आमिर खान : (१४ मार्च १९६५).
भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते. शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या बरोबरीने बॉलिवुडवर राज्य करणार्या तीन खानांमध्ये आमिर खान यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. पूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसेन खान. आईचे नाव झीनत हुसेन, तर वडिलांचे नाव ताहीर हुसेन. काका नासिर हुसेन आणि वडील ताहीर हुसेन यांच्याकडून आमिर खान यांनाचित्रपटांचे बाळकडू मिळाले. नासिर हुसेन यांच्या यादों की बारात या चित्रपटामध्ये नायकाच्या लहानपणीची एक छोटीशी भूमिका आमिर खान यांनी केली होती (१९७३).
वयाच्या सोळाव्या वर्षी शाळेतील त्यांचे मित्र आदित्य भट्टाचार्य यांनी दिग्दर्शित केलेल्या चाळीस मिनिटांच्या पॅरानोइआ या प्रायोगिक चित्रपटाच्या निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग होता. या चित्रपटात त्यांनी नीना गुप्ता आणि व्हिक्टर बॅनर्जी यांच्याबरोबर मुख्य भूमिकाही निभावली. पुढे याच क्षेत्रात काम करण्याचे त्यांनी ठरविले. त्यांनी ‘अवांतर’ या रंगभूमीवर काम करणार्या संस्थेशी स्वत:ला जोडून घेतले. या संस्थेच्या एका गुजराती नाटकामध्ये छोटीशी भूमिकाही केली. महाविद्यालयीन शिक्षण घेण्याऐवजी त्यांनी आपल्या काकांबरोबर सहायक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मधील विद्यार्थ्यांनी केलेल्या अनेक माहितीपटांत त्यांनी भूमिका केल्या. दिग्दर्शक केतन मेहता यांना त्यांच्या या भूमिका आवडल्या आणि त्यांनी होली या आपल्या कलात्मक चित्रपटामध्ये आमिर खान यांना भूमिका दिली (१९८३). प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांच्या होळी या नाटकावर आधारित हा चित्रपट होता.
नायक म्हणून पदार्पण : काका नासिर हुसेननिर्मित आणि चुलतभाऊ मन्सूर खान यांनी पहिल्यांदाच दिग्दर्शित केलेल्या कयामत से कयामत तक (१९८८) या चित्रपटासाठी आमिर खान यांना नायक म्हणून भूमिका मिळाली. यात जुही चावला त्यांच्या नायिका होत्या. हा चित्रपट अत्यंत यशस्वी ठरला आणि हिंदी चित्रपटसृष्टीला एक नायक मिळाला. मात्र या चित्रपटानंतर आमिर खान यांनी केलेले चित्रपट यशस्वी झाले नाहीत. यामध्ये दिग्दर्शक आदित्य भट्टाचार्य यांच्या राख या चित्रपटाचाही समावेश होता. आपल्या पूर्वीच्या प्रेयसीवर झालेल्या बलात्काराचा बदला घेणार्या तरुणाची ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली नसली, तरी या चित्रपटाने आमिर खान यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.
अनेक अपयशी चित्रपटांनंतर आमिर खान यांना दिग्दर्शक इंद्रकुमार यांच्या दिल या चित्रपटामुळे व्यावसायिक स्तरावर पुन्हा यश मिळाले. यामध्ये माधुरी दीक्षित त्यांच्या नायिका होत्या. त्यानंतर इट हॅपन्ड वन नाइट या हॉलिवुडच्या चित्रपटावर आधारित महेश भट्ट दिग्दर्शित दिल है के मानता नहीं हा चित्रपटही व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरला.
चित्रपटनिर्मितीला सुरुवात : १९९५ नंतर आमिर खान यांनी आपल्या चित्रपटांची संख्या कमी करण्यास सुरुवात केली. १९९६ साली राजा हिंदुस्तानी हा करिश्मा कपूर यांच्याबरोबरचा त्यांचा एकमेव चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो यशस्वीही ठरला. १९९८ मध्ये विक्रम भट्ट दिग्दर्शित गुलाम (या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायनही केले) किंवा दीपा मेहतादिग्दर्शित अर्थ आणि १९९९ मध्ये जॉन मॅथ्यू मथनदिग्दर्शित सरफरोश हे चित्रपट खूप मोठे यश मिळवू शकले नसले, तरी समीक्षकांनी या चित्रपटांचे खूप कौतुक केले.
२००१ मधील आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित लगान या चित्रपटाच्या निमित्ताने आमिर खान निर्माता बनले. या चित्रपटाने व्यावसायिक दृष्ट्या तर यश मिळवलेच, शिवाय हॉलिवुडच्या ऑस्कर पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या नामांकनामध्येही स्थान मिळवले. त्यापाठोपाठ वर्षाच्या अखेरीला आलेल्या दिल चाहता है या फरहान अख्तर दिग्दर्शित पहिल्याच चित्रपटाने तरुण प्रेक्षकांना भुरळ घातली. आमिर खान, सैफ अली खान, अक्षय खन्ना, प्रीती झिंटा यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट एक मैलाचा दगड मानला जातो. मात्र, त्यानंतर पत्नी रिना दत्ता यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर (२००२) आमिर खान यांनी काही काळ चित्रपट केले नाहीत. २००५ मध्ये त्यांनी किरण राव यांच्याशी विवाह केला. किरण राव या उत्तम चित्रपट-दिग्दर्शिका आहेत.
