अर्थशास्त्रविषयक संशोधन व प्रशिक्षण देणारी भारतातील सर्वांत जुनी व विख्यात संस्था. कै. रावबहाद्दुर रा. रा. काळे यांनी सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी (Servants of India Society) या संस्थेला दिलेल्या १.२० लक्ष रूपयांच्या देणगीतून ६ जून १९३० रोजी गोखले अर्थशास्त्र संस्था याची स्थापना पुणे (महाराष्ट्र) येथे करण्यात आली.

भारतातील सामाजिक-आर्थिक मुद्द्यांवरील संशोधनाला समर्पित अशा या संस्थेस भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक ना. गोपाळ कृष्ण गोखले यांचे नाव देण्यात आले. देशाचे प्रशासन प्रभावीपणे चालविण्यासाठी भारतीयांमध्ये शिक्षण प्रसार करण्याच्या आणि भारतीयांचा क्षमता विकास करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली. अर्थशास्त्रातील उच्च शिक्षण आणि संशोधन यांमध्ये दिलेल्या भरीव योगदानामुळे १९९३ मध्ये संस्थेस अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. डॉ. धनंजयराव गाडगीळ हे संस्थेचे पहिले संचालक होते. त्यांच्यानंतर नीळकंठ रथ; डी. सी. वाधवा; पुरुषोत्तम माथुर; विकास चित्रे; वि. म. दांडेकर; अजित सिन्हा आणि अरूप महारत्ना (कार्यकारी संचालक) यांचा समावेश होतो. सध्या डॉ. राजीव कुमार हे संस्थेचे कुलपती, तर प्रा. राजस परचुरे हे संस्थेचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहात आहेत.

परिसर : संस्थेचे प्रशासकीय परिसर फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.एम.सी.सी. महाविद्यालय यांच्या मधोमध ८ एकरांवर, तर बी.एम.सी.सी. महाविद्यालयाच्या पश्चिमेस ५.३९ एकरांवर निवासी परीसर आहे. ना. गोपाळ कृष्ण गोखले यांनी वास्तव्य केलेला बंगला अजूनही संस्था परिसरात असून त्या बंगल्याशेजारी त्यांच्या काळातील विशालकाय वटवृक्ष आजही तेथे आहे.

कामकाज व व्यवस्थापन समिती : संस्थेच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी कुलपती, संचालक आणि सहसंचालकासह व्यवस्थापन समितीवर आहे. संस्थेच्या व्यवस्थापन समितीमध्ये संचालक, सहसंचालक, कुलपतीनियुक्त ३ प्रतिनिधी, केंद्र सरकारनियुक्त १ प्रतिनिधी, भारत सेवक समाजाचे २ प्रतिनिधी, अध्यापकांचे ४ प्रतिनिधी आणि १ निबंधक अशा १३ जणांचा समावेश आहे. संस्थेचे संचालक हे व्यवस्थापन मंडळाचे प्रमुख असतात.

आर्थिक साह्य व अनुदाने : संस्थेमधील संशोधन, अध्यापन, ग्रंथप्रकाशन, प्रशासनकार्य इत्यादी विभागांकरिता केंद्र सरकार, राज्य सरकार, रिझर्व बँक, नाबार्ड, नामवंत व्यक्ती, इतर संस्था तसेच रॉकफेलर प्रतिष्ठान, फोर्ड प्रतिष्ठान यांसारख्या सुविख्यात आंतरराष्ट्रीय संस्थांकडून संस्थेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक साह्य व अनुदाने दिली जातात.

संशोधन योगदान : जेव्हा भारतामध्ये आर्थिक व सामाजिक संशोधन व सर्वेक्षण करण्याची पद्धती रूढ नव्हती, तेव्हा या संस्थेची स्थापना झाली. संस्थेने विविध आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी सम्यक सर्वेक्षण तंत्र विकसित केले. ज्यामध्ये कृषी अर्थशास्त्र, धरणयोजनांसाठी येणारा खर्च व त्यांपासून मिळणारे फायदे, लोकसंख्याशास्त्र, शहरांची वाढ व तत्संबंधीचे प्रश्न, जिल्हा किंवा अन्य शासकीय भागांचे आर्थिक नियोजन यांसारख्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी करावयाची पाहणी यांचा समावेश होतो. कालांतराने भारतामध्ये याचा वापर विविध ठिकाणी करण्यात आले.

संस्थेने आपल्या स्थापनेपासूनच सैद्धांतिक व विश्लेषणात्मक संशोधनामध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असून अर्थशास्त्रातील उच्च शिक्षण आणि संशोधनामध्ये भरीव असे योगदान दिलेले आहे. अर्थशास्त्राशी सबंधित विविध विषयांमध्ये आणि क्षेत्रांमध्ये संस्थेने गुणवत्तापूर्ण असे संशोधन केलेले आहे. विविध आर्थिक सिद्धांत आणि आर्थिक समस्या सोडविण्यासाठी संस्थेने केलेल्या गुणवत्तापूर्ण संशोधनाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे.

