गावांमध्ये आणि शहरांमध्ये विद्युत पुरवठा दुय्यम वितरण प्रणालीने केला जातो. त्यात घरगुती, छोटे व्यावसायिक यांना २४० V एक कला (Single phase) किंवा ४१५ V त्रिकला (Three phase) या पातळीवर पुरवठा केला जातो. लोखंडी किंवा पूर्व प्रतिबलित काँक्रीट (Prestressed Cement Concrete) खांबांवर निरोधक (Insulator) बसविले जातात आणि त्यावरून विद्युत भारित तारांमार्फत विद्युत पुरवठा होतो. तारांवर आवरण नसते आणि त्यासाठी  प्रामुख्याने ॲल्युमिनियम व त्याच्या मिश्रधातूंचा वापर होतो (AAC / ACSR /AAAC).

आ. १. त्रिकला हवाई गुच्छित केबलची रचना : (१) संदेश तारेचे पीव्हीसी निरोधन, (२) जस्ताचा लेप दिलेली पोलादी तार, (३) निरोधक पटल, (४) तांब्याचे पटल, (५) ॲल्युमिनियम वाही, (६) पीव्हीसी बाह्य आवरण, (७) वाही पटल, (८) एक्स एलपीई निरोधन.

तारमार्ग संचालनातील मर्यादा : तारांवर आवरण नसल्याने त्याच्या बांधकामात व संचालनात काही मर्यादा येतात. आंतरप्रावस्था स्फुल्लिंग (flashover) टाळण्याच्या दृष्टीने प्रावस्थांच्या तारांमध्ये विद्युत दाबानुसार किमान अंतर ठेवावे लागते. तसेच तारमार्ग टाकण्यासाठी प्राधान्यक्रम (Right Of Way – ROW) ठेवावा लागतो. तारमार्गावर बाजूच्या  झाडाच्या फांद्या पडल्यास किंवा खांबांवरील निरोधक खराब झाल्यास प्रवाह खंडित होतो. वादळामुळे तारांमध्ये लघु परिपथ खंडित (Short Circuit) होण्याची शक्यता असते. तारांवर आवरण नसल्याने गैरमार्गाने त्यावर आकडे टाकून वीजेची चोरी होऊ शकते.

हवाई गुच्छित केबलच्या / वाहीच्या वापराने बऱ्याच अडचणींवर मात करता येते.  आ. १ मध्ये त्रिकला हवाई गुच्छित केबलची रचना दाखवली आहे.

हवाई गुच्छित केबलची रचना : त्रिकला केबलमध्ये तीन वेटोळ्या (Stranded) ॲल्युमिनियमच्या वाही असून त्यावर निरोधक  (Insulating) पटले असतात. मध्यभागी संदेश तार (Messenger Wire) असते. संदेश तारेवर अन्य तारा गुंडाळल्या जातात. संदेश तार अन्य तारांना आधार देते तसेच काही बाबतीत तठस्थ तार (Neutral Wire) म्हणूनही वापर केला जातो. अन्यत: निराळी तठस्थ तार वापरली जाते. संदेश तार जस्ताचा लेप दिलेली (Galvanised) पोलादी किंवा ॲल्युमिनियमचे मिश्रधातू वापरून केली जाते. संदेश तार उघडी किंवा निरोधक  पटलासहित असते. मुख्य वाहीवर निरोधक  पटल असल्याने तारा परस्परांना जुळवून ठेवल्या तरी आंतरप्रावस्था स्फुल्लिंग होण्याचा धोका नसतो. तसेच तारांमध्ये किमान अंतर ठेवण्याची आवशक्यता नसते.  संदेश तार आकड्याच्या साहाय्याने खांबावर, झाडावर, भिंतीवर टांगता येते. मुख्य वाहीवर निरोधक पटले असल्याने निरोधक  (Insulator) वापरावे लागत नाहीत. एक कला प्रणालीकरीता मुख्य तारा तीन ऐवजी एक वापरली जाते. हवाई गुच्छित केबल संबंधित प्राचल (parameter) भारतीय मानक (IS) १४२५५ ने प्रमाणित केले आहेत. आ. २ मध्ये हवाई गुच्छित केबल व रूढ प्रथेचे वाही बसविण्याची पद्धती दाखवली आहे.

 

 

हवाई गुच्छित केबल

हवाई गुच्छित केबलचे फायदे : (१) निरोधकची गरज नसल्याने व खांब, झाडे इ. वर आकडा लावून तारमार्ग टाकणे शक्य असल्याने  बांधकाम सोपे होते. (२) केबल नजिकच्या इमारत किंवा झाडापासून किमान अंतर राखण्याची गरज नसते. या कारणांनी तारमार्ग  बांधकामाच्या खर्चात बचत होते. (३) अरुंद प्राधान्यक्रम (Right of Way) चालू शकतो.  हवाई गुच्छित केबलची मांडणी सुटसुटीत असते. (४) वादळ किंवा झाडाच्या फांद्या केबलवर पडून वीजप्रवाह खंडित होण्याची शक्यता नसते. निगराणी व निरीक्षणाची आवश्यकता कमी होते. (५) प्रचलित पद्धतीपेक्षा वीज पुरवठ्याची विश्‍वसनीयता (Reliability) चांगली असते. (६) हवाई गुच्छित केबलला दुसऱ्या केबलला जोडण्यासाठी खास प्रकारचे संधानी (Connector) लागतात, त्यामुळे गैरमार्गाने त्यावर आकडे टाकून वीजेची चोरी होऊ शकत नाही. यामुळे अतांत्रिक (Non-technical) कारणांनी होणारी हानी कमी करण्यास मदत होते. (७) हवाई गुच्छित केबलच्या वजनामुळे दोन खांबातील अंतर कमी होते, तसेच या केबलची किंमत जास्त असल्याने प्रचलित पद्धतीपेक्षा याला खर्च थोडा जास्त येतो. (८) भारतात व जगभरात विशेषत: ग्रामीण विद्युतीकरणात हवाई गुच्छित केबलचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.

पहा : विद्युत  ग्रिड.

संदर्भ :

• Central Board of Irrigation & Power, Techno-Economic Feasibility Study of Applying Aerial Bunched Conductor (ABC) in Low Voltage Distribution as well as 11 kV, New Delhi – Publication No.114.

• Central Board of Irrigation & Power, Modern Trends & Practices in Power Sub-Transmission & Distribution System, New Delhi – Publication No. 250

• Bureau of Indian Standards – IS 14255: 1995 Aerial Bunched Cable for working voltages up to and including 1100 V.

  समीक्षक : एस.डी. भिडे