आबालाल रहिमान : (जन्म  १८५६ ते  १८६० दरम्यान – मृत्यू  २८ डिसेंबर १९३१). महाराष्ट्रातील  ⇨ आधुनिक चित्रकलेच्या कलापरंपरेतील एक श्रेष्ठ चित्रकार. संपूर्ण नाव अब्दुल अजीज रहिमान; परंतु ‘आबालालʼ या नावाने अधिक परिचित. त्यांच्या जन्माची निश्चित तारीख व सन ज्ञात नाही. कोल्हापूरमध्ये पारंपरिक मुस्लिम घराण्यात त्यांचा जन्म झाला. वडील अब्दुल रहिमान बाबाजी हे कोल्हापूर संस्थानात कारकून होते. ते शेती करीत. कुराणाच्या हस्तलिखित प्रतीही ते तयार करीत असत. त्यांतील प्रत्येक पानाभोवतीचे नक्षीकाम वडिलांबरोबर आबालालही करीत असत. त्यांच्या घराजवळ असलेल्या जिनगर कारागिरांची सोन्या-चांदीवरील कलाकुसर त्यांच्या पाहण्यात येत असे. त्यामुळे कौशल्य आणि कारागिरीचे संस्कार आबालाल यांच्यावर नकळत झाले. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातील राजाराम हायस्कूलमध्ये सहाव्या इयत्तेपर्यंत (सध्याच्या दहावीपर्यंत) झाले. त्यांना मराठी, संस्कृत, अरबी व इंग्रजी या भाषा अवगत होत्या. एकदा ब्रिटिश रेसिडेन्टच्या पत्नीने आबालाल यांची चित्रे पाहिली आणि त्यांच्यातील कलागुण ओळखून आबालाल यांनी ⇨ सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये रीतसर कलाशिक्षण घ्यावे, म्हणून त्यांच्या आई-वडिलांना प्रोत्साहित केले.

आबालाल यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये १८८०–८८ दरम्यान शिक्षण घेतले. तेथे शिक्षण घेणारे ते कोल्हापूरचे पहिले विद्यार्थी होत. रीजन्सी काउन्सिल व  ⇨ छ. शाहू महाराज यांच्याकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमधून त्यांच्या शिक्षणाची आर्थिक तरतूद झाली. त्या वेळी जॉन ग्रिफिथ्स हे प्राचार्य होते. आबालाल यांचा अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून नावलौकिक होता. त्यांच्या चित्रांच्या एका संचासाठी १८८८ मध्ये त्यांना व्हाइसरॉय सुवर्णपदक मिळाले. विद्यार्थिदशेतील त्यांची काही व्यक्तिचित्रे जे. जे. च्या संग्रहात आहेत. या चित्रांतून त्यांचे चित्रकलेवरील प्रभुत्व लक्षात येते.

व्यक्तिचित्रणात रेखाचित्राद्वारे (लाइन ड्रॉइंग) त्यांनी स्वतःचा ठसा उमटविला होता. त्यामुळे प्राचार्य व मुख्याध्यापक (विभागप्रमुख) यांनी त्यांची साहाय्यक म्हणून निवड केली. काही यूरोपीय चित्रकार जे. जे. त आले असताना आबालाल यांची चित्रे बघून ते आर्श्चयचकित झाले व ‘स्टाफची चित्रे विद्यार्थ्यांची चित्रे म्हणून दाखवता का?ʼ, असा प्रश्न त्यांनी केला; तेव्हा प्राचार्यांनी त्यांच्यासमोरच आबालाल यांना चित्रे काढण्यास सांगितली. त्यांनी काढलेली चित्रे बघून यूरोपीय चित्रकार खूश झाले.

आबालाल शिकत असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. शिक्षणानंतर ते कोल्हापूरला परतले, त्या वेळी वडिलांनी दुसरे लग्न केले होते. आबालाल यांनी लग्न करावे, अशी त्यांच्या आईवडिलांची इच्छा होती; पण त्यांना आवडलेल्या मुलीशी लग्न होत नसल्यामुळे ते अखेरपर्यंत अविवाहित राहिले. घर व कोल्हापूर सोडून जवळच्या कोटितीर्थाच्या रानावनांत, तलावाकाठी ते एकांतात राहत. देशी-परदेशी कागद, रंगसाहित्य, जे उपलब्ध होई ते, वापरून ते चित्रे काढीत. प्रसंगी खडू किंवा कोळसा वापरूनही त्यांनी चित्रनिर्मिती केली.

छ. शाहू महाराजांनी त्यांची दरबारी चित्रकार म्हणून नियुक्ती केली (१८९७). शिवाय त्यांची टेक्निकल स्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणूनही नेमणूक केली. त्यांचा पगार दरमहा पंचवीस रुपये इतका होता. टेक्निकल स्कूलमधील मुले सरदार घराण्यांतील होती. त्यांना आबालाल यांचा अभ्यासक्रम व शिस्त डाचू लागली. परिणामत: त्यांची मास्तरकी बंद झाली; पण पगाराचे २५ रुपये आयुष्यभर देण्याची आज्ञा छ. शाहू महाराजांनी केली. तेव्हापासून ‘आबालाल मास्तरʼ म्हणूनही ते ओळखले जाऊ लागले.

आबालाल यांनी हजारो चित्रे काढली असली, तरी त्यांची मोजकीच चित्रे उपलब्ध आहेत. त्यांनी राजघराण्यातील व्यक्तींची, इंग्रज रेसिडेन्टची, शिकारींची, पौराणिक व ऐतिहासिक प्रसंगांची चित्रे काढली. तसेच महाराजांकडे असलेले सुंदर अरबी उंट व घोडे चितारले. त्याचप्रमाणे गाय, कोंबडा, हत्तींची टक्कर (साठमारी) यांची चित्रे काढली. भोवतालचा निसर्ग, गोरगरीब, ग्रामस्थ हे त्यांच्या चित्रांचे विषय होते. व्यक्तिचित्रे, पौराणिक-ऐतिहासिक चित्रे, दैनंदिन जीवनाशी संबंधित चित्रे, प्राणी, पक्षी व शिकारींची दृश्ये, राजवाड्यातील रंगीत काचा, हस्तिदंत, चांदीच्या वस्तू, शालू इत्यादी अभिकल्पांसाठी (डिझाइनसाठी) जलरंग व तैलरंग या माध्यमांचा त्यांनी समर्थपणे वापर केला. कधी पातळ प्रवाही लेपन, तर कधी एकमेकांवर पातळ थर दिले. काही चित्रांत उत्स्फूर्त फटकारे, काहींत संयत रंगलेपन, तर कधी रंगांचे विभाजन, रंग घासणे, खरडणे अशी विविध तंत्रे व पद्धती त्यांनी वापरल्या.

हत्तींची टक्कर (साठमारी), तैलरंग माध्यम.

आबालाल यांच्या निसर्गचित्रणात साधारणत: तीन-चार प्रकार आढळतात : वर्णनात्मक, प्रगल्भ व उत्कट आविष्काराची, दृक्प्रत्ययवादी चित्रांची आठवण करून देणारी व निसर्गाशी तादात्म्यता दर्शवणारी चित्रे. अशा क्रमाने वाटचाल होत कलेचे उच्चतम आविष्कार त्यांच्याकडून झाले. गरिबीमुळे सामान्यत: त्यांनी लहान आकारांची चित्रे काढली; पण त्यांतही त्यांनी निसर्गाच्या भव्यतेचा परिणाम साधला. त्यांनी काढलेल्या कोल्हापुरातील रावणेश्वराच्या काही चित्रांत बेभान फटकारे आहेत, तर संध्यामठच्या चित्रांत सचेतन पण शांत, संयत गूढता आहे. या चित्रांत त्यांची असामान्य प्रतिभा व जोडीला सखोल तांत्रिक जाण यांचे एक एकात्म, उत्कट, दिव्य दर्शन घडते. आबालाल यांनी या चित्रांत आकाश व पाणी छोट्याछोट्या बिंदूंच्या साहाय्याने सचेतन व थरारते करण्याचा प्रयत्न केला आहे.

निसर्गचित्रणात त्यांनी समकालीन चित्रकारांच्या तुलनेत तंत्राबाबत प्रायोगिकतेची कास धरून मोठीच झेप घेतल्याचे आढळते. राजघराण्यातील व्यक्तिचित्रे, दरबारदृश्ये, पौराणिक व ऐतिहासिक प्रसंगांवरील चित्रे अशा व्यावसायिक चित्रांसोबतच त्यांनी स्वान्त:सुखाय हजारो चित्रे रंगविल्याची नोंद असून त्यांच्या या चित्रांमधून काळाच्या पुढे जाऊन आकार, रंग, रेषा व पोत यांद्वारे प्रयोग करीत त्यांनी सातत्याने दृश्य जगताचा शोध घेतला. दृक्प्रत्ययवाद्यांस समांतर अशी अभिव्यक्ती त्यांनी स्वयंस्फूर्तीने केली असावी.

पहिलवान (जलरंग माध्यम).

आबालाल यांच्या रेषेला नेमकेपणा व तरलता आहे. रंगछटांवर त्यांचा विलक्षण ताबा आहे. व्यक्तिचित्रण करताना त्यांची रेषा बाह्यरूपाबरोबर अंतरंगाचा वेध घेते, हेच या कलाकाराचे मोठे सामर्थ्य होते. पागोटाधारी तरुण, टपोऱ्या डोळ्यांची स्त्री, पेहेलवान आदी व्यक्तिचित्रे याची उत्तम उदाहरणे होत. आबालाल यांच्या दैनंदिनीतून त्यांची दिनचर्या, देण्याघेण्याचे आर्थिक व्यवहार आणि सहिष्णू, सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व दिसते. त्यांनी कुराणाच्या हस्तलिखित प्रती जशा सजविल्या, तसे छ. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग दाखविणारी चित्रेही काढली. ती सांगली व कोल्हापूर येथील संग्रहालयांत आहेत. मुसलमान धर्मातील वाईट रूढी व रीतीरिवाज यांविषयीचा तिरस्कारही त्यांच्या दैनंदिनीतून दृग्गोचर होतो.

एक लहान खोलीत आबालाल यांचा निवास असे. चित्र काढण्याची जागाही तीच होती. वृद्धापकाळात मधुमेहाने त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांच्या उत्तर आयुष्यात त्यांना त्यांचा पुतण्या फकरुद्दीन याची साथ होती. आपल्या भावाच्या पश्चात त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आबालाल यांनी घेतली. वृद्धापकाळाने त्यांचे कोल्हापूर येथे राहत्या घरी निधन झाले. योगायोगाने मृत्यूच्या आदल्याच दिवशी त्यांनी स्वत:चे जलरंगातील एक व्यक्तिचित्र आरशात पाहून काढले होते. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा ब्राँझचा अर्धपुतळा कोल्हापूर येथील रंकाळा तलावाकाठी उभारण्यात आला आहे.

संदर्भ :

  • कदम, संभाजी ‘तपस्वीʼ लेख, मराठी जागतिक परिषद.
  • कुलकर्णी, एस. एन. ‘आठवणीतले आबालाल मास्तरʼ, अक्षर दिवाळी अंक, १९८१.
  • बहुळकर, सुहास; घारे, दीपक ‘कलावंत व शिक्षकʼ, मास्टर स्ट्रोक्स, २००९.
  • बागल, माधवराव कोल्हापूरचे कलावंत, कोल्हापूर, १९६३.
  • मोटे, ह. वि., विश्रब्ध शारदा : भारतातील चित्रकला व शिल्पकला (खंड तिसरा), मुंबई, १९६३.
  • सडवेलकर, बाबूराव ‘महाराष्ट्राचे एक तपस्वी चित्रकार : आबालाल रहिमानʼ, मौज दिवाळी अंक, १९६७.

समीक्षक : मनीषा पाटील

This Post Has One Comment

  1. हर्षद कुलकणी

    छान माहीती कलातपस्व चीं

Comments are closed.