विद्यार्थ्याच्या ज्ञानात्मक, भावात्मक व क्रियात्मक गुणवत्तेचे आणि विकासाचे मूल्यमापन करणारे एक सर्वांत महत्त्वपूर्ण तंत्र. यालाच अध्ययन-अध्यापनाच्या परिणामाच्या मोजमापाचे साधन म्हणजे परीक्षा असेही म्हटले जाते. परीक्षा या तंत्राचा वापर व्यापक स्तरावर केला जातो. परीक्षेसाठी तज्ज्ञ व्यक्तीकडून प्रश्नपत्रिका तयार करून घेणे, परीक्षेसाठी आसन व्यवस्था करणे, विद्यार्थ्याने लिहिलेल्या उत्तरपुस्तिकेचे संकलन करणे व उत्तरपुस्तिकेचे मूल्यमापन करून प्राप्त गुणांच्या आधारे निकाल जाहीर करणे इत्यादी बाबी परीक्षेशी संबंधित आहेत. परीक्षांचे नियोजन व आयोजन पूर्णपणे प्रशासकीय व तांत्रिक बाबींशी निगडीत असते. परीक्षापूर्व कामे, परीक्षा आयोजन व परीक्षेत्तर कार्य अशा तीन टप्प्यांत परीक्षेची कार्ये विद्यापीठ किंवा संस्था करतात. परीक्षेसाठी विविध प्रकारची मूल्यमापनाची साधने वापरली जातात. उदा., शिक्षकांनी तयार केलेल्या वर्गचाचण्या, कसोट्या, इत्यादी.
लेखी परीक्षेची सुरुवात सर्वप्रथम चीनमध्ये सुई राजवटीत इ. स. ६०५ मध्ये झाल्याचे आढळून येते. इंग्लंडमध्ये इ. स. १८०६ मध्ये प्रथमच नागरी सेवेसाठी योग्य उमेदवार निवडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. कालांतराने शिक्षण क्षेत्रातसुद्धा लेखी परीक्षेचा उपयोग जगातील अनेक देशांमध्ये केला जाऊ लागला. भारतात इ. स. १८५७ पासून विद्यापीठीय परीक्षांना सुरुवात झाली. भारताने १९५७ मध्ये अमेरीकन शिक्षणतज्ज्ञ बेंजामीन ब्लूम यांची परीक्षांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्या वेळी ब्लूम आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी परीक्षासंदर्भात काही सूचना व तत्त्वे सांगितली आहेत : (१) परीक्षा हा अध्यापनाचा भाग असून ती शिक्षकानेच घ्यावी. (२) विद्यार्थ्यांकडून वर्षभर सतत चाचण्या व परीक्षा घ्याव्यात. (३) वर्षभरातील चाचण्या व वार्षिक परीक्षा यांचे ४० : ६० अशी गुणांची टक्केवारी ठेवावी. (४) विषयवार निकषांद्वारे गुणांऐवजी श्रेणी पद्धतीचा वापर करावा. (५) अभ्यासक्रमात सत्रपद्धती आणावी. (६) व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी वेगळी स्वतंत्र परीक्षा घेऊन मूल्यांकन व्हावे इत्यादी.
परीक्षेमुळे कोणत्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत कोणकोणत्या कमतरता आहेत, हे दिसून येते. जर त्याच्यातील गुणवत्ता परीक्षेतून वाढत नसेल नसेल, तर यावर विचार होऊन परीक्षा पद्धतीत तसेच शिक्षण पद्धतीतही सुधारणाही केली जाते. १९८६ साली नवीन शैक्षणिक धोरणामध्ये परीक्षासंबंधी परीक्षेत ‘काय असावे’ व ‘काय असू नये’ यांबाबत काही सुधारणा सुचविल्या : (१) अवसर/यदृच्छा (Chance) आणि व्यक्तिनिष्ठता यांवरील भर नाहीसा कारावा. (२) परीक्षा केवळ विद्यार्थांच्या स्मरणशक्तीवर आधारीत नसावी. (३) परीक्षा हे वार्षिक व अर्धवार्षिक यांसह संपूर्ण वर्षभर चाचण्या घेण्यात येऊन अभ्यासक्रम व अभ्यासेतर क्रीया या दोन्ही अंगाने मूल्यमापन करण्यात यावे. (४) मूल्यमापनात विद्यार्थी, शिक्षक व पालक या सर्वांचा सहभाग असावा इत्यादी. काही विद्यापीठांनी १९८६च्या शैक्षणिक धोरणांच्या सूचना लक्षात घेऊन अखंड अंतर्गत चाचणी घेणे, प्रश्नपेढी सुरू करणे, मध्यवर्ती मूल्यमापन पद्धती, प्रथम-द्वीतीय सत्रांत परीक्षा पद्धती इत्यादी मूल्यमापनाच्या दृष्टीने बदल केलेले आढळतात.
लेखी परीक्षेचे दीर्घोत्तरी, लघुत्तरी व वस्तुनिष्ठ असे तीन प्रकार पडतात. दीर्घोत्तरी परीक्षा ही पारंपरिक व व्यक्तीनिष्ठ स्वरूपाची आहे. या प्रकारच्या परीक्षेमध्ये अनेक दोष आढळून येत असल्यामुळे आधुनिक काळात लघुत्तरी व वस्तुनिष्ठ परीक्षांचा वापर मोठ्या स्तरावर केला जातो. १९७०च्या दशकात भारतीय विद्यापीठ संघटनेने (AlU) भारतात चार कार्यशाळांचे आयोजन करून परीक्षा पद्धतीची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध परीक्षांमध्ये विविध सुधारणा सुचविले आहेत. १९७२ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा सुधारासाठी कृतीकार्यक्रम घेतले. त्या वेळी अंतर्गत मूल्यमापन, प्रश्नपेढी विकसन, सत्र पद्धती व श्रेणी पद्धती इत्यादी प्रमुख परीक्षा सुधार सुचविले आहेत. या सुधारांशिवाय चांगल्या दर्जाचे प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्नांचा वापर, प्रश्निकांचे प्रशिक्षण, प्रश्नपत्रिकेसाठी संविधान तक्ता, प्रश्न विश्लेषण, गुणदान योजना, सततचे मूल्यमापन इत्यादी परीक्षा सुधार सुचविले असून त्यांपैकी काही परीक्षा सुधारांची अंमलबजावणी विद्यापीठांनी केलेली आहे.
परीक्षा प्रकार : परीक्षा प्रकारांमध्ये पुढील पद्धतींचा वापर केला जातो :
(१) प्रात्यक्षिक परीक्षा : या परीक्षा प्रकारात प्रात्यक्षिकांचे निरीक्षणाद्वारे मूल्यमापन केले जाते. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च, तसेच आयोजनासाठी अनेक प्रशासकीय कार्ये करावी लागतात. असे असले, तरी कौशल्याच्या आत्मसातीकरणाची तपासणी करण्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षेचा वापर करण्यात येतो.
(२) तोंडी परीक्षा : या प्रकारात विद्यार्थ्याचे कौशल्य तपासली जातात. विद्यार्थ्याला तोंडी प्रश्न विचारून त्याच्या ज्ञानाची व आकलनाची चाचपणी केली जाते. या परीक्षेतील मूल्यमापन आत्मनिष्ठ स्वरूपाचे असते. एका वेळी एका विद्यार्थ्याची तोंडी परीक्षा घ्यावी लागत असल्याने अशा परीक्षेच्या आयोजनासाठी खर्च, श्रम व वेळ जास्त लागतो. या परीक्षेत गुणदान करते वेळी परीक्षकाला स्मरणावर अवलंबून राहावे लागत असल्याने गुणदानावर प्रभाव पडतो.
(३) निरीक्षणात्मक परीक्षा : परीक्षेचा आणखी एक प्रकार म्हणजे निरीक्षण होय. अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिकातील सूक्ष्म बाबी निरीक्षणाद्वारे तपासता येतात. विद्यार्थ्यांची कृतिक्रिया चालू असताना परीक्षक नोंदी घेतात. निरीक्षण हे वस्तुनिष्ठ व व्यापक होण्यासाठी नोंद तक्त्यातील नोंदीनुसार परीक्षक गुणदान करतात.
(४) पडताळा सूची : एखाद्या विद्यार्थ्याच्या वर्तणुकीसंदर्भात घटक-उपघटक लागू होतात किंवा काय, हे ठरविण्यासाठी पडताळा सूचीतील प्रत्येक घटक-उपघटकांसमोर खुण करतात. प्रात्यक्षिकातील सूक्ष्म कौशल्ये तपासण्यासाठी पडताळा सूचीचा वापर केला जातो.
(५) मुलाखत परीक्षा : या तंत्राद्वारे निश्चित केलेल्या उद्दिष्टांचे मापन करण्यासाठी मुलाखतीचे प्रश्न तयार करण्यात येतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची व आकलनाची तपासणी, तसेच प्रश्नांचा योग्य क्रम लावून मुलाखतदाराकडून शैक्षणिक माहिती संकलित कली जाते.
(६) पदनिश्चयन श्रेणी : पडताळा सुचीचे सुधारित स्वरूप म्हणजे पदनिश्चयन श्रेणी होय. तीन, चार, सात, बिंदूवलीनुसार पदनिश्चयन क्षेणी तयार करतात. या बिंदुतील सामान्य श्रेणी मध्यभागी असून उच्च व कनिष्ठ श्रेणी दोन्ही भागांकडे विभागल्या जातात. या साधनाद्वारे विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा, नियमितपणा, सहकार्य व नेतृत्व इत्यादी गुणांची तपासणी करता येते. वर्तमान काळात जगातील बहुसंख्य देशांतील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये प्रामुख्याने बहुपर्यायी प्रश्न असलेल्या वस्तुनिष्ठ परीक्षांचा उपयोग केला जातो. यांव्यतिरिक्त मुक्त पुस्तक, पारंपरिक लेखी प्रश्नपत्रिका, स्वाध्याय, प्रकल्प, आंतरजालीय प्रश्नमंजूशा इत्यादी परीक्षा प्रकारही आहेत.
समीक्षक : के. एम. भांडारकर