राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ : (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन)

भारतीय चित्रपटांची गुणवत्ता वाढवणे आणि चित्रपटव्यवसायाचा सर्वांगीण विकास घडविणे या उद्देशाने भारत सरकारने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची स्थापना केली. चित्रपटनिर्मिती, अर्थसाहाय्य, वितरण आदी माध्यमांतून भारतीय चित्रपटांच्या विकासासाठी ही संस्था कार्यरत आहे. ही संस्था सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असून तिचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे.

इतिहास :

चित्रपट वित्त महामंडळ आणि भारतीय चित्रपट निर्यात महामंडळ यांचे विलीनीकरण करून ही स्वायत्त संस्था अस्तित्त्वात आली. त्यापू्र्वी १९५१ मध्ये पाटीलसमितीने केलेल्या शिफारशीनुसार चित्रपट वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली होती (१९६०). चित्रपटनिर्मितीसाठी अर्थसाहाय्य देण्याची कल्पना त्यामागे होती. त्याशिवाय १९६३ साली भारतीय चित्रपट निर्यात महामंडळाची (इंडियन मोशन पिक्चर एक्स्पोर्ट कॉर्पोरेशन) स्थापना करण्यात आली. भारतीय चित्रपटांसाठी परदेशी बाजारपेठ निर्माण करणे, हे या संस्थेचे उद्दिष्ट होते. सुमारे २० वर्षे या दोन्ही संस्था स्वतंत्रपणे कार्यरत होत्या. या दोन्ही संस्था भारतीय चित्रपटव्यवसायाचा सर्वांगीण विकास आणि विस्तार यांसाठीच कार्यरत असल्याने त्यांच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव पुढे आला. १९८० मध्ये राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची स्थापना झाली.

कार्य / चित्रपटनिर्मिती :

चित्रपटांच्या गुणवत्तावाढीसाठी संस्था प्रयत्नशील आहे. अनुभवी आणि नवोदित चित्रपटकर्त्यांच्या चित्रपटांसाठी ही संस्था सहकार्य करते.  या संस्थेच्या स्थापनेपासून तिने समांतर चित्रपटांची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली. १९७०-८०च्या दशकांतील जाने भी दो यारो, धारावी, गोदाम, मिर्च मसाला, सलाम बॉम्बे, उसकी रोटी, मम्मो,  २७ डाउन, घरे बैरे  अशा अनेक चित्रपटांची निर्मिती संस्थेने केली. आदि शंकराचार्य (१९८३) हा संस्कृत भाषेतील पहिला चित्रपट संस्थेनेच निर्माण केला. संस्थेने आजपर्यंत मराठी, हिंदी, पंजाबी, तमिळ आदी भारतीय भाषांमध्ये ३०० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्याशिवाय रिचर्ड ॲटनबरो दिग्दर्शित गांधी (१९८५) या ब्रिटिश चित्रपटाच्या निर्मितीसाठी संस्थेने सहनिर्मिती केली. परदेशी चित्रपटसंस्थांच्या बरोबरीने चित्रपटनिर्मितीचे नवे दालन या निमित्ताने खुले झाले. चित्रपटनिर्मितीसह वितरण आणि प्रदर्शन या क्षेत्रांतही संस्था कार्यरत आहे.

अध्यक्ष :

अनेक मान्यवरांनी या संस्थेचे अध्यक्षस्थान भूषविले.  त्यांत डी. व्ही. एस्. राजू, डी. के. करंजीया, ओम पुरी, रमेश सिप्पी यांचा समावेश आहे.

पुरस्कार :

संस्थेने निर्मिती केलेल्या चित्रपटांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांतून गौरविण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळविलेले चित्रपट पुढीलप्रमाणे : पेस्टनजी, सलीम लंगडे पे मत रो, मरुपक्कम, धारावी, एक होता विदूषक,  गुड रोड पलताडचो मुनीस.

संस्थेचे उपक्रम :

गोव्यात होणाऱ्या फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये चित्रपटवितरण आणि प्रदर्शन यांच्या संदर्भातील फिल्म बझारचे आयोजन संस्थेतर्फे केले जाते. गेल्या काही वर्षांत या बझारला प्रतिष्ठा लाभली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटव्यावसायिक या बझारला आवर्जून उपस्थित राहतात. संस्थेतर्फे दरवर्षी पटकथालेखन कार्यशाळा आयोजित केली जाते. ‘स्क्रीनरायटर्स लॅब’ असे या कार्यशाळेचे नाव आहे.

सिनेमाज ऑफ इंडिया (भारतीय चित्रपट) :

संस्थेने निर्मिती केलेल्या समांतर चित्रपटांची प्रसिद्धी आणि वितरण यांसाठी सिनेमाज ऑफ इंडिया ही कल्पना २०१३ मध्ये अमलात आणली. याअंतर्गत १९६० पासून संस्थेने निर्मिती केलेले चित्रपट नव्याने उपलब्ध करण्यात आले. त्यासाठी ऑनलाइन विक्री, डीव्हीडी विक्री अशी स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली. या माध्यमातून मणी कौल, श्याम बेनेगल, अदूर गोपालकृष्णन इ. अनेक महत्त्वाच्या दिग्दर्शकांचे चित्रपट उपलब्ध झाले.

पहा : फिल्म वित्त महामंडळ, मराठी विश्वकोश खंड : १०, पृ. क्र. ९२९.

राष्ट्रीय फिल्म विकास निगम, मराठी विश्वकोश खंड : १४, पृ. क्र. ९३८.

समीक्षक – निखिलेश चित्रे

प्रतिक्रिया व्यक्त करा