क्लेईन, लॉरेन्स (Klein, Lawrence) : (१४ सप्टेंबर १९२० – २० ऑक्टोबर २०१३). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल स्मृती पुरस्काराचा मानकरी. अर्थमिती पूर्वानुमान प्रतिमानांची निर्मिती, त्यांचा अर्थव्यवस्थेतील चढउतार व आर्थिक धोरणाचे विश्लेषण करण्यासाठी वापर यांसंदर्भातील संशोधनाबद्दल क्लेईन यांना १९८० मध्ये अर्थशास्त्र विषयातील नोबेल स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांची निर्मिती असलेल्या संगणक व सांख्यिकी प्रतिमानांच्या साह्याने अर्थव्यवस्थांतील बदलांचा मागोवा घेणे शक्य झाले. त्यांच्या सांख्यिकी विश्लेषण परिमाणांचा अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँक तसेच मध्यवर्ती बँकांकडून मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
क्लेईन यांचा जन्म अमेरिकेतील ओमाहा (Nebraska) शहरात झाला. तेथील सार्वजनिक विद्यालयात त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. पदवीपूर्व शिक्षण लॉस अँजेल्स सिटी कॉलेजमधून पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९४२ मध्ये बर्कली विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातील बी. ए. पदवी प्राप्त केली. तेथेच त्यांनी अर्थशास्त्रीय समस्या समजून घेण्यासाठी संगणकप्रणाली विकसित केली. त्यांनी १९४४ मध्ये मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (M. I. T.) या संस्थेतून पीएच. डी. मिळविली. त्यानंतर ते अर्थशास्त्र विषयातील संशोधन करणाऱ्या चाऊलेस कमिशनमध्ये (सध्याचे शिकागो विद्यापीठ) रूजू झाले. तेथे अमेरिकन अर्थव्यवस्था, व्यवसायातील चढउतार तसेच शासनाच्या आर्थिक-राजकीय धोरणांच्या परिणामांचा मागोवा घेण्यासाठी त्यांनी प्रतिमान तयार केले. दुसऱ्या महायुद्धानंतर क्लेईन यांनी युद्धाच्या वेळी अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा मागोवा घेण्यासाठी आपले प्रतिमान वापरून ग्राहकांकडून वस्तूंना मागणी वाढल्याने अधोगतीऐवजी चालना मिळेल, या सर्वसाधारण विचारप्रवाहाविरोधी अचूक भाष्य केले. १९४० मध्ये कम्युनिस्ट पार्टीचा ते सदस्य झाले. १९५४ मध्ये सदर पक्षाच्या जवळीकीमुळे त्यांना मिशिगन विद्यापीठातील नोकरीला मुकावे लागले. तेव्हा ते इंग्लंडला जाऊन तेथे १९५४ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात रूजू झाले. तेथे त्यांनी सर जेम्स बॉल यांच्या सहकार्याने तेथील अर्थव्यवस्थेसाठी प्रतिमान विकसित केले. १९५८ मध्ये ते पुन्हा अमेरिकेला गेले व तेथील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात प्राध्यापक झाले. १९६८ मध्ये ते विद्यापीठाच्या सुप्रसिद्ध अशा वार्टन स्कूलमध्ये बेंजामिन फ्रँकलीन प्रोफेसर पदावर नियुक्त झाले.
क्लेईन यांनी १९६० च्या दशकात वार्टन इकॉनॉमिक फोरकास्टींग मॉडेल विकसित केले. अमेरिकेतील व्यवसाय, पर्यावरण, राष्ट्रीय उत्पन्न, निर्यात, गुंतवणूक, सेवन तसेच करप्रणाली, सार्वजनिक व्यय, इंधन किंमती यांमधील बदलांचा होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी सदरचे प्रतिमान उपयुक्त ठरले. १९६९ मध्ये त्यांनी मानवाने अर्थमितीचे पूर्वानुमान वर्तवण्यासाठी वार्टन इकॉनॉमेट्रिक फोरकास्टिंग असोसिएशननामक संस्था सुरू केली. बलाढ्य अशा जनरल इलेक्ट्रिक कंपनी, आयबीए, बेथले हेम स्टील कार्पोरेशन यांसारख्या कंपन्या या संस्थेच्या ग्राहक होत्या. या प्रकारचे काम करणाऱ्या अर्थतज्ञांच्या अनेक देशांतील गटांचे क्लेईन नेतृत्व करीत होते. विविध देशांतील आर्थिक घडामोडी इतर देशांमध्ये कशा प्रतिबिंबित होतात, हे जाणून घेण्यासाठी लिंक प्रोजेक्ट नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रकल्पाचा वापर केला जाई. १९७६ मध्ये अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत जिमी कार्टर यांच्या आर्थिक धोरणांचे समन्वयक म्हणूनही त्यांनी काम पाहिले; तथापि कार्टर यांच्या मंत्रिमंडळात येण्याचे निमंत्रण त्यांनी नाकारले. कारकीर्दीच्या शेवटच्या काळात ते अर्थव्यवस्थेसंबंधीची तिमाही तसेच अल्प मुदतीची भाकिते वर्तवणाऱ्यासाठीची प्रतिमाने विकसित करण्यात व्यग्र होते. ते औपचारिक निवृत्तीनंतर मृत्यूपर्यंत स्थूल अर्थमितीसंबंधीची आर्थिक वारंवारिता प्रतिमानांची निर्मिती करीत होते.
क्लेईन यांनी स्वतंत्रपणे तसेच सहलेखक म्हणून पुढील ग्रंथांचे लेखन केले. दि केनेशियन रेव्ह्यूल्यूशन (१९४६), इकॉनॉमिक फ्लक्युएशन्स इन दि युनाएटेड स्टेट्स, १९२१ – १९४१ (१९५०), ॲन इकॉनॉमेट्रिक मॉडेल ऑफ दि युनायटेड स्टेट्स (१९५५), दि वार्टन इकॉनॉमेट्रिक फोरकास्टिंग मॉडेल (१९६७ – सहलेखक), दि ब्रुकिंग्ज मॉडेल (१९७५ – सहलेखक), इकॉनॉमेट्रिक मॉडेल परफॉर्मन्स (१९७६), ॲन इंट्रोडक्शन टू इकॉनॉमेट्रिक फोरकास्टिंग ॲण्ड फोरकास्टिंग मॉडेल्स (१९८०), इकॉनॉमेट्रिक मॉडेल्स ॲण्ड गाईड्स फार डिसिजन मेकिंग (१९८२), दि इकॉनॉमिक्स ऑफ सप्लाय ॲण्ड डिमांड (१९८३), इकॉनॉमिक्स, इकॉनॉमेट्रिक्स ॲण्ड दि लिंक (१९९५ – सहलेखक), चायना ॲण्ड इंडिया : टू एशियन इकॉनॉमिक जायन्ट्स टू डिफरन्ट सिस्टिम्स (२००४).
क्लेईन यांना नोबेल स्मृती पुरस्काराबरोबरच १९५९ मध्ये जॉन बेट्स क्लार्क मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
क्लेईन यांचे अमेरिकेतील ग्लॅडविन (Pennsylvania) येथे निधन झाले.
समीक्षक – संतोष दास्ताने