बागल, माधवराव खंडेराव : (२८ मे १८९५ – ६ मार्च १९८६). महाराष्ट्रातील सामाजिक-सुधारणा चळवळीतील कृतीशील कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, लेखक आणि चित्रकार. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे खंडेराव व कमलाबाई या दाम्पत्यापोटी झाला. खंडेराव बागल हे कोल्हापूर संस्थानात नोकरीस होते, नंतर त्यांनी नोकरी सोडून वकिलीचा व्यवसाय सुरू केला होता. माधवराव यांना काही काळ कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा सहवास लाभला होता. तसेच वडील खंडेराव बागल हे पक्के सत्यशोधकी विचारांचे असल्याने त्यांचा प्रभाव माधवराव यांच्यावर होता. माधवराव बागल हे शेतकरी कामगार पक्षाचे एक नेते असल्याने त्यांना ‘भाई’ या उपाधीने लोक ओळखत असत.

माधवराव बागल यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविला. सुरुवातीला एक चित्रकार म्हणून ते कार्यरत असले तरी त्यात न रमता त्यांनी स्वतःस राजकीय आणि सांस्कृतिक चळवळीत झोकून दिले. १९३२ सालापासून अस्पृश्योद्धार कार्यासाठी मंदिर प्रवेश, सहभोजने, हरिजन परिषदांचे आयोजन यांत ते अग्रेसर राहिले. भारतात विविध भागांत स्वातंत्र्याच्या ज्या चळवळी घडल्या तशाच प्रकारच्या चळवळी अनेक संस्थांनी प्रदेशांत घडल्या. त्यामध्ये बागल यांचे योगदान महत्त्वाचे आहे. कोल्हापूर संस्थानात छत्रपतींच्या आधिपत्याखाली जबाबदार शासन पद्धतीची मागणी करणारी प्रजापरिषदेची चळवळ बागल यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली (१९३९). त्यात त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला. पुढे कोल्हापूर संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले (१९४९). १९४२ सालापासून बागल हे कामगार लढ्यात उतरले. शाहू मिल मजूर संघटना, चित्रपट कामगार संघटना, कोल्हापूर संस्थान कामगार संघ अशा अनेक कामगार चळवळींत कार्य केल्यावर ते शेतकरी कामगार पक्षात काम करू लागले (१९५३). पन्हाळा येथील प्रजा परिषदेच्या अधिवेशनात त्यांनी मराठी भाषिक प्रदेश एकीकरणासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा उल्लेख केला होता (१९४८). या चळवळीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. कोल्हापूर जिल्हा संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते अध्यक्ष होते. भारतात समाजवाद आणण्यासाठी ही चळवळ आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे होते. १९५१ सालापासून ते महाराष्ट्र राज्याची स्थापना होईपर्यंत त्यांनी अनेक सत्याग्रहांचे नेतृत्व केलेच, तसेच आपल्या वाणी आणि लेखणीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा प्रसार केला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढा चळवळीत माधवराव बागल अग्रभागी होते. १९५८ साली बेळगावमध्ये जो सीमा सत्याग्रह झाला, त्यामध्ये पहिले सत्याग्रही म्हणून बागल यांनी लढ्याचे नेतृत्व केले. त्यांना अटक होऊन त्यांची मंगळूर येथील तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. १९६१ नंतर मात्र बागल यांनी काँग्रेस पक्षाच्या धोरणास अनुकूल भूमिका घेतली. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्याशी त्यांचा स्नेह होता. महाराष्ट्र सरकारच्या पंचवार्षिक योजना सल्लागार समिती, आर्ट एजुकेशन समिती अशा समित्यांवर त्यांनी काम केले. कोल्हापुरात राष्ट्रीय नेत्यांचे पुतळे आणि स्मारके यांची उभारणी बागल यांच्या प्रयत्नांतून झालेली आहे. कोल्हापुरात लोकवर्गणीतून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तयार करून उपस्थित जनसमूहातील सामान्य नागरिकाकडून त्याचे अनावरण केले होते (१९५०). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत उभारण्यात आलेला हा देशातील पहिला पुतळा होता. तसेच महात्मा गांधी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा व बिंदू चौकातील हुतात्मा स्तंभ उभारण्यात बागल यांचाच पुढाकार होता. बागल हे जसे चळवळीचे झुंजार नेतृत्व होते, तसे ते एक कलावंत आणि विचारवंत देखील होते. त्यांनी तत्कालीन वृत्तपत्रे व साप्ताहिके व नियतकालिकांतून अनेक विषयावर लेखन केले. मार्क्सवादी विचारांचे नेते लेनिन, स्टालिन किंवा समाजवाद यांवर अनेक लेख लिहिले आणि देशीवादातून त्याची मांडणी केलेली आढळते. बागल यांनी आत्मचरित्रपर लेखन माझा जीवन प्रवास या नावाने पहिले तीन भाग, चौथा भाग सत्याग्रहातून सहकार्याकडे व पाचवा संघर्ष आणि सन्मान अशा पाच भागांत केले आहे. आठवणींच्या स्वरूपात बंधनात, जीवन संग्राम, सिंहावलोकनमाझ्या जीवनाच्या प्रेरणा हे ग्रंथ लिहिले.

बागल यांच्या कार्याची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद यांनी ‘डी.लिट’ या सन्माननीय पदवीने त्यांचा गौरव केला. राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टने त्यांना प्रतिष्ठेच्या शाहू पुरस्काराने गौरवले. महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘दलितमित्र’ पदवी दिली, तर भारताच्या पंतप्रधानांकडून ‘ताम्रपट’ प्रदान करून व राष्ट्रपतींकडून ‘पद्मभूषण’ या पदवीने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • जनरल फाईल, नं. ४११, कोल्हापूर पुराभिलेखागर, कोल्हापूर.
  • भाई बागल साहित्य, रूमाल क्रमांक ४, शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
  • माळी, मा. गो. व इतर, संपा., भाई माधवरावजी बागल  (निवडक लेखसंग्रह), महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९९८.
  • शिंदे, पी. एन. भाई माधवराव बागल, श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर, २०१२.

                                                                                                                                                                समीक्षक : अवनीश पाटील