महाराष्ट्रातील सागरी क्षेत्रात किनाऱ्यापासून दूर खोल समुद्रात आढळणाऱ्या हिरवट रंगाच्या माशाला मराठीत ‘पोपटमासा’ म्हणतात. या माशाचे शास्त्रीय नाव कॉरीफिना हिप्पुरस (Coryphaena hippurus) असून अस्थिमत्स्य उपवर्गातील (Osteichthyes) पर्सिफॉर्मीस गणातील (Perciformes) हिप्पुरिडी (Hippuride) कुलात तो गणला जातो. जगभरात तो माही-माही (Mahi-mahi), डोरॅडो (Dorado), डॉल्फिनफिश (Dolphinfish) या नावांनी ओळखला जातो. पोपटमाशाचे वास्तव्य मुख्यत्वे उष्णकटिबंधीय सागरी पृष्ठीय भागात आहे. अमेरिका खंडालगतच्या प्रशांत आणि अटलांटिक महासागरांतील समशीतोष्ण भागांत हा प्रामुख्याने आढळतो. तसेच ऑस्ट्रेलियालगत हिंदी महासागरातही त्याचा आढळ आहे.

पोपटमासा (कॉरीफिना हिप्पुरस) : नर.

पोपटमाशाची लांबी जास्तीत जास्त २ मीटरपर्यंत असून याचे वजन १८—३० किग्रॅ. असते. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात सुमारे १.५ मी. लांबीचा (५—१० किग्रॅ. वजनाचा) मासा सापडतो. त्याचे शरीर लांबट व दोन्ही बाजूंनी चपटे असते. एक सलग पृष्ठपर (Dorsal fin) डोळ्याच्या वर सुरू होऊन पुच्छपरापर्यंत (Tail fin) जातो. गुदपरदेखील (Anal fin) पुच्छपरापर्यंत जातो. पुच्छपर दोन भागांत समानरित्या विभागलेला असतो. पोपटमाशाचा रंग अतिशय आकर्षक असतो. त्याचा रंग पोपटी हिरवा असून त्यावर निळसर धातूसदृश झाक असते, तर खालच्या बाजूला पिवळसर चंदेरी झाक व त्यावर निळसर काळे ठिपके असतात. सूर्य किरणांच्या परावर्तनामुळे हा मासा सोनेरी-निळसर रंग बदलत असल्याचा भास होतो. झळाळत्या सोनेरी रंगामुळेच या माशाला स्पॅनिशमधे ‘डोरॅडो’ (सोनं) असे म्हणतात. हा मासा अतिशय चपळ असून लांबट निमुळत्या आकारामुळे ताशी ५०—८० किमी. वेगाने पोहतो. याचे आयुर्मान सुमारे ५ वर्षांचे असते.

पोपटमासा (कॉरीफिना हिप्पुरस) : मादी.

पोपटमासा सहा महिन्यांत परिपक्व होतो. त्यावेळी त्याची लांबी सुमारे ५० सेंमी. असते. मादी तुलनेने नरापेक्षा लहान असते. परिपक्व होताना नराच्या डोक्याचा आकार बदलतो. प्रौढ नराचे डोके उभट, फुगीर व टेंगूळ आल्यासारखे दिसते, मात्र मादीचे डोके गोलाकार असते. इतर उष्ण कटिबंधीय माशांप्रमाणे मादी वर्षभर अंडी देत असली तरी जुलै व नोव्हेंबर हे त्याचे विणीचे मुख्य हंगाम आहेत. एका हंगामात साधारण ७०—९० सेंमी. लांबीची मादी ८० हजार ते १ लाखपर्यंत अंडी देते. नर-मादी मीलनानंतर अंड्यांचे बाह्य फलन होते. छोटे मासे विशेषत: उडणारे पाखरू मासे, खेकडे, माकूळ इत्यादी त्याचे खाद्य आहे. महासागरात तरंगणाऱ्या महाकाय सरगॅसम शैवालांच्या भोवती आसरा घेणाऱ्या छोट्या माशांचा ते फडशा पाडतात. हा मासा आकाराने मोठा असला तरी शार्क व ट्युना हे मासे त्याचे भक्षक आहेत.

पोपटमाशाचा अधिवास किनारपट्टीपेक्षा खुल्या सागराच्या (Open ocean) अगदी वरच्या पृष्ठभागावरील पाण्यात असतो. त्यामुळे तो गळाने पकडण्यास सुलभ आहे. याची खास अशी मासेमारी होत नाही; परंतु ट्युना, मार्लिन, शार्क इत्यादी माशांबरोबर सागरी मासेमारीत पकडला जातो.

हा मासा चविष्ट असून याची चव काहीशी ट्युनासारखी असते. तसेच या माशात ओमेगा-३ मेदाम्ले असतात. त्यामुळे जागतिक बाजारात याला चांगली मागणी आहे. भारतीय मत्स्याहारींमध्ये हा मासा फारसा लोकप्रिय नाही. या माशाच्या सेवनाने विषबाधा झाल्याच्या काही घटना घडल्याचे आढळून आले आहे. गॅम्बिअरडिस्कस टॉक्झिकस (Gambierdiscus toxicus) या द्विकशाभिक एकपेशीय सजीवावर जगणाऱ्या प्लवकामध्ये सिग्वाटॉक्झिनचा (Ciguatoxin) संचय होतो. असे प्लवक पोपटमाशाच्या खाण्यात आल्यास पोपटमाशाद्वारे विषबाधा होते. हे विष दीर्घकाळ मज्जासंस्थेवर परिणाम करते.

पहा : मत्स्यविषबाधा.

संदर्भ :

  • FAO Fish. Synop. (130); NOAA Tech. Rep. NMFS Circ. (443).
  • Palko, B.J., G.L. Beardsley and W.J. Richards, 1982. Synopsis of the biological data on dolphin-fishes, Coryphaena hippurus (Linnaeus) and Coryphaena equiselis (Linnaeus).

समीक्षण : नंदिनी देशमुख