अस्थिमस्त्य वर्गाच्या ॲक्टीनोप्टेरीजी (Actinopterygii) ह्या उपवर्गात पर्सिफॉर्मीस (Perciformes) गणातील पॉलिनीमिडी (Polynemidae) कुलात रावस माशाचा समावेश होतो. या माशाचे शास्त्रीय नाव इल्युथेरोनेमा टेट्राडॅक्टीलम (Eleutheronema tetradactylum) असे आहे. याच्या अंसपराच्या खाली दोऱ्यासारखे वाढलेले लांब तंतुपर असतात. यावरून या माशाला इंग्रजीत फोरफिंगर थ्रेडफिन (Fourfinger threadfin) असेही म्हणतात. तंतुपर हे त्यांना ओळखण्याचे प्रमुख लक्षण आहे. रावस माशाला भारतीय सामन (Indian Salmon) किंवा पांढरा सामन (White Salmon) असेही म्हटले जाते. परंतु, असे असले तरी या माशाचे सामन ह्या माशाशी काहीही साधर्म्य नाही.

रावस (इल्युथेरोनेमा टेट्राडॅक्टीलम)

हे मासे किनाऱ्याजवळच्या उथळ पाण्यात राहणे पसंत करतात. हिवाळ्यात नद्यांच्या प्रवाहात हे मासे प्रवेश करतात. हा मासा भारताच्या पूर्व किनाऱ्यावर ओडिशा व पश्‍चिम बंगाल या राज्यांत, तर पश्‍चिम किनाऱ्यावर महाराष्ट्र व गुजरात या राज्यांत आढळतो. हुगळी नदीच्या मुखापाशीही ते आढळून येतात. याशिवाय पाकिस्तान, चीन, थायलंड, व्हिएतनाम, मलेशिया, हाँग काँग, सिंगापूर, म्यानमार, कंबोडिया, उत्तर ऑस्ट्रेलिया आणि फिलिपिन्स, इंडोनेशिया त्याचबरोबर पर्शियन आखात, पापुआ न्यू गिनी येथेही ते मोठ्या प्रमाणावर सापडतात. प्रौढ मासे जोडी जोडीने किंवा एक एकटे जरी फिरत असले तरी लहान मासे समूहाने किंवा विरळ थवा करून वावरतात.

रावस माशाचे शरीर दोन्ही बाजूंनी चपटे असून खवल्यांनी आच्छादलेले असते. साधारणपणे रावस माशांची लांबी ५० सेंमी. एवढी असते. परंतु, कधीकधी २ मी.पर्यंत वाढ झालेले रावस मासेही आढळून येतात. चंदेरी रंगाच्या शरीरावर हिरवट झाक असून पोटाकडेचा भाग पिवळसर पांढरट असतो. डोळे मोठे असून त्यावर मेदयुक्त आवरण असते. डोक्याच्या खालील भागात मुख असते, दात लहान व ओठाबाहेर आलेले असतात. वरचा ओठ नसतो, तर खालील ओठ पूर्ण विकसित झालेला असतो. अधरपराच्या पुढच्या बाजूस चार तंतुपर असतात. ह्यांचा उपयोग अन्नाचा शोध घेताना संस्पर्शक म्हणून केला जात असावा असे मानले जाते.

रावस माशाला दोन पृष्ठपर असून त्याच्या कडा काळसर असतात. त्यापैकी एक कंटकयुक्त असून त्यात ९ कंटिका असतात. दुसरा कंटकरहीत असून त्याला मऊ अर असतात. गुदपराला ३ कंटिका व १४–१९ मृदु अर असतात. पुच्छपर काळपट रंगाचा असून दोन समान भागात दुभागलेला असतो. त्यावर अगदी बारीक काळे ठिपके असतात. श्रोणिपर पांढरट असून त्यावर पिवळ्या रंगाची कडा असते. वाताशय नसतो.

रावस मासा मांसाहारी आणि खादाड असून यांमध्ये बऱ्याचदा स्वजाती भक्षण देखील दिसून येते. लहान असताना ते प्लवके, लहान संधिपाद प्राणी ह्यावर गुजराणा करतात. मोठे झाल्यावर कवचधारी प्राणी, लहान मासे इत्यादी भक्षण करतात.

रावस माशांत उभयलिंगत्व आढळून येते. सुमारे २ वर्षांनंतर नराचे मादी अवस्थेत रूपांतर होते. बीजांड कोष हे अपरिपक्व अवस्थेत लांबट दोरीप्रमाणे असतात, पक्व होताना ते जाड होऊ लागतात व पिवळसर रंगांची अंडी स्पष्ट दिसू लागतात. बीजांड कोषाच्या जोडीतील एक बीजांड कोष लहान, तर दूसरा मोठा असतो. भारतात सापडणाऱ्या रावस माशांच्या केलेल्या अभ्यासात त्यांची अंडी देण्याची क्षमता सुमारे ४,००,००० पर्यंत असून ते वर्षातून दोन वेळा अंडी देत असल्याचे आढळून आले आहे; तर इंडोनेशिया येथील रावस माशांची अंडी देण्याची क्षमता १७,००,००० ते १८,००,००० असल्याचे आढळून आले आहे.

रावस माशाचे मांस चवदार असल्याने तो मत्स्यप्रेमींच्या विशेष पसंतीचा आहे. या माशामध्ये ओमेगा-३ हे मेदाम्ल असते. हे मासे शक्यतो ताज्या स्वरूपात खाल्ले जातात. अतिरिक्त प्रमाणात सापडल्यास खारवून तसेच वाळवूनही खाल्ले जातात.

भारतात पश्चिम किनाऱ्यावर रावस मासे पकडण्याचा हंगाम सप्टेंबर–नोव्हेंबर या काळात असतो, तर पूर्व किनाऱ्यांवर तो फेब्रुवारी–मे असा असतो. मोठ्या प्रमाणावर ह्यांची मासेमारी होत असल्याने त्यांच्या नैसर्गिक साठ्यांवर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांची शेती करण्याची गरज भासू लागली. सध्या सिंगापूर, तैवान व चीन येथे या माशांची शेती केली जाते.

संदर्भ : 

  • http://en.bdfish.org/2011/07/indian-threadfin-leptomelanosoma-indicum-shaw-1804/
  • https://en.wikipedia.org/wiki/Indian_threadfin
  • https://www.fishbase.in/summary/4469
  • https://www.idosi.org/wasj/wasj30(2)14/21.pdf

                                                                                                    समीक्षक : नंदिनी देशमुख