच्या चित्रपटांमध्ये मुख्य एकच विषय असतो; तो म्हणजे माणसाचे अंतर्मन आणि या अंतर्मनाच्या वस्तुस्थिती, भ्रम, इच्छा-आकांक्षा व स्वप्नांशी होणाऱ्या वाटाघाटी.” यासोबतच कॉफमनच्या चित्रपटांमध्ये उपरोधिक विनोदी शैलीदेखील दिसून येते. इबर्टच्या मते, कॉफमनने लिहिलेला व दिग्दर्शित केलेला सिनेक्डॉकी न्यूयॉर्क हा २०००–२०१० या दशकातला सर्वोत्तम चित्रपट आहे.

महत्त्वाचे चित्रपट : बीइंग जॉन मॅलकोव्हिच या वास्तववादी तरीही चमत्कृतिपूर्ण अशा वेगळ्याच चित्रपटामुळे कॉफमन हा समीक्षकांचा व काही निवडक प्रेक्षकांचा विशेष लाडका लेखक झाला. या चित्रपटातली पात्रे एका प्रसिद्ध नटाच्या मेंदूत प्रवेश करतात आणि घडणारे प्रसंग स्वप्नात घडल्याप्रमाणे समोर आणत राहतात. कॉफमन त्याच्या पात्रांच्या शब्दशः ‘डोक्यातʼ जाऊन चित्रपट घडवत होता. त्याच्या नंतरच्या चित्रपटांमध्येही हे तंत्र कायम राहिले.

अडॅप्टेशनची पटकथा कॉफमनच्या लिखाणाच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित होती. दि ऑर्किड थीफ नावाच्या कादंबरीचे पटकथेत रूपांतर करण्याचे काम त्याच्याकडेच आले होते. या कादंबरीची कथा फार किचकट आणि ऑर्किड फुलांच्या तांत्रिक संदर्भात गुंफलेली होती. या कादंबरीचे पटकथेत रूपांतर करणे त्याला काही जमले नाही. याउलट, त्याने रूपांतर करण्याच्या प्रक्रियेवर अथवा प्रयत्नावर आधारित अडॅप्टेशनची पटकथा लिहिली. या चित्रपटाचे मुख्य पात्र चार्ली कॉफमन हाच होता. त्यासोबत कॉफमनच्या काल्पनिक जुळ्या भावाची, म्हणजे डॉनल्ड कॉफमनची व्यक्तिरेखाही या चित्रपटात होती. अडॅप्टेशन या चित्रपटाच्या नामावलीत पटकथाकार म्हणून कॉफमनसोबत डॉनल्ड कॉफमन हे नावदेखील आहे.

इटर्नल सनशाइन ऑफ दि स्पॉटलेस माइंड या चित्रपटात प्रेमकथा आणि विज्ञानकथा (science fiction) या दोन वेगळ्या जातकुळींना कॉफमनने एकत्रित आणले. एक जोडपे एकमेकांच्या आठवणी विसरण्यासाठी ‘लकुनाʼ नामक संस्थेची मदत घेते. बराचसा चित्रपट त्या आठवणी त्यांच्या डोक्यातून काढल्या जात असताना घडतो.

सिनेक्डॉकी न्यूयॉर्क हा चित्रपट माणसांच्या आंतरिक भीतीवर बोट ठेवणारा होता. कॉफमनने भयपट लिहावा अशी इच्छा एका निर्मात्याने व्यक्त केली होती. सामान्य भयपट न लिहिता हा असा चित्रपट लिहावा, असे त्याला तेव्हाच सुचले.

चित्रपट वर्ष पुरस्कार
बीइंग जॉन मॅलकोव्हिच १९९९ – सर्वोत्कृष्ट स्वतंत्र पटकथा बाफ्टा पुरस्कार
अडॅप्टेशन २००२ – सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा बाफ्टा पुरस्कार
इटर्नल सनशाइन ऑफ दि स्पॉटलेस माइंड २००४ – सर्वोत्कृष्ट स्वतंत्र पटकथा ऑस्कर पुरस्कार; बाफ्टा पुरस्कार
अनॉमलीसा २०१५ – ग्रॅन्ड ज्यूरी प्राइज व्हेनिस चित्रपटमहोत्सव

 

चित्रपटांची सूची :

 १ बीइंग जॉन मॅलकोव्हिच पटकथालेखक, कार्यकारी निर्माता १९९९
 २ ह्यूमन नेचर पटकथालेखक, निर्माता २००१
 ३ अडॅप्टेशन पटकथालेखक, कार्यकारी निर्माता २००२
 ४ कन्फेशन्स ऑफ अ डेंजरस माइंड पटकथालेखक २००२
 ५ इटर्नल सनशाइन ऑफ दि स्पॉटलेस माइंड पटकथालेखक, कार्यकारी निर्माता २००४
 ६ सिनेक्डॉकी न्यूयॉर्क दिग्दर्शक, पटकथालेखक, निर्माता २००८
 ७ अनॉमलीसा दिग्दर्शक, पटकथालेखक, निर्माता २०१५

समीक्षक – गणेश मतकरी

प्रतिक्रिया व्यक्त करा