विशिष्ट कालावधित अभ्याक्रम पूर्ण केल्यानंतर वर्षाच्या किंवा सत्राच्या शेवटी जे मूल्यमापन केले जाते, त्याला साकारिक मूल्यमापन असे म्हणतात. साकारिक म्हणजेच संकलित असाही पर्यायी शब्द वापरतात. साकारिक मूल्यमापनामध्ये आकारिक मूल्यमापनाचा समावेश केलेला असतो. अंतिम परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, प्रकल्प मूल्यमापन व मौखिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापनातील वर्षभरातील प्रगती इत्यादी साधनांचा समावेश साकारिक मूल्यमापनात आहे. विद्यार्थी, शिक्षणक्रम वैयक्तिक व संस्थांचे मूल्यमापन करण्यासाठी साकारिक मूल्यमापनाचा वापर केला जातो. एखाद्या शिक्षणक्रमातील सर्व अभ्यासक्रमांचेही स्वतंत्रपणे साकारिक मूल्यमापनाचा वापर केला जातो. एखाद्या शिक्षणक्रमातील सर्व अभ्यासक्रमांचेही स्वतंत्रपणे साकारिक मूल्यमापन केले जाते. शिक्षणक्रमाची अध्ययन फलनिष्पत्ती साकारिक मूल्यमापनाद्वारे तपासली जाते. अभ्यासक्रम यशस्वी रीत्या पूर्ण करण्यासाठी साकारिक मूल्यमापनाची किमान उत्तीर्णता पातळी निश्चित केलेली असते.

मूल्यमापनाचे प्रकार : साकारिक मूल्यमापनाव्यतिरिक्त मूल्यमापनाचे प्रारंभिक मूल्यमापन, आकारिक मूल्यमापन आणि निदानात्मक मूल्यमापन असे आणखी तीन प्रकार पडतात.

(१) प्रारंभिक मूल्यमापन : एखाद्या शिक्षणक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वी प्रवेश परीक्षा, विषय ज्ञान चाचणी किंवा अभियोग्यता चाचणी इत्यादी साधनांचा वापर करून प्रारंभिक मूल्यमापन केले जाते.

(२) आकारिक मूल्यमापन : सत्र सुरू झाल्यापासून ते सत्र संपेपर्यंत विविध तात्त्विक व प्रात्यक्षिक अभ्यासक्रमांचे आकारिक मूल्यमापन केले जाते. स्वाध्याय, वर्गचाचणी, प्रकल्प सादरीकरण, प्रात्यक्षिक नोंदवही लेखन, शैक्षणिक सहल, फोर्टफोलिओ इत्यादी साधनांचा वापर आकारिक आलेल्या आकारिक मूल्यमापनातील प्राप्त गुण आणि अंतिम परीक्षेतील प्राप्त गुण या दोन्ही गुणांच्या भारांशानुसार एकूण प्राप्त गुण साकारिक मूल्यमापनासाठी निश्चित करण्यात येतता. उदा., ८०:२०, ७०:३०.

(३) निदानात्मक मूल्यमापन : एखाद्या अभ्यासक्रमातील आशय अध्ययनातील कमतरता शोधून/निदान करून त्यावर उपचार करणे, म्हणजे निदानात्मक मूल्यमापन होय.

तात्त्विक भागाच्या साकारिक मूल्यमापनासाठी सत्र संपल्यानंतर सर्व अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा आयोजित केली जाते. महाविद्यालयातील/विद्यापीठातील शिक्षक साकारिक मूल्यमापनासाठी तज्ज्ञ म्हणजेच प्राश्निक, परीक्षक, समीक्षक, पर्यवेक्षक म्हणून कार्य करीत असतात. वस्तूनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न व दीर्घोत्तरी प्रश्न असे विविध प्रश्न प्रकार प्रश्नपत्रिकेत विचारले जातात. प्रश्नपत्रिकेची काठीण्य पातळी समतोल ठेवण्यासाठी निम्म, मध्यम व उच्च काठीण्यपातळीचे प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारले जातात. बौद्धिक क्षेत्रातील ज्ञान, आकलन, उपयोजन, संश्लेषण, विश्लेषण, मूल्यमापन व सर्जनशीलतेवर आधारित उद्दिष्टांचे मापन करण्यासाठी प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारले जातात. प्रश्निकांना त्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना व प्रशिक्षण दिले जाते. तज्ज्ञ प्रश्नपत्रिकेच्या संविधान तक्त्यानुसार प्रश्नपत्रिकेची निर्मिती, संक्षिप्त नमुना उत्तरे व गुणदान योजना तयार करतात. ही प्रक्रिया गुणवत्तापूर्ण केल्यामुळे साकारिक मूल्यमापनाची वस्तूनिष्ठता वाढण्यास मदत होते.

साकारिक मूल्यमापनातील वर्ग, श्रेणी, सीजीपीए व रूपांतरित टक्केवारी : साकारिक मूल्यमापनान प्राप्त गुणांचे श्रेणीत रूपांतर करतात. श्रेणी पद्धतीसह सीजीपीएच्या रूपात विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जातो. सर्व अभ्यासक्रमांतील प्राप्त गुणांची बेरीज करतात. या बेरजेस शिक्षणक्रमाच्या एकूण गुणाने भागल्यास त्या शिक्षणक्रमातील प्राप्त टक्केवारी निश्चित होते. टक्केवारीचे परीक्षेत्र, वर्ग व त्याचे वर्णन; तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्देशित केलेली श्रेणीपद्धती पुढील प्रमाणे निश्चित करतात.

टक्केवारीचे परिक्षेत्र तक्ता

अ. क्र. टक्केवारीचे परिक्षेत्र वर्ग व त्याचे वर्णन
१. ७५ % पेक्षा जास्त प्राविण्यासह प्रथम वर्ग
२. ६० ते ७४.९९ प्रथम वर्ग
३. ५० ते ५९.९९ द्वितीय वर्ग
४. ५० पेक्षा कमी असमाधानकारक
५. ५० पेक्षा कमी असमाधानकारक

 

विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्देशित केलेली श्रेणीपद्धती तक्ता

अ. क्र. श्रेणीचे वर्णन श्रेणी श्रेणी अंक सीजीपीए
१. असामान्य o १० ९.५ ते १०
२. उत्कृष्ट A+ ८.५ ते ९
३. फारच चांगला A ७.५ ते ८
४. चांगला B+ ६.५ ते ७
५. सरासरीपेक्षा जास्त B ५.५ ते ६
६. सरासरी C ४.५ ते ५
७. समाधानकारक D ३.५ ते ४
८. असमाधनकारक F ३.५ पेक्षा कमी

 

एखाद्या अभ्यासक्रमातील प्राप्त गुण किंवा कच्चे गुण श्रेणीच्या परिक्षेत्रातील गुणांनुसार निश्चित करण्यात येतात. प्रत्येक श्रेणीला श्रेणीअंक व भारांश दिला जातो. सर्व अभ्यासक्रमात प्राप्त श्रेणी, अंकांची बेरीज केली जाते. योग्य सूत्राचा उपयोग करून सीजीपीए काढला जातो. शिक्षणक्रमाचा सीजीपीए ठरल्यानंतर श्रेणी परिक्षेत्रानुसार त्या शिक्षणक्रमातील श्रेणी निश्चित करून निकाल जाहीर केला जातो. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी, स्त्री-पुरुष, शहरी व ग्रामीण, खुला व मागासवर्गातील गट अशा सांख्यिकीय पद्धतीने निकालाचे विश्लेषण केले जातात.

साकारिक मूल्यमापनाचे महत्त्व :

 • सत्र संपल्यानंतर अंतिम परीक्षा घेणे बंधनकारक असते. त्यामुळे वर्षभरातील परीक्षेचा खर्च, श्रम व वेळ वाचतो.
 • अंतिम परीक्षेच्या आयोजनासाठी बाह्य परीक्षकांची नेमणूक केल्यामुळे मूल्यमापनाची गुणवत्ता वाढते.
 • लेखी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षेसाठी विविध प्रकारचे प्रश्नप्रकार वापरले जातात.
 • अध्ययनाची निश्चित उद्दिष्ट साध्यता तपासण्यासाठी साकारिक मूल्यमापनाची मदत होते.
 • शिक्षणक्रमाची फलनिष्पत्ती साकारिक मूल्यमापनामुळे तपासता येते.
 • साकारिक मूल्यमापनाद्वारे बोधात्मक, भावात्मक व क्रियात्मक कौशल्याचे मापन करता येते. त्यामुळे व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे मापन करता येते इत्यादी.

साकारिक मूल्यमापनाच्या मर्यादा :

 • साकारिक मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना वर्षभर अभ्यास करण्याची सवय लावता येत नाही.
 • अंतिम परीक्षा व उत्तरपुस्तिकांचे मूल्यमापन करण्यासाठी विषयतज्ज्ञ यांची कमतरता भासते.
 • साकारिक मूल्यमापनासाठी मोठ्या प्रमाणावर अंतिम परीक्षेचे आयोजन व उत्तरपुस्तिकांचे मूल्यमापन करणे हे खर्चिक, वेळखाऊ व अधिक श्रमाचे कार्य होते.
 • साकारिक मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांच्या भावात्मक उद्दिष्टांचे मापन करणे कठीण जाते.
 • विद्यापीठ/संस्थांचा बहुतेक वेळ परीक्षा आयोजनावर खर्च होतो इत्यादी.

साकारिक मूल्यमापनात काही मर्यादा जरी असल्या, तरी आजच्या शिक्षणपद्धतीमध्ये हे मूल्यमापन अतिशय उपयुक्त आहे.

संदर्भ :

 • पाटील, सुरेश, शिक्षणातील मूल्यमापन, नासिक, २००१.
 • Dandekar, W. N., Evaluation in School, Pune, 1977.

समीक्षक : ह. न. जगताप