उल्लेखनीय संशोधने : संस्थेने आजपर्यंत पुढील महत्त्वपूर्ण संशोधने केली आहेत : (१) प्रवरानगर येथे भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारणीमध्ये आणि एकूणच सहकार चळवळीमध्ये सैद्धांतिक साह्य. (२) ग्रामीण माहिती संकलनासाठी सर्वेक्षण पद्धतीचा विकास. (३) जलसंधारण प्रकल्प खर्च-लाभ विश्लेषणपद्धतीचा विकास. (४) नाबार्डच्या संस्थात्मक संरचनेची आराखडा निर्मिती. (५) महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेची आराखडा निर्मिती. (६) राष्ट्रीय कृषीविमा योजनेची आराखडा निर्मिती. (७) आरबीआयसाठी महागाई-निर्देशांकाधारित रोख्यांची आराखडा निर्मिती. (८) महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी सर्वसमावेशक जिल्हा विकास योजना निर्मिती. (९) वेतन दर, उत्पादन-खर्च, अन्न सुरक्षा आणि ग्रामीण-शहरी स्थलांतर इत्यादींवर राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमुळे झालेल्या परिणामांचा अभ्यास.

यांशिवाय संस्थेने अलीकडील काळात निवडणूक आयोगाच्या साह्याने केलेले (१) निवडणूकविषयक सर्वेक्षण, (२) विदर्भ व मराठवाड्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांच्या अनुषंगाने केलेले संशोधन, (३) मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने केलेले मराठा समाजाचे जिल्हानिहाय सर्वेक्षण इत्यादी महत्त्वपूर्ण संशोधन केलेले आहे.

संशोधन केंद्रे : संस्थेमध्ये सध्या चार संशोधन केंद्रे असून ज्याठिकाणी शेतीसंबंधीच्या प्रश्नांवर, लोकसंख्या संबंधी मुद्द्यांवर, विविध सामाजिक-आर्थिक मुद्द्यांवर तसेच शाश्वत विकासासंबंधी संशोधन केले जाते. यामध्ये (१) कृषी-अर्थशास्त्र संशोधन केंद्र, (२) लोकसंख्या अभ्यास केंद्र, (३) सामाजिक वंचितता व सर्वसमावेशक धोरण अभ्यास केंद्र आणि (४) डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्राम-विकास अभ्यास केंद्र यांचा समावेश होतो.

संशोधन अध्यासने : संस्थेमध्ये सध्या चार प्रतिष्ठित संशोधन अध्यासने सुरू असून त्याठिकाणी अध्यापन व संशोधन केले जाते. त्यामध्ये (१) मौद्रिक व वित्त अर्थशास्त्रातील अध्यापन आणि संशोधनाकरिता रिझर्व बँक अर्थसाह्यित अध्यासन, (२) विकास व नियोजन यासंबंधी अध्यापन आणि संशोधनाकरिता नियोजन आयोग अर्थसाह्यित अध्यासन, (३) आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील अध्यापन आणि संशोधनाकरिता फोर्ड फौंडेशन अर्थसाह्यित अध्यासन आणि (४) औद्योगिक अर्थशास्त्रातील अध्यापन आणि संशोधनाकरिता कमलनयन बजाज फाउंडेशन अर्थसाह्यित अध्यासन या चार अध्यासानांचा समावेश होतो.

शिक्षण : संस्थेमध्ये संशोधनाबरोबरच अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणही देण्यात येते. विद्यापीठ अनुदान आयोगाने जून १९६४ मध्ये गोखले अर्थशास्त्र संस्थेस अर्थशास्त्रविषयक अभ्यासाचे प्रगत केंद्र म्हणून मान्यता दिली. जुलै १९७२ मध्ये अर्थशास्त्र विषयासाठी पुणे विद्यापीठाचे पदव्युत्तर शिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. पुढे १९९३ मध्ये संस्थेस अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आल्यानंतर सबंधित पदव्युत्तर शिक्षण केंद्र संस्थेच्या नावाने चालविण्यात येऊ लागले. सध्या संस्थेमार्फत अर्थशास्त्र, वित्तीय अर्थशास्त्र, कृषी-व्यवसायाचे अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय व्यापार व वित्त अर्थशास्त्र या चार विषयांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम. ए) आणि पीएच. डी. अभ्यासक्रम चालविला जातो. या अभ्यासक्रमांसाठी चाचणी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते. दरवर्षी साधारणतः १६० विद्यार्थ्यांना विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येतो.

