राय चौधरी, देवी प्रसाद : ( १५ जून १८९९ – ? ऑक्टोबर १९७५ ). आधुनिक भारतीय शिल्पकार व चित्रकार. त्यांचा जन्म ताजहाट (जि. रंगपूर, बांगला देश) येथे एका जमीनदार कुटुंबात झाला. त्यांनी उत्तर कोलकात्यातील ‘खेलतचंद्र’ संस्थेत सुरुवातीचे शिक्षण घेतले व पुढील शिक्षण कोलकात्यातील ‘मित्र विद्यालया’ त घेतले. त्यांची बालपणापासूनची चित्रकलेची व मातीच्या मूर्तिकामाची आवड पाहून, त्यांचे वडील उमा प्रसाद राय चौधरी यांनी त्यांना शाळेतून काढून अवनींद्रनाथ टागोर यांच्याकडे चित्रकलेच्या शिक्षणासाठी पाठविले.

द पॅलेस डॉल

सुरुवातीच्या काळातील देवी प्रसाद यांची चित्रे अवनींद्रनाथांच्या शैलीचा प्रभाव दर्शवणारी, पारंपरिक भारतीय शैलीची व जलरंगांतील गडद रंगसंगतीची आढळतात. उदा., ग्रीन अँड गोल्ड (चिकणरंग) व द पॅलेस डॉल (जलरंग). सुरुवातीला त्यांनी प्रामुख्याने पौराणिक प्रसंग रंगविले. या शैलीत प्राविण्य मिळवल्यानंतर पुढे ते ब्रिटिश चित्रकारांनी प्रवर्तित केलेल्या वास्तववादी अकादेमिक चित्रशैलीकडे वळले. परिणामी ठळक रेखांकित मानवकृतींना व छायाप्रकाशात्मक छटांना त्यांच्या चित्रांत महत्त्व प्राप्त झाले. प्रख्यात डच चित्रकार रेम्ब्रँटच्या शैलीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांच्या चित्रविषयांतही तत्कालीन जीवनातील विषय दिसू लागले. त्यांची काही चित्रे जपानी चित्रशैलीप्रमाणे रंगविलेली आढळतात. उदा., जपानी पटचित्राप्रमाणे भासणारे आफ्टर द स्टॉर्म  हे पावसात चिंब झालेल्या फांदीवरील कावळा दाखविणारे नाजुक रंगांचे जलरंगचित्र. त्यांच्या लेप्चा गर्ल (जलरंग, १९२५) या चित्रात लयबद्ध रेखाटन व आदर्श स्त्रीसौंदर्याचे दर्शन घडते, तर लोटस पाँड, क्यूरिऑसिटी ह्या चित्रांत प्रणयातुर युवतींची विलोभनीय दर्शने घडतात. तैलरंगांतील चित्रांत निर्वाण, दुर्गापूजा प्रोसेशन, पुजारिणी ही चित्रे विशेष महत्त्वाची आहेत. पेरिलस पाथ व रोड-मेकर्स या चित्रांत छायाप्रकाशाच्या विरोधी छटांचा सुंदर वापर व मानवाकृतींचे यथातथ्य रेखाटन दिसते. यांखेरीज त्यांनी रंगविलेली सागरदृश्ये (सी-स्केप) व प्राणिचित्रेही उल्लेखनीय आहेत. शिकारीसाठी केलेल्या भटकंतीच्या वेळी केलेले सूक्ष्म निरीक्षण त्यांतून प्रत्ययाला येते.

देवी प्रसाद यांची चित्रनिर्मिती लक्षणीय असली, तरी शिल्पकार म्हणून त्यांची कामगिरी अधिक महत्त्वाची मानली जाते. सुरुवातीपासूनच त्यांना व्यक्तिशिल्पे करण्याची आवड होती. तत्कालीन सुप्रसिद्ध शिल्पकार हिरण्मय राय चौधरी यांचे मार्गदर्शनही त्यांना लाभले. त्यांच्या व्यक्तिशिल्पांत व्यक्तीचे हुबेहूब स्वभावरेखन, आत्मविश्वासपूर्ण हाताळणी व परिपूर्ण तंत्रकौशल्य आढळते. दगडात शिल्प कोरण्यापेक्षा माती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, ब्राँझ या माध्यमांमध्ये शिल्पनिर्मिती करण्यात त्यांना अधिक रुची होती. फ्रेंच शिल्पकार रॉदँ व बूर्देल यांच्या शिल्पशैलींचा त्यांच्यावर प्रभाव होता. नवनव्या माध्यमांमध्ये प्रयोग करण्यापेक्षा, विशिष्ट तंत्रावर लक्ष केंद्रित करणे त्यांना महत्त्वाचे वाटे. १९२९ साली सरकारने त्यांची नियुक्ती मद्रास येथील शासकीय कलाविद्यालयात अधीक्षक (प्राचार्य) म्हणून केली. मद्रासमधील त्यांची कारकीर्द अत्यंत फलदायी ठरली. कलाशाळेच्या वास्तूची उंची अधिक वाढवून व तीत संपूर्ण प्रकाश खेळेल अशा रीतीने सुधारणा करून त्यांनी ती अधिक कार्यानुकूल बनवली, तसेच शिक्षणपद्धतीच्या संदर्भात रोमन शिल्पावरून रेखाटनाचे धडे गिरवण्यापेक्षा प्रत्यक्ष जिवंत मॉडेलवरून रेखाटनाचा अभ्यास करण्यावर त्यांनी अधिक भर दिला. ते विद्यार्थ्यांमध्ये मोकळेपणाने मिसळून त्यांच्या समवेत स्वतः काम करीत.

मद्रास व कोलकाता येथे देवी प्रसाद यांनी अनेक नामवंत भारतीय व ब्रिटिश अधिकाऱ्यांची व्यक्तिशिल्पे केली. उदा., त्यांच्या वडिलांचे अर्धशिल्प, डॉ. ॲनी बेझंट, सी. पी. रामस्वामी अय्यर, गव्हर्नर जॉर्ज स्टॅनले इत्यादींची व्यक्तिशिल्पे. आशुतोष मुकर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू व स्वामी विवेकानंद यांचे त्यांनी घडवलेले भव्य पुतळेही त्यांच्या निष्णात शिल्पकौशल्याची साक्ष देतात. त्यांच्या व्यक्तिशिल्पांतील भरीवपणा, रूबाबदार आविर्भाव व तंतोतंत साम्य ही वैशिष्ट्ये नजरेत भरतात.

ट्रायम्फ ऑफ लेबर

देवी प्रसाद यांनी केलेल्या सर्व कामांमध्ये त्यांच्या रचनाशिल्पांना अधिक प्रसिद्धी मिळाली. या रचनाशिल्पांवर रॉदँच्या बर्गर्स ऑफ कॅले  या प्रसिद्ध शिल्पाचा प्रभाव जाणवतो. उदा., ट्रायम्फ ऑफ लेबर (श्रमप्रतिष्ठा, ब्राँझ, १९५४) हे सर्व सामर्थ्य एकवटून शिळा ढकलणाऱ्या कामगारांचे समूहशिल्प व मार्टर्स मेमोरिअल (शहीद स्मारक, ब्राँझ, १९५६) हे प्रचंड आकाराचे समूहशिल्प. मार्टर्स मेमोरिअल  या शिल्पात ध्वज घेऊन निर्धाराने पुढे जात असलेल्या मानवाकृती दाखवून त्यांतून स्वातंत्र्यासाठी देशभक्तीने प्रेरित झालेल्या हुतात्म्यांचे समर्पण सूचित केले आहे. या मानवाकृतींचे जोमदार आविर्भाव, दृढ निर्धार आणि अंतःप्रेरणेची शक्ती व्यक्त करणारी अभिव्यक्ती अत्यंत प्रभावी वाटते (पाटणा येथे स्थापित).

चित्र-शिल्प कलांखेरीज संगीत, लेखन, कुस्ती, शिकार अशा विविध छंदांमध्येही देवी प्रसाद यांनी प्रावीण्य मिळवले होते. प्रवासी, भारतवर्ष  इ. मासिकांतून तसेच शोनिबारेर चिठी  या साप्ताहिकातून त्यांनी विपुल लेखन केले. बंगालीमध्ये कथा, कांदबऱ्याही लिहिल्या.

मद्रास येथील कलाविद्यालयातून देवी प्रसाद यांनी जे अनेक शिष्य तयार केले, त्यांतील प्रदोष दासगुप्ता, धनपाल व जानकीराम या शिल्पकारांनी पुढे आधुनिक शिल्पकलेच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. ते १९५७ साली मद्रास कलाविद्यालयातून निवृत्त झाले. मात्र त्यानंतरही त्यांची कलानिर्मिती अविरत चालू होती. शेवटी शेवटी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी लागल्याने त्यांच्या कामात खंड पडला. त्यांना अनेक मानसन्मान लाभले : ब्रिटिश सरकारतर्फे ‘एम्. बी. ई.’ ही सन्मान-पदवी, ललित कला अकादमीचे पहिले अध्यक्ष (१९५३), टोकिओ येथे आयोजित केलेल्या यूनेस्को कलाचर्चासत्राचे अध्यक्ष व संचालक (१९५५), ‘डी. लिट्.’ (रवींद्र भारती विद्यापीठ, कोलकाता, १९६८), आणि भारत सरकारकडून पद्मभूषण (१९५८) ही पदवी. तत्कालीन मान्यताप्राप्त बंगाल संप्रदायाची शैली झुगारून देऊन आधुनिक शैलीचा अंगीकार करण्याची त्यांची बंडखोर वृत्ती, तसेच त्यांच्या शिल्पांतील पृथगात्मता व नावीन्य यांमुळे ते आधुनिक शिल्पकारांचे अग्रणी ठरतात.

संदर्भ :

  • ललित कला अकादेमी, समकालीन भारतीय कला सीरीज, देवीप्रसाद रायचौधुरी, नवी दिल्ली, १९८४.