पेडवा माशाचा समावेश क्लुपिफॉर्मिस (Clupeiformes) गणातील क्लुपिइडी (Clupeidae) या मत्स्यकुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव सार्डिनेला फिंब्रिएटा (Sardinella fimbriata) असे आहे. फ्रिंज म्हणजे झालर. याच्या खवल्याचा शेवट झालरीसारखा असतो, म्हणून त्याला ‘फ्रिंज स्केल सार्डिन’ (Fringe scale sardine) असेही म्हणतात. भूमध्य समुद्रातील सार्डिनिया या इटालिअन बेटाजवळ हे मासे पूर्वी विपुल प्रमाणात सापडत असत, त्यावरून सार्डिनेला हे नाव या प्रजातीतील माशांना पडले आहे.  भारतात सार्डिनेला या प्रजातीत सार्डिनेला लाँगिसेप्स (तरळी मासा; Sardinella longiceps) आणि सार्डिनेला गिब्बोसा (Sardinella gibbosa) अशा इतर महत्त्वाच्या प्रजातीही आहेत. त्यांपैकी तरळी या माशाचे भारतातील इतर सर्व माशांपेक्षा तुलनात्मक सर्वाधिक मत्स्योत्पादन होते. त्याच्यापासून तेल काढले जाते. या तेलाचे अनेक उपयोग आहेत.

पेडवा (सार्डिनेला फिंब्रिएटा)

पेडवा मासा आकाराने लहान असून साधारण १५—२० सेमी.पर्यंत वाढतो. त्याचे शरीर दोन्ही बाजूने चपटे असून मुखाजवळ व शेपटीकडे निमुळते असते. त्याचा वरचा जबडा किंचित मोठा असतो. शरीराचा मधला भाग उभट; त्यावर एकच पृष्ठपर (Dorsal fin) असतो. एक श्रोणीपर (Pelvic fin) असतो. पुच्छपर (Tail fin) समानरित्या दोन भागांत दुभागलेला असतो. चमकत्या चंदेरी खवल्यांवर निळसर हिरवी छटा दिसते. मोठ्या माशात बऱ्याचदा पिवळसर झाक असलेला हलकासा पट्टा दिसतो. पोटाकडचा भाग चंदेरी चमकणारा असून त्याला धारदार खवल्यांची करवतीसारखी कडा असते. पर हलक्या हिरव्या रंगाचे असतात. पृष्ठपराच्या तळाशी एक गडद ठिपका असतो.

पेडवे उष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळून येतात. भारताबाहेर श्रीलंका, चीन, तांबडा समुद्र, पूर्व आफ्रिका, अरेबिया, फिलिपीन्स व पापुआ न्यू गिनीच्या पूर्व किनारपट्टीवर ते सापडतात.साधारण ५० मी. खोल समुद्रात पेडव्यांचे थवे आढळतात. थव्याने राहण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांचा भक्षकांपासून बचाव होतो. दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर, विशेष करून कर्नाटकातील कारवारपासून रत्नागिरीपर्यंत तसेच बंगालच्या उपसागरात त्यांची मासेमारी मोठ्या प्रमाणात होते. कारवार येथे साधारण सप्टेंबर महिन्यात मासेमारी सुरू होऊन मे-जूनपर्यंत चालते. महाराष्ट्रात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत छोट्या आसांच्या तरतीच्या तसेच राम्पण जाळ्याने (Gill net and rampan net) नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात पेडव्यांची मासेमारी चालते.

गेल्या ५० वर्षांत जागतिक तापमान वाढीमुळे अरबी समुद्राचे तापमान सुमारे १° से.ने वाढल्याने किनार्‍याजवळील भागांत पृष्ठभागी (Epipelagic) वावरणाऱ्या व प्रामुख्याने भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर आढळणाऱ्या तरळीसारख्या माशांचे उत्तरेकडे महाराष्ट्र व गुजरात किनाऱ्याने संक्रमण झाले आहे. त्यामुळे तरळी माशांची मासेमारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, तर पेडव्यांची मासेमारी काहीशी दुर्लक्षित झाली आहे.

प्रौढ परिपक्व पेडवे मासे भर समुद्रात व छोटे मासे खाडी आणि किनारी भागांत सापडत असले तरी त्यांची अंडी व डिंभकावस्थेतून बाहेर आलेली पिल्ले ही भर समुद्रात सापडतात. वाढीच्या काही अवस्था व लहान पिल्ले प्रसंगी किनारी भागातील प्रवाहांमुळे खाडीलगतच्या खारफुटी व कांदळवनातील पाण्यात वाहून येतात.

सार्डिनेला प्रजातीतील काही जातींत उभयलिंगत्व दिसून येते. मात्र, पेडव्यात लिंगभेद आढळून येतो. बाह्यत: नर व मादी मासे ओळखणे कठीण असते. वातावरणातील बदलाचा पेडव्यांच्या वाढीवर व वृद्धीवर प्रभाव पडतो. सर्वसाधारणपणे त्याची वाढ १०—१४ सेंमी.पर्यंत झाली की तो प्रजननक्षम होतो. पेडव्यांची मादी वर्षाकाठी एकदाच सुमारे १,९६,००० इतकी अंडी घालते. प्रतिकूल वातावरणात प्रजननक्षमता कमी होऊन डिंभकांची मर जास्त होते, तर अनुकूल वातावरणात प्रजननसंस्था सक्षम होऊन अंडी देण्याची