दलाल, दीनानाथ दामोदर : (३० मे १९१६ – १५ जानेवारी १९७१). सुप्रसिद्ध गोमंतकीय चित्रकार. त्यांचा जन्म मडगावजवळील कोंब (गोवा) येथे सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव नृसिंह दामोदर दलाल-नाईक असे होते; परंतु पुढे दीनानाथ दलाल या नावाने ते प्रसिद्धीस आले. त्यांचे घराणे धार्मिक वृत्तीचे होते. गोव्यातील निसर्गरम्य परिसरात त्यांचे बालपण गेल्याने चित्रकलेसाठी लागणारी सौंदर्यदृष्टी बालपणीच त्यांच्यात विकसित झाली. कोकणीसह पोर्तुगीज, इंग्रजी, मराठी या भाषा त्यांना चांगल्या अवगत होत्या.

मडगावच्या शाळेत शिकत असतानाच त्यांनी मुख्याध्यापकांचे व्यक्तिचित्र हुबेहूब रेखाटून त्यांची शाबासकी मिळविली. कलेची जाण असलेल्या मुख्याध्यापकांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या वडिलांना मोठ्या आग्रहपूर्वक सांगितले की, मुलाला चित्रकलेच्या शिक्षणासाठी मुंबईला पाठवावे. गोव्यातील पोर्तुगीज सरकारची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दलाल मडगावहून मुंबईत आले. मुंबईतील ‘केतकर आर्ट इन्स्टिट्यूटʼमध्ये त्यांचे चित्रकलेचे शिक्षण सुरू झाले. पुढे त्यांनी ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टʼमधून पदविका मिळविली (१९३७). त्यानंतर त्यांनी तत्कालीन प्रसिद्ध ‘बी. पी. सामंत आणि कंपनीʼ या जाहिरात वितरण संस्थेत नोकरी धरली. याच सुमारास त्यांनी प्रा. अनंत काणेकर आणि मो. ग. रांगणेकर या साहित्यिक-पत्रकार मित्रांच्या चित्रा साप्ताहिकासाठी व्यंग्यचित्रे काढली. ती व्यंग्यचित्रे तत्कालीन राजकीय परिस्थितीवर आणि ब्रिटिशांच्या धोरणांवर टीका करणारी होती. काणेकरांच्या कल्पना आणि त्या कल्पना नेमकेपणाने स्पष्ट करणारी दलालांची व्यंग्यचित्रे त्या काळात खूपच गाजली. काणेकरांबरोबर त्यांनी भारतभर भ्रमंती केली. त्यामधून आमची माती आमचे आकाश या पुस्तकाची निर्मिती झाली. याच काळात अनेक मासिकांची आणि पुस्तकांची मुखपृष्ठे दलालांनी रेखाटली. ना. धों. ताम्हणकरांचा ‘गोट्याʼ, वि. वि. बोकिलांचा ‘वसंतʼ ही त्यांची व्यक्तिचित्रे विशेष गाजली. तसेच दलालांनी बा. द. सातोस्कर यांच्या सागर प्रकाशनासाठी काम सुरू केले (१९३८–४३). या प्रकाशनासाठी दलालांनी सु. १५ पुस्तकांची मुखपृष्ठे रेखाटली. त्यांतील काही व्यक्तिरेखा संस्मरणीय ठरल्या.

केतकर आर्ट इन्स्टिट्यूटमधील त्यांच्या विद्यार्थिनी व चित्रकर्त्री सुमती पंडित यांच्याशी त्यांचा विवाह झाला (१९४३). मीरा, अरुणा, प्रतिमा आणि अमिता या त्यांच्या चार कन्या. १९४३ मध्ये दलालांनी मुंबईत स्वत:चा ‘दलाल आर्ट स्टुडिओ’ सुरू केला. प्रथम मौज प्रकाशनाच्या जिन्याखालील एका छोट्याशा खोलीत हा स्टुडिओ सुरू झाला. वर्षभरातच कामाचा व्याप वाढला आणि १९४४ मध्ये मुंबईच्या केनेडी ब्रिजजवळील एका मोठ्या जागेत स्टुडिओचे स्थलांतर झाले. त्यांनी छोट्या रेखाटनापासून मोठी कथाचित्रे, मासिके, पुस्तके यांची मुखपृष्ठे, दिनदर्शिका (कॅलेंडर्स), व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे इत्यादी अनेकविध चित्रे रेखाटली. त्यामुळे ते अल्पावधीतच रसिकप्रिय चित्रकार बनले.

दलालांनी रॉय किणीकरांच्या साथीने दीपावली नावाचा वार्षिक दिवाळी अंक सुरू केला (१९४५). वि. स. खांडेकर, पु. भा. भावे, विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे यांसारख्या अनेक प्रथितयश लेखकांना त्यांनी पाचारण केले. त्यांचे उत्तमोत्तम दर्जाचे साहित्य दलालांच्या आशयगर्भित चित्रांनी सजले. दीपावलीच्या अंकात दलालांनी ‘बिंग चित्रमालाʼ, ‘अर्कचित्रेʼ, ‘हास्यचित्रेʼ, ‘व्यंग्यचित्रेʼ अशा चित्रमालिका सादर केल्या. तसेच बारामास, रागरागिण्या, ऋतू, नवरस, शृंगारनायिका यांसारख्या संस्कृत साहित्यावर आधारित त्यांच्या चित्रमालिकांमुळे दीपावली अंकाची लोकप्रियता वाढली. १९५६ पासून दीपावली मासिक स्वरूपात सुरू झाले. त्यांत शृंगारनायिका चित्रित केल्या. स्त्रीची मोहकता, कमनीय बांधा, जराशी अनावृत्त अशी तिची अंगकाठी, विषयानुरूप आकृतिबंध व हुकमी रंगसंगती ही त्यांच्या स्त्रीचित्रणाची वैशिष्ट्ये होत. वाढत्या लोकप्रियतेमुळे दीपावली हिंदी भाषेतही सुरू झाले. तत्कालीन प्रसिद्ध हिंदी लेखक व कवी यांच्या साहित्यांनी आणि दलालांच्या चित्रांनी ते सजले होते. ते दहा वर्षे चालले.

चित्रकारांची व्यंग्यचित्रे, १९४०.

दीपावलीच्या कामाबरोबरच डोंगरे बालामृत, धूतपापेश्वर, कोटा टाइल्स, वर्तकी तपकीर, कॅम्लिन, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स अशा कंपन्यांच्या जाहिराती आणि दिनदर्शिका दलालांनी तयार केल्या होत्या. १९६५ ते १९७१ या काळात ते दि गोवा हिंदू असोसिएशनच्या कलाविभागाचे मार्गदर्शक होते. तसेच टॉम अँड बे या जाहिरात वितरण कंपनीचे सल्लागार होते.

दलालांनी विविध शैलींमध्ये अनेक प्रयोग केले. पाश्चात्त्य शैली, भारतीय शैली, वास्तववादी शैली, नवचित्र शैली तसेच अमूर्त शैलीमध्येही त्यांनी चित्रे साकारली आहेत. अमूर्त कल्पनांना प्रतीकरूपात साकार करण्यात त्यांचा हातखंडा होता. साहित्यातील गूढ कल्पना दलालांच्या चित्रीकरणात सहजसुबोध झालेल्या दिसतात. साहित्याची सजावट करताना विषयाचा आशय आणि लेखकाच्या भाषाशैलीचे सौंदर्य वाचकांपर्यंत नेमकेपणाने पोहोचेल अशी चित्रशैली निर्माण करणे, हे त्यांच्या चित्रकारितेचे वैशिष्ट्य होते. हा नियम त्यांनी सर्वच चित्रप्रकारांसाठी कायम ठेवला. तसेच चित्रचौकटींतील विविध घटकांत सुसंवाद साधत केलेली रचना हे दलालांच्या चित्रांचे मर्मस्थान होते. चित्रांना खरा सौंदर्याचा साज चढविणारा घटक म्हणजे दलालांची रेषा असून ती विषयाच्या आशयानुसार अनेक रूपे घेत असे. ती रेषा जबरदस्त आत्मविश्वासाने तरीही सहजतेने मारलेली असे. द्विमितीचा वापर करून त्रिमितीचा आभास निर्माण करणे, ही त्यांच्या रंगलेपनाची खासियत होती. तांबडा, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा असे रंग वापरणे – जे दलालपूर्व चित्रकार वापरत नसत – हे एक नवीन तंत्र दलालांनी सुरू केले. त्यामुळे साहित्यसजावटीचे रूपच बदलले. चित्राचा आकृतिबंध आणि रंगसंगती यांची जाणीव त्यांना निसर्गदत्तच होती. त्याची प्रचिती त्यांच्या कलाकृतींतून दृग्गोचर होते.

व्यावसायिक चित्रांबरोबरच त्यांनी अखिल भारतीय चित्रप्रदर्शनांत चित्रे पाठवून त्यात पारितोषिके मिळविली. त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटीची पारितोषिके (१९३९, १९४२, १९४७, १९५३), वास्को-द-गामा, गोवा या संस्थेचे रौप्यपदक (१९४०), हैदराबाद सोसायटीचे ब्रॉंझ पदक (१९४९), राष्ट्रपती पारितोषिक (१९५५), दि इंडियन ॲकॅडमी ऑफ फाइन आर्ट्स अँड क्राफ्ट्स, अमृतसर या संस्थेचे सुवर्णपदक (१९५६) इत्यादी अनेक पारितोषिके मिळाली.

९ जानेवारी १९७१ रोजी त्यांच्या दीपावली अंकाचा रौप्यमहोत्सव साजरा झाला. त्यानंतर १५ जानेवारी १९७१ रोजी मुंबई येथे त्यांचे आकस्मिकपणे निधन झाले.

समीक्षक – सुहास बहुळकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Close Menu
Skip to content