देसाई, मनमोहन : (२६ फेब्रुवारी १९३७ – १ मार्च १९९४).

भारतीय चित्रपटसृष्टीतील विख्यात चित्रपटनिर्माते व दिग्दर्शक. मुंबईतील एका गुजराती कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मुंबईतील गिरगाव या त्या वेळच्या मराठमोळ्या वस्तीत ते वाढले. चित्रपटाचे वातावरण त्यांच्या घरातच होते. चित्रपटनिर्माते किकुभाई देसाई हे त्यांचे वडील. पॅरामाउंट स्टुडिओ (नंतरचे नाव फिल्मालय स्टुडिओ) त्यांच्या मालकीचा होता. त्यांनी निर्मिती केलेले चित्रपट सर्कस क्वीन, गोल्डन गँग, शेख चिल्ली  हे मुख्यत: साहसपट होते. मनमोहन देसाई यांचे वडीलबंधू सुभाष देसाई हेही चित्रपटनिर्माते होते. त्यांनीच आपल्या भावाला १९६० साली दिग्दर्शक म्हणून छलिया हा पहिला चित्रपट करायला दिला. त्यानंतर या निर्माता-दिग्दर्शक जोडीने ब्लफ मास्टर, धरमवीर, देशप्रेमी यांसारखे चित्रपट केले.

छलिया हा गंभीर चित्रपट होता. राजकपूर, नूतन, प्राण आणि रेहमान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला भारताच्या फाळणीची पार्श्‍वभूमी होती. त्यानंतर १९६३ मध्ये प्रदर्शित झालेला ब्लफ मास्टर हा शम्मी कपूर आणि सायरा बानो यांची भूमिका असलेला चित्रपट हलकाफुलका होता, तर त्यानंतरचा बद्तमीज हा शम्मी कपूर आणि साधना यांना घेऊन केलेला चित्रपट निर्माते जगदीश वर्मा यांच्यासाठी दिग्दर्शित केला होता.

मनमोहन देसाई यांना मोठे यश मिळाले ते १९७० साली प्रदर्शित झालेल्या सच्चा झूठा या चित्रपटामुळे. राजेश खन्ना त्या वेळी यशाच्या सर्वोच्च शिखरावर होते आणि त्यांची दुहेरी भूमिका असलेला हा चित्रपट खूप यशस्वी ठरला. त्यानंतरचे आ गले लग जा, भाई हो तो ऐसा, रामपुर का लक्ष्मण, रोटी हे चित्रपटही व्यावसायिकदृष्ट्या अतिशय यशस्वी ठरले आणि मनमोहन देसाई हे नाव हमखास चालणारे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक म्हणून ओळखले जाऊ लागले.

मनमोहन देसाई यांनी दिग्दर्शित केलेला आणि १९७७ साली प्रदर्शित झालेला अमर अकबर अँथनी हा प्रचंड लोकप्रिय ठरलेला चित्रपट. व्यावसायिक हिंदी चित्रपटसृष्टीमधील हा एक मैलाचा दगड मानला जातो. आजपर्यंत या चित्रपटावर अनेक लेख लिहिले गेले. त्यावर पीएच.डी. केली गेली. तसेच अनेक  पुस्तकेही लिहिली गेली. यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून ख्याती असलेले मनमोहन देसाई त्या सुमारास एकाच वेळी चार चित्रपटांचे दिग्दर्शन करत होते. परवरीश, धरमवीर, चाचा भतीजा आणि चौथा चित्रपट होता अमर अकबर अँथनी. हे चारही चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी ठरले असले तरी अमर अकबर अँथनीने इतिहास घडविला. निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर मनमोहन देसाई आणि अमिताभ बच्चन ही जोडी यशस्वी चित्रपट देणारी जोडी म्हणून ओळखली जाऊ लागली. बच्चन यांना महानायकपद मिळण्यामध्ये त्यांनी मनमोहन देसाई यांच्याबरोबर केलेल्या यशस्वी आणि लोकप्रिय चित्रपटांचा मोठा सहभाग आहे आणि अमर अकबर अँथनी हा यांतील महत्त्वाचा चित्रपट. तीन भावांच्या हातांतून रक्त काढणार्‍या नळ्यांमधून थेट आईला रक्त देणे, देवाच्या मूर्तींमधून ज्योत येऊन ती अंध आईच्या डोळ्यांत विलीन होणे आणि तिला दृष्टी येणे यांसारखी विज्ञानाला छेद देणारी अनेक दृश्ये या चित्रपटामध्ये होती; तरीही प्रेक्षकांनी त्यांकडे दुर्लक्ष करत या चित्रपटाला डोक्यावर घेतले.

फक्त अमिताभ बच्चन :

मनमोहन देसाई यांनी दिग्दर्शक म्हणून केलेल्या त्यांच्या सर्व चित्रपटांमध्ये नायक म्हणून त्यांनी अमिताभ बच्चन यांनाच घेतले. या चित्रपटांना अमर अकबर अँथनी एवढे यश मिळाले नसले, तरी तिकीटबारीवर त्यांनी उत्तम व्यवसाय केला. सुहाग, नसीब, देशप्रेमी हे ते चित्रपट होत. त्यानंतरचा त्यांचा कुली हा चित्रपट खूप गाजला, तो या चित्रपटाच्या देखाव्यावर (सेटवर) अमिताभ बच्चन यांना झालेल्या गंभीर दुखापतीमुळे. चित्रपटातील खलनायक पुनीत इस्सार आणि अमिताभ बच्चन यांच्यातील मारामारीच्या एका दृश्यात बच्चन यांना दुखापत झाली आणि संपूर्ण देशात जणू हाहाकार उडाला. पुढे बच्चन बरे झाले आणि चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा ज्या प्रसंगाच्या वेळेस हा अपघात झाला होता तो प्रसंग पडद्यावर आल्यानंतर दृश्य तिथे अल्पवेळ थांबविले जायचे व पडद्यावर ‘या दृश्याच्या वेळेस अमिताभ बच्चन यांना अपघात झाला’, असे लिहून येत असे.

या चित्रपटानंतर मात्र मनमोहन देसाई यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचे मर्द आणि गंगा जमुना सरस्वती हे त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट फार चालले नाहीत. नायक म्हणून अमिताभ बच्चन यांचाही तो उतरता काळ होता. पुढे मनमोहन देसाईंनी आपल्या मुलासाठी, केतन देसाईसाठी, चित्रपटांची निर्मिती केली. मात्र केतन देसाई यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट फारसे यशस्वी ठरले नाहीत.

गिरगावातील आपल्या घराच्या सज्जावरून (बाल्कनी) खाली पडून मनमोहन देसाई यांचा मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केली असावी, असेही म्हटले जाते. मृत्युसमयी ते ५७ वर्षांचे होते.

चित्रपट, प्रसिद्धिवर्ष :

छलिया १९६०
ब्लफ मास्टर १९६३
बद्तमीज १९६६
किस्मत १९६८
सच्चा झूठा १९७०
रामपुर का लक्ष्मण १९७२
भाई हो तो ऐसा १९७२
आ गले लग जा १९७३
रोटी १९७४
परवरीश १९७७
धरमवीर १९७७
चाचा भतीजा १९७७
अमर अकबर अँथनी १९७७
सुहाग १९७९
नसीब १९८१
देशप्रेमी १९८२
कुली १९८३
मर्द १९८५
अल्ला -रख्खा (निर्माता) १९८६
गंगा जमुना सरस्वती १९८८
तूफान (निर्माता) १९८९
अनमोल (निर्माता) १९९३

 

संदर्भ :

  •  Bhatia, Sidharth Amar Akbar Anthony : Masala, Madness and Manmohan Desai, 2013.
  •  Raheja, Dinesh ‘Amar Akbar Anthony: Whoop-it-up fun!ʼ, Rediff.com, 2003.

प्रतिक्रिया व्यक्त करा