दिग्दर्शक म्हणून पदार्पण : २००७ मध्ये आमिर खाननिर्मित तारे जमीं पर या चित्रपटाचे मूळ दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्याशी मतभेद झाल्यामुळे आमिर खान यांनी स्वत:च या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दंगल या चित्रपटाने यशाचे सर्व विक्रम तोडले आणि जगभरात सातशे कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केला. या चित्रपटासाठी दोन मुलींचा बाप दिसायला हवे म्हणून आमिर खान यांनी आपले वजन वाढविले होते. २०१७ मध्ये त्यांचा सीक्रिट सुपरस्टार हा चित्रपट प्रदर्शित झाला.
आमिर खान यांना कयामत से कयामत तक, राख, लगान, मॅडनेस इन द डेझर्ट आणि तारे जमीं पर या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. भारत सरकारने त्यांना पद्मश्री (२००३), पद्मभूषण (२०१०) हे पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
राजकीय भूमिका आणि वाद : राजकीय आणि सामाजिक भूमिका घेणारा कलावंत अशीही आमिर खान यांची ओळख आहे. त्यांनी २००६ मध्ये मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आणि गुजरातमध्ये नर्मदा नदीवरील धरणाची उंची वाढवण्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये ते सहभागी झाले होते. त्यामुळे गुजरात राज्यात त्यांच्या फना या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी झाली होती. २०११ मध्ये अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकासाठीच्या आंदोलनास आमिर खान यांनी पाठिंबा दिला.
२०१६ मध्ये देशात असहिष्णुतेचे वातावरण आहे असे म्हणताना आमिर खान यांनी आपल्या पत्नीने हा देश सोडून जावेसे वाटते, असे आपल्याला सांगितल्याचे विधान केले आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली. काही सरकारी जाहिरातींचा त्यांचा करार वाढविण्यात आला नाही. आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे स्पष्टीकरण नंतर त्यांनी दिले.
लहान मुलांना योग्य पोषण मिळावे म्हणून प्रचार करण्यासाठी ते संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी (युनिसेफ) या संघटनेचे राजदूत होते. मे २०१२ मध्ये दूरचित्रवाणीवरील त्यांची सत्यजित भटकळदिग्दर्शित सत्यमेव जयते ही मालिका म्हणजे एक वेगळा प्रयोग होता. मनोरंजन करणार्या वाहिनीवर रविवारी सकाळी एक तास समाजातील एका गंभीर विषयावर चर्चा घडवून आणणे, त्या प्रश्नाची तड कशी लावता येईल याचा वेध घेणे, विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये काम करणार्या मंडळींना व्यासपीठ देणे असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. या मालिकेचे सर्वत्र कौतुक झाले. आमिर खान आणि त्यांची पत्नी किरण राव यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सामूहिक श्रमदानाच्या साहाय्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जलसंधारणाची कामे केली आहेत.
आमिर खान हे एक संवेदनशील आणि अभ्यासू नायक म्हणून ओळखले जातात. वेगवेगळ्या, वैविध्यपूर्ण आणि आव्हानात्मक भूमिका यांची निवड करताना व्यावसायिकता आणि कलात्मकता यांचा तोल योग्य प्रकारे सांभाळणारे कलावंत म्हणूनही त्यांची ख्याती आहे.
महत्त्वाचे चित्रपट, प्रसिद्धीवर्ष आणि दिग्दर्शक :
१. | होली | १९८४ | केतन मेहता |
२. | कयामत से कयामत तक | १९८८ | मन्सूर खान |
३. | राख | १९८९ | आदित्य भट्टाचार्य |
४. | दिल | १९९० | इंद्रकुमार |
५. | दिल है के मानता नहीं | १९९१ | महेश भट |
६. | जो जिता वोही सिकंदर | १९९२ | मन्सूर खान |
७. | हम है राही प्यार के | १९९३ | महेश भट |
८. | अंदाज अपना अपना | १९९४ | राजकुमार संतोषी |
९. | अकेले हम अकेले तुम | १९९५ | मन्सूर खान |
१०. | रंगीला | १९९५ | रामगोपाल वर्मा |
११. | राजा हिंदुस्तानी | १९९६ | धर्मेश दर्शन |
१२. | इश्क | १९९७ | इंद्रकुमार |
१३. | गुलाम | १९९८ | विक्रम भट |
१४. | अर्थ | १९९८ | दीपा मेहता |
१५. | सरफरोश | १९९९ | जॉन मॅथ्यू मथन |
१६. | मन | १९९९ | इंद्रकुमार |
१७. | लगान | २००१ | आशुतोष गोवारीकर |
१८. | दिल चाहता है | २००१ | फरहान अख्तर |
१९. | मॅडनेस इन द डेझर्ट | २००४ | माहितीपट |
२०. | मंगल पांडे | २००५ | केतन मेहता |
२१. | रंग दे बसंती | २००६ | राकेश ओमप्रकाश मेहरा |
२२. | तारे जमीं पर | २००७ | आमिर खान |
२३. | गजनी | २००८ | ए. आर. मुरुगदास |
२४. | थ्री इडियट्स | २००९ | राजकुमार हिरानी |
२५. | धोबी घाट | २०११ | किरण राव |
२६. | तलाश | २०१२ | रिमा काग्ती |
२७. | धूम थ्री | २०१३ | विजयकृष्ण आचार्य |
२८. | पीके | २०१४ | राजकुमार हिरानी |
२९. | दंगल | २०१६ | नितेश तिवारी |
३०. | सीक्रिट सुपरस्टार | २०१७ | अद्वैत चंदन |
समीक्षक – संतोष पाठारे