विद्युत तेजोवलय

विद्युत शक्तीचे मोठ्या प्रमाणात वहन करण्यासाठी तंत्र-आर्थिक (Techno-Economic) दृष्टिकोनातून  अति  उच्च व्होल्टता  (Extra High Voltage- EHV) किंवा  परोच्च व्होल्टता  (Ultra High Voltage- UHV) पारेषण वाहिनी योजल्या जातात. काही विशिष्ट परिस्थितीत अशा पारेषण वाहिन्यांच्या वाहीच्या (Conductor )  बाह्य पृष्ठभागावरील विभव प्रवणता (Potential Gradient) जास्त झाल्याने त्याच्या सभोवतीच्या हवेचे आयनन (Ionisation) होते, यास ‘विद्युत तेजोवलय’ असे म्हणतात.

विद्युत तेजोवलयाचे परिणाम : विद्युत तेजोवलयाच्या‍ निर्मितीमुळे उष्णता, प्रकाश, ऐकू येणारी कुरकुर  (Audible Noise), रेडिओ प्रसारणात व्यत्यय  (Radio Interference) या गोष्टी निर्माण होतात. तसेच हवेचे पृथक्करण होऊन ओझोन, नायट्रिक ऑक्साइड असे वायू निर्माण होतात.  यासाठी लागणारी ऊर्जा ही संबंधित विद्युत यंत्रणेतून घेतली जाते. हा एक प्रकारे विद्युत व्यय असल्याने त्यावर नियंत्रण करणे अनिवार्य असते.  पारेषण वाहिनीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ऐकू येणाऱ्या कुरकुरचा त्रास होऊ शकतो. परमप्रसर विरूपणाच्या (Amplitude Modulation-AM) रेडिओ प्रसारणात व्यत्यय येतो. या सर्व बाबी टाळण्यासाठी विद्युत तेजोवलय तयार होणार नाही याची कार्यवाही करावी लागते.

विद्युत तेजोवलय निर्मितीची कारणे : विद्युत तेजोवलयाची निर्मिती ही बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. वाहीची व्होल्टता पातळी, वाहीचा व्यास, वाहींची मांडणी, संबंधित ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची उंची, स्थानिक वातावरण, वाहीच्या पृष्ठभागाची स्थिती अशा अनेक बाबींवर ही निर्मिती अवलंबून असते.

विद्युत तेजोवलय प्रतिबंध : सर्वसाधारणतः वाहीची व्होल्टता  पातळी ३४५ kV पेक्षा अधिक असणाऱ्या संयंत्रणाचे संकल्पनेत  विद्युत  तेजोवलयाच्या  बाबतीत विशेष दक्षता घ्यावी लागते.  विभव प्रवणता (Potential Gradient) वाहीच्या बाह्य पृष्ठभागावर जास्त असते. अन्य बाबी समान असताना अधिक व्यास असलेल्या वाहीचे  बाबतीत विभव प्रवणता कमी व्यासाच्या वाहीपेक्षा कमी असते. वस्तुतः प्रत्येक व्होल्टता  पातळीनुसार विद्युत तेजोवलयाच्या  दृष्टीने वाहीचा किमान छेद आकार (cross section) ठरविला जातो. उदा., २२० kV वाहिनीचे बाबतीत समुद्रसपाटीला वाहीचा किमान आकार ३०० चौमिमी. असावा लागतो.  ३४५ kV व त्यावरील संयंत्रणाचे बाबतीत एकल वाहीऐवजी गुच्छित वाही (Bunched Conductor) वापरतात.  गुच्छित वाहीचा आभासी व्यास हा वाहीमधील अंतराप्रमाणे वाढतो व त्यायोगे विद्युत तेजोवलयास प्रतिबंध होतो. वाहीचे पृष्ठभागावरील धूलिकण, आकाराचा अनियमितपणा, बांधकामावेळी पृष्ठभागाची झालेली खराबी इत्यादी बाबींमुळे विद्युत तेजोवलयाची निर्मिती होते. त्यामुळे बांधकामाचे वेळी वाहीची हाताळणी काळजीपूर्वक करावी लागते. वाहीच्या उत्पादनाच्या वेळी पृष्ठभाग शक्य तितका गुळगुळीत, धूलिकणविरहित राखणे आवश्यक असते.

समुद्रसपाटीपासून अधिक उंचीवर तसेच पावसाळी वातावरणात विद्युत तेजोवलयाची निर्मिती अधिक होते. परिणामतः ऐकू येणाऱ्या कुरकुरचा त्रास वाढतो, वाहिनीच्या आसपास ‘हिस्सीग’ ध्वनी ऐकू येतो. परमप्रसर विरूपित रेडिओ प्रसारणात विद्युत तेजोवलयाच्या निर्मितीने व्यत्यय येतो. मात्र कंप्रता विरूपण (Frequency Modulation-FM) रेडिओ प्रसारणात विद्युत तेजोवलयाचा काही परिणाम होत नाही.

एफ. डब्लू. पीक यांनी केलेल्या संशोधनानुसार समुद्रसपाटीला (हवेचा दाब – पाऱ्याचा  स्तंभ ७६० मिमी.) २५ से. तापमानात विभव प्रवणता २९.८ kV / सेंमी. असताना हवेचे आयनन (Ionisation) सुरू होते. ज्या व्होल्टता पातळीला विद्युत तेजोवलयाची सुरुवात होते त्यास विघटनकारी क्रांतिक विद्युत दाब (Disruptive Critical Voltage) असे म्हणतात. त्याहून अधिक पातळीवर विद्युत तेजोवलय निळसर रंगानी दृश्य स्वरूपात दिसतो, त्यास दृश्य विद्युत तेजोवलयी विद्युत दाब (Visual Corona Voltage) म्हणतात. इच्छित ठिकाणचे वातावरणीय मापदंड ध्यानात घेऊन वाहीची निवड केल्यास विद्युत तेजोवलयाचे प्रभाव टाळणे शक्य होते.

संदर्भ :

•  Begamudre, Rakosh Das Extra High Voltage Ac Transmission Engineering, New Age International Publ. Ltd., 2nd Ed.- 1990, New Delhi, Reprint 2004.

• Deshpande, M. V. Electrical Power System Design, Tata McGraw-Hill Publishing Co. Ltd., 4th Ed., New Delhi, 1992.

• Kothari, D.P.; Nagrath, I.J. Modern Power System Analysis, Tata McGraw Hill , New Delhi, 1980.

• Westinghouse Electric Corporation, Electrical Transmission and Distribution Reference Book, Oxford & IBH Publishing Company.

समीक्षक : एस. डी. भिडे