ग्रंथालय : १९०५ मध्ये सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी या संस्थेने सार्वजनिक ग्रंथालय सुरू केले. या ग्रंथालयाच्या संस्थापकांपैकी ना. गोपाळ कृष्ण गोखले हे एक होत. पुढे ग्रंथालयास डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचे नाव देण्यात आले. १९३० पासून हे ग्रंथालय गोखले अर्थशास्त्र संस्थेचे ग्रंथालय म्हणून काम करू लागले. संस्थेच्या ग्रंथालयामध्ये सध्या विविध ज्ञानशाखांशी सबंधित सुमारे २,८०,८०२ ग्रंथ असून देशातील मोठ्या ग्रंथालयांत याचा समावेश होतो. संस्थेतर्फे १९५९ पासून अर्थविज्ञान  नावाचे त्रैमासिक प्रसिद्ध करण्यात येते. त्यामध्ये संस्थेतील चालू संशोधनकार्यावर आधारलेले लेख व इतर माहिती प्रसिद्ध केली जाते. ग्रंथालयामध्ये पुस्तकांशिवाय सुमारे १,८७५ प्रकारची नियतकालिके, सुमारे ४०० अप्रकाशित प्रबंध व प्रबंधिका, नकाशे, इत्यादींचा समावेश आहे. तसेच विविध प्रशासकीय वार्षिक अहवाल, क्रमिक प्रकाशित अहवाल, वार्षिक चर्चासत्र आवृत्त्या आणि इतर प्रकाशने अशा प्रकारची सुमारे ५२,००० क्रमिक प्रकाशने ग्रंथालयात उपलब्ध आहेत. ग्रंथालयामध्ये इ. स. १६८० ते इ. स. १९४० दरम्यान प्रकाशित झालेली ५,००० दुर्मिळ पुस्तके असून ही पुस्तके सध्या डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत. यांशिवाय अठराव्या व एकोणीसाव्या शतकातील केंद्र-राज्य कायदेमंडळांच्या कामकाजाची इतिवृत्ते, घटनात्मक वादविवादांसंबंधीच्या नोंदी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे १८८५ नंतरच्या कामकाज आणि ठरावांसंबंधीचे अहवाल (५८ आवृत्त्या), १७९९ ते १८०५ आणि १८७४-७५ पासून ते  आतापर्यंतच्या केंद्रीय अंदाजपत्रकांच्या प्रती, १८७२ पासूनचे जनगणना अहवाल, संयुक्त राष्ट्रे, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, यूरोपीयन समुदाय, कॅनडा इत्यादी सरकारची प्रकाशने, भारतातील स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरची राजपत्रे, १९६० नंतरची महाराष्ट्र सरकारची राजपत्रे इत्यादी ग्रंथालयात जतन करून ठेवले आहेत.

सदर ग्रंथालयाचा लाभ देशभरातील संशोधक विद्यार्थी, अध्यापक, प्रशासक, नियोजनकार आणि सर्वसामान्य व्यक्ती घेत असतात. ग्रंथालयास ब्रिटीशकालीन आणि आधुनिक स्थापत्यशैलीचा मिलाप असलेली चार मजली सुसज्ज अशी इमारत लाभलेली आहे. २००० पासून ग्रंथालयाचे पूर्णतः संगणकीकरण झाले असून २०११ मध्ये ग्रंथालय ऑनलाईन झालेले आहे.

स्मृती व्याख्याने : संस्थेमार्फत विविध विषयांवर स्मृती व्याख्याने आयोजित केली जातात. (१) काळे स्मृती व्याख्यान : दरवर्षी संस्थेच्या स्थापनादिनी ‘काळे स्मृती व्याख्यान’ आयोजित  केले जाते. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ७०पेक्षा जास्त व्याख्याने झाली असून यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जॉन मथाई, पी. सी. महालनोबीस, व्ही. के. आर. व्ही. राव, के. एन. राज, वि. म. दांडेकर, आय. जी. पटेल, डॉ. मनमोहन सिंग, जगदीश भगवती, सी. रंगराजन, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इत्यादी नामवंतांनी व्याख्याने दिली आहेत. सदर उपक्रमांतर्गत दिलेली सर्व व्याख्याने प्रकाशित करण्यात आली असून ती ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

(२) कुंदा दातार स्मृती व्याख्यान : सदर उपक्रमांतर्गत स्त्रीयांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण, स्त्री विकास व त्यासंबंधीची धोरणे यांवर व्याख्याने आयोजित केली जातात.

(३) पी. आर. दुभाषी सार्वजनिक व्याख्यान : सदर उपक्रमांतर्गत सार्वजनिक धोरणांशी संबंधित विषयांवर व्याख्याने आयोजित केली जातात.

भारतातील सामाजिक व आर्थिक या विषयांवर संशोधन करण्याबरोबरच अर्थशास्त्राचे नामवंत अभ्यासक, संशोधक घडविण्यामध्ये गोखले अर्थशास्त्र संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

समीक्षक – राजस परचुरे

प्रतिक्रिया व्यक्त करा