एडवर्ड सी. प्रिसकॉट : (२६ डिसेंबर १९४०). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. सूक्ष्म अर्थशास्त्र, आर्थिक धोरणातील सातत्य आणि व्यापारचक्रावर परिणाम करणारे घटक या संदर्भातील संशोधनाबद्दल प्रिसकॉट यांना नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ फिन इ. किडलँड (Finn E. Kydland) यांच्या बरोबरीने २००४ मध्ये अर्थशास्त्रविषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार देण्यात आला.

प्रिसकॉट यांचा जन्म न्यूयॉर्कमधील ग्लेन्स फॉल्स येथे झाला. १९६२ मध्ये स्वार्थमूर कॉलेजमधून त्यांनी गणितविषयात पदवी मिळविली, तर १९६३ मध्ये त्यांनी केस वेस्टर्न रिझर्व विद्यापीठातून प्रचालन संशोधन (Operation Research) या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९६७ मध्ये त्यांनी कार्नेगी मेलॉन विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातील पीएच. डी. पदवी मिळविली.

प्रिसकॉट यांनी १९६६–१९७१ या काळात युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया येथे अध्यापन केले. नंतर १९७१–१८८० या काळात कार्नेगी मेलॉन विद्यापीठात ते प्राध्यापक होते. प्रिसकॉट यांनी कार्नेगी मेलॉन विद्यापीठातील टेपेर स्कूल ऑफ बिझनेसमध्ये कार्यरत असताना महत्त्वाचे संशोधनकार्य केले. ते १९८०–१९९० या काळात इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिव्ह्यू या वृत्तपत्राचे संपादक होते. १९८१–२००३ या काळात ते मिनेसोटा विद्यापीठात अर्थशास्त्रविषय शिकवू लागले. दरम्यान १९७८ मध्ये शिकागो विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक असताना तेथे त्यांची फोर्ड फौंडेशन प्रोफेसर म्हणून नियुक्ती केली गेली. २००३ मध्ये ते ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक, सांता बार्बरा येथे मॅक्सवेल ॲण्ड मेरीपेलीश अध्यासन, तर २००६ मध्ये न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी येथे शिन्सेई बँक अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले.

प्रिसकॉट यांनी किडलँड यांच्या सहकार्याने संशोधन केले. अमेरिकेच्या वित्त व चलनविषयक धोरणावर त्यांच्या विचारसरणीचा प्रभाव होता. त्यामुळे अमेरिका, स्वीडन, न्यूझीलंड व इंग्लंडमधील मध्यवर्ती बँकांना स्वतंत्र अशी धोरणे ठरविण्यासाठी आवश्यक ती वैचारिक बैठक उपलब्ध झाली. १९७७ मध्ये लिहिलेल्या ‘रूल्स रॅदर दॅन डिस्क्रिशन : दि इनकन्सिस्टन्सी ऑफ ऑप्टिमल प्लॅनिंगʼ या लेखात महागाईचा दर कमी करण्याच्या शासकीय धोरणांमुळे लोकांच्या त्याबाबतच्या अपेक्षा प्रफुल्लित होतात; परंतु अल्पमुदतीच्या रोजगारनिर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने वारंवार व्याजदर कपात केल्यास शासनाच्या विश्वासार्यतेवर परिणाम होतो. कारण, राजकीय प्रक्रिया आजच्या नागरिकांच्या समस्या व मिळणारे लाभ यांनुसार घडत असते. १९८२ मधील ‘टाइम टू बिल्ड ॲण्ड ॲग्रीगेट फ्लक्च्यूएशन्सʼ या दुसऱ्या लेखात उभय प्राध्यापकांनी व्यापारचक्राच्या विश्लेषणासाठी स्थूल अर्थशास्त्रीय प्रणाली विकसित केली आणि असे निदर्शनास आणले की, तंत्रज्ञानातील बदल तसेच वस्तूंच्या पुरवठ्यातील चढउतार यांचा गुंतवणूक व किंमतपातळीवर परिणाम होतो. त्यामुळे दीर्घकालीन आर्थिक विकासात कमी मुदतीचे स्पर्शतरंग निर्माण होतात. सदरचे गृहीतक तपासण्यासाठी तसेच दुसऱ्या जागतिक महायुद्धाची अखेर आणि १९८० दरम्यानच्या काळात उत्पादन गुंतवणूकसेवन, श्रमिक उत्पादकता व रोजगारीच्या क्षेत्रातील बदलांचा अभ्यास करण्यासाठी प्रणाली विकसित केली. या प्रणालीच्या आधारे प्रिसकॉट व किडलँड यांनी वस्तूंच्या उत्पादनातील ७०% चढउतार तंत्रज्ञानातील बदल व विकास यांमुळे होतात, हे सिद्ध केले.

प्रिसकॉट हे स्थूल अर्थशास्त्र विषयातील एक महनीय व्यक्ती मानले जातात. स्थूल अर्थशास्त्रातील शोधनिबंधामुळे २०१२ मध्ये त्यांची गणना जगातील प्रभावी अर्थशास्त्रज्ञांच्या यादीत एकोणिसाव्या स्थानावर केली गेली. व्यापारचक्र व सर्वसाधारण समतोल (General Equilibrium) सिद्धांत आणि कालश्रेणीतील स्पर्शतरंग कमी व्हावेत, यासाठी विकसित केलेले त्यांचे ‘हॉड्रिक-प्रेसकॉट फिल्टरʼ हे प्रतिमान प्रसिद्ध आहे. जानेवारी २००९ मध्ये प्रिसकॉट आणि इतर २५० अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापकांनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांना खुले पत्र लिहून ‘अमेरिकन रिकव्हरी ॲण्ड रिइन्व्हेस्टमेंट ॲक्टʼ संमत करण्यास विरोध केला. सदरचे पत्र न्यूयॉर्क टाइम्स, ॲरिझोनो पब्लिक यांसह अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केले गेले. सध्या प्रिसकॉट हे फेडरल रिझर्व बँक ऑफ मिनीॲपोलिसचे अर्थतज्ज्ञ व ॲरिझोना विद्यापीठाच्या व्ही. पी. केरे स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

प्रिसकॉट यांचे स्वत: व सहकाऱ्यांबरोबर लिहिलेले पुढील ग्रंथ प्रसिद्ध आहेत : कॉन्ट्रक्च्युअल अरेंजमेंट इंटरटेम्पोरेल ट्रेड (१९८७), रिकर्सिव मेथड्स इन इकॉनॉमिक डायनॅमिक्स (१९८९), ऑन दि इक्विलिब्रियम कन्सेप्ट फॉर ओव्हरलॅपिंग जनरेशन्स ऑर्गनायझेन्स (२०००), बॅरियर्स टू रिचेस (२००२), ग्रेट डिप्रेशन ऑफ दि ट्वेंटिथ सेंचुरी (२००७), इक्विटी रिस्क प्रिमियम (२०१४). शिवाय प्रिसकॉट यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत.

प्रिसकॉट यांना नोबेल स्मृती पुरस्काराबरोबर त्यांच्या अर्थशास्त्रातील संशोधनकार्याबद्दल पुढील सन्मान लाभले : अलेक्झांडर हेंडर्सन अवॉर्ड (१९६७), इकॉनॉमेट्रिक सोसायटीचे अधिछात्र (१९८०), अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सेसचे अधिछात्र (१९९२), इर्व्हिन प्लीन नेमर्स प्राइझ इन इकॉनॉमिक्स (२००२), युनायटेड स्टेट्स नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य (२००८).

दृकश्राव्य दुवा : https://www.nobelprize.org/prizes/economic-sciences/2004/prescott/speech/

समीक्षक – संतोष ग्या. गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा