प्रत्यक्ष लोकशाही : लोकशाही शासन पद्धतीमध्ये प्रत्यक्ष आणि प्रातिनिधीक लोकशाही असे दोन महत्वाचे प्रकार आहेत. नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागावर आधारित राज्यव्यवस्था म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही होय. प्राचीन ग्रीक काळातील अथेन्स या मगर राज्यामध्ये ख्रिस्तपूर्व पाचव्या आणि चौथ्या शतकात अशा प्रकारची राज्यव्यवस्था अस्तित्वात होती. शिवाय भारतातील खेड्यांमधून परंपरागतरीत्या चालत आलेल्या ग्रामसभांत प्रत्यक्ष लोकशाहीची पद्धत दिसून येते असा युक्तीवाद केला जातो. प्रातिनिधीक लोकशाहीच्या नेमकी उलट अशी  प्रत्यक्ष लोकशाही ही कल्पना आहे. प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये लोक प्रतिनिधीचाच सहभाग असतो तर प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये सार्वजनिक निर्णय प्रक्रियेत सर्व नागरिक प्रत्यक्षरीत्या सहभागी होत असतात. प्राचीन ग्रीक नगरराज्ये आकाराने लहान होती. स्त्रिया, गुलाम, परकीय रहिवासी इत्यादींना नागरिकत्वाचा दर्जा नसल्याने नागरिकांची संख्याही मर्यादित होती. सार्वजनिक प्रश्नाचे स्वरूपही आजच्या इतके गुंतागुंतीचे नसल्याने सर्व सामान्य नागरिकांस परस्परांच्या सल्ला मसलतीने सार्वजनिक प्रश्न सोडविता येत असत. त्यामुळे सार्वजनिक निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग शक्य आणि व्यवहार्य होता.

अथेन्सच्या नगरराज्यामध्ये सर्व प्रौढ नागरिकांची मिळून एक सर्वसाधारण सभा होती. मुख्य प्रशासक, लष्कर प्रमुख, कोषाध्यक्ष इ.पदाधिकाऱ्यांची निवड या सर्वसाधारण सभेकडूनच केली जाई . कायदे निर्मिती, कायद्याची कार्यवाही आणि न्यायदान ही कामे नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागातूनच पार पाडली जात असत. नागरिकांना विचार आणि अभिव्यक्तीचे संपूर्ण स्वातंत्र्य होते. तसेच सर्व निर्णय हे बहुमताने घेतले जात. प्रत्यय लोकशाहीची कल्पना आजच्या काळात अव्यवहार्य ठरत असली तरी लोकांचा राज्यकारभारातील सहभाग वाढवून लोकशाही राजपद्धती ही अधिकाधिक लोकाभिमुख कशी करता येईल या दृष्टिने जनपृष्छा, सार्वमत, जनोपक्रम जाणि प्रत्यावाहन यासारख्या मार्गांचा उपयोग करून राज्यकारभारामध्ये जनतेचा प्रत्यक्ष सहभाग वाढविण्याचा प्रयत्न स्वित्झर्लंड, फ्रान्स व अमेरिकेतील काही राज्यात केलेला आहे. जनपृष्ठा, सार्वमत, जनोपक्रम आणि प्रत्यावाहन या चार मार्गाना प्रत्यक्ष लोकशाहीची साधने असे म्हणतात. अर्थात अशा साधनांमुळे प्राचीन काळातील प्रत्यक्ष लोकशाही साकार होते असे मात्र नाही. प्रातिनिधिक लोकशाहीपेक्षा प्रत्यक्ष लोकशाहीमाये जनतेच्या सार्वभौमत्वाचा प्रत्यय खऱ्या अर्थाने येतो असा युक्तिवाद नेहमी केला जातो. तत्वतः तो बरोबरच आहे. तथापि प्रत्यक्ष लोकशाही ही आधुनिक व उत्तर आधुनिक काळात अव्यवहार्य आहे.

संदर्भ : Edward N. Zalta (Principal Editor), Democracy,  Stanford University, 2006.