इंडियम हे आधुनिक आवर्त सारणीमधील गट ३ अ मधील मूलद्रव्य आहे. या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा In अशी असून अणुक्रमांक ४९ आणि अणुभार ११४.८१ इतका आहे. याचे इलेक्ट्रॉन संरूपण २, ८, १८, १८, ३ असे आहे.
इतिहास : एफ्. राइश व टी. रिक्टर यांनी १८६३ मध्ये थॅलियमासाठी जस्ताचे धातुपाषाण (झिंकब्लेंड) तपासताना हे मूलद्रव्य शोधून काढले.
किरणोत्सर्गी पध्दती : जस्त तयार करताना इंडियम उपपदार्थ म्हणून प्राप्त होतो. चांदीच्या अणूद्वारे (Ag109) न्यूट्रॉन शोषण आणि बीटा उत्सर्ग होऊन कॅडमियम (Cd115) तयार होते. नंतर कॅडमियमाच्या बीटा उत्सर्जनामधून इंडियम तयार होते.
निष्कर्षण : इंडियम निसर्गात निरनिराळ्या ठिकाणी लोखंड, शिसे, तांबे व विशेषत: जस्ताबरोबर धातुपाषाणात आढळते. या धातूंचे निष्कर्षण (धातुपाषाणापासून धातू मिळविणे) करीत असता, धातूंचा रस केल्यानंतर राहिलेल्या संहत मळीत उपफल (दुय्यम पदार्थ) म्हणून इंडियम शिल्लक राहते. त्यातून ते मिळवितात.
भौतिक गुणधर्म : इंडियम हे मूलद्रव्य स्फटिकी, तन्य (ductile), शिशापेक्षा मऊ व प्लॅटिनमासारखे रुपेरी आहे.
रासायनिक गुणधर्म : इंडियमाची हॅलोजनांबरोबर (फ्ल्युओरीन, क्लोरीन, ब्रोमीन व आयोडीन या अधातवीय मूलद्रव्यांबरोबर) सरळ विक्रिया होऊन तद्नुरूप हॅलाइडे मिळतात. याचे कार्बोनेट, ऑक्झॅलेट व सल्फाइड पाण्यात अविद्राव्य (न विरघळणारी) आहेत. इंडियमावर सामान्य तापमानात हवेचा परिणाम होत नाही परंतु ते लाल होईपर्यंत तापविले तर त्याचे इंडियम ट्राय-ऑक्साइड (In2O3) बनते. इंडियम थंड व विरल अम्लात सावकाश विरघळते परंतु उष्ण किंवा संहत अम्लात लवकर विरघळते. क्षारांचा (अल्कलींचा) व उकळत्या पाण्याचा त्याच्यावर परिणाम होत नाही. इंडियमाचे अतिशय कमी प्रमाण असलेल्या धातुपाषाणातून ते वर्णपटदर्शकाने ओळखता येते.
संयुगे : इंडियम टिन ऑक्साइड (ITO): इंडियमापासून इंडियम टिन ऑक्साइड तयार करतात. यामध्ये इंडियम, ऑक्सिजन आणि कथिल यांचे वजनी प्रमाण अनुक्रमे ७४ % , १८ % व ८ % असते. याचे रासायनिक सूत्र In2-xSnxO3 असे आहे. या ऑक्साइडाचे काचेच्या पृष्ठभागावर पारदर्शक व रंगहीन पटल तयार होते. त्यामुळे याचा वापर पारदर्शक संवाहक ऑक्साइड म्हणून करतात. तसेच याचा वापर दूरदर्शन संचाचे (flatscreenTVs) दर्शक पटल (display) बनविण्यासाठी होतो.
गॅलिंस्टन मिश्रधातू (Galinstan alloy) : गॅलियम, इंडियम आणि कथिल यांपासून गॅलिंस्टन मिश्रधातू तयार होतो. याचा वापर पाऱ्याप्रमाणे तापमापकामध्ये केला जातो.
उपयोग : (१) धारव्यांच्या पृष्ठभागावर इंडियमाचा मुलामा चढविला असता ते गंजत नाहीत व वंगणाचा थर अधिक चांगल्या प्रकारे चिकटून राहण्यास मदत होते. त्यामुळे विमानातील नळीच्या धारव्यांसाठी (फिरत्या भागांच्या आधारांसाठी) त्याचा उपयोग करतात.
(२) वितळलेली इंडियम धातू काच व इतर पदार्थांचे पृष्ठभाग ओलसर स्थितीत ठेऊ शकते व यामुळे काच, धातू, क्वॉर्ट्झ, संगमरवर इ. पृष्ठभागांचे वाताभेद्य जोड करण्याकरिता तिचा चांगला उपयोग होता.
(३) ट्रँझिस्टर व सौर विद्युत् घटमालेत इंडियम फॉस्फाइड वापरतात.
(४) अणुभट्टीतील ऊष्मीय न्यूट्रॉन स्रोत मोजण्यासाठी तसेच अणुभट्टीच्या जवळ काम करणाऱ्या लोकांचे व जवळपासच्या सामग्रीचे रक्षण करण्याकरिता न्यूट्रॉनांचे अस्तित्व ओळखण्यासाठी इंडियमाचा उपयोग होतो.
(५) किरणोत्सर्गी समस्थानिकाचा वापर वैद्यकशास्त्रामध्ये प्रथिने व पांढऱ्या पेशींच्या अभ्यासासाठी केला जातो.
(६) इंडियम व जर्मेनियम यांचे मिश्रधातू अर्धसंवाहकांच्या उत्पादनात वापरतात.
(७) इंडियम नायट्राइड आणि अँटिमनाइड हे अर्धसंवाहक असून यांचा वापर ट्रँझिस्टरमध्ये करतात.
https://www.youtube.com/watch?v=4opHafNmgCw
समीक्षक : भालचंद्र भणगे