भारतातील अनेक नावाजलेल्या प्रादेशिक चित्रपटसृष्टींपैकी एक आघाडीची चित्रपटसृष्टी. पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बिहार आणि दक्षिण नेपाळ या भौगोलिक प्रदेशांत भोजपुरी भाषा बोलली जाते. तेथे भोजपुरी चित्रपट बघितले जातात. त्याशिवाय भोजपुरी भाषिक मोठ्या प्रमाणावर ब्राझील, फिजी, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका आणि यूरोपियन देशांमध्ये विखुरले आहेत. तेथेही भोजपुरी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे.
पहिला भोजपुरी चित्रपट गंगामैया तोहे पियारी चढैबो हा १९६३ मध्ये प्रदर्शित झाला. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद ह्यांची प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रयत्न यासाठी कारणीभूत ठरले. निर्मल पिक्चर्सच्या या चित्रपटाचे विश्वनाथप्रसाद शाहाबादी हे निर्माते होते, तर कुंदनकुमार दिग्दर्शक होते. १९८० पर्यंत भोजपुरी चित्रपट मोठ्या प्रमाणावर आणि सातत्याने निर्माण झाले. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या नदिया के पार (दिग्दर्शक गोविंद मूनिस) या चित्रपटाने भोजपुरी चित्रपट देशभर पोहोचविला; पण, कथानकांमधील तोच-तोपणा, फसलेली आर्थिक गणिते, हिंदी चित्रपटांचे अतिक्रमण या कारणांमुळे दहा वर्षांच्या आतच ही भोजपुरी चित्रपटसृष्टी मरणपंथाला लागली. २००१ साली प्रदर्शित झालेल्या मोहनप्रसाददिग्दर्शित सैंया हमार या चित्रपटाने मात्र परिस्थिती बदलली. रविकिशनअभिनित या चित्रपटाने तिकीटखिडकीवर तुफान धंदा केला. या चित्रपटामुळे मृतप्राय भोजपुरी चित्रपटांना नवसंजीवनी मिळाली. यानंतर पंडितजी बताई ना ब्याह कब होई (२००५) आणि ससुरा बडा पैसा वाला (२००५) या चित्रपटांना घवघवीत आर्थिक यश मिळाले. भोजपुरी चित्रपटसृष्टीत दर वर्षी शंभरच्या आसपास चित्रपटांची निर्मिती होत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या धर्तीवर भोजपुरी चित्रपटसृष्टीमध्येही उत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार दिले जातात व त्यासाठी पुरस्कारसोहळेही आयोजित केले जातात. फिल्म फेअर आणि स्टारडस्ट या चित्रपट मासिकांप्रमाणेच भोजपुरी चित्रपटसृष्टीबद्दल साग्रसंगीत माहिती देणारे भोजपुरी सिटी हे मासिक लोकप्रिय आहे. त्यात चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख, भोजपुरी चित्रपटांनी तिकीटखिडकीवर जमविलेला गल्ला आणि इतर आर्थिक व व्यापारी उलाढालींची माहिती असते. काही आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट महोत्सवांतही भोजपुरी चित्रपटांची नोंद झाली आहे. भोजपुरी चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे तंत्रज्ञ आणि कलाकार पटना आणि मुंबई या शहरांमध्ये राहतात. चित्रपटनिर्मितीसाठी लागणार्या मूलभूत सुविधांचा अभाव हा बिहारमधील मोठा प्रश्न आहे. त्यासाठी त्यांना मुंबईवर अवलंबून राहावे लागते. त्यासोबतच चित्रीकरण करण्यासाठी बिहार ही काही फारशी सुरक्षित जागा मानली जात नाही. मुंबईवरचे आपले अवलंबित्व कमी व्हावे म्हणून रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर बिहारमध्येदेखील मोठी फिल्म सिटी उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मनोज तिवारी, रविकिशन, दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ, पवन सिंग, खेसरी लाल यादव हे भोजपुरी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेते आहेत. मोनालिसा, राणी चॅटर्जी, रिंकू घोष, पाखी हेगडे, स्वाती वर्मा या उल्लेखनीय भोजपुरी अभिनेत्री आहेत. मकरंद अनासपुरे, मोहन जोशी अशा अनेक मराठी कलावंतांनी भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. विनय सिंग, मुकेश पांडे, विमल कुमार आणि अस्लम शेख हे आघाडीचे भोजपुरी चित्रपटदिग्दर्शक आहेत.
भोजपुरी चित्रपटांचा प्रभाव जसजसा देशभर वाढत आहे तसतसा भोजपुरी अभिनेते आणि अभिनेत्रींचा देशातील इतर भाषिक चित्रपटसृष्टींमधील वावर वाढत चालला आहे. भोजपुरी नट-नट्या अनेक जाहिरातींमध्ये झळकतात. प्रसारण वाहिनीवरील बिग बॉस या लोकप्रिय कार्यक्रमात भोजपुरी कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी असतात. अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, धर्मेंद्र इत्यादी हिंदी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज अभिनेत्यांनी भोजपुरी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. प्रियांका चोप्रा ही आघाडीची अभिनेत्री भोजपुरी चित्रपटांच्या निर्मितीमध्ये उतरली आहे.
समीक्षक – निखिलेश चित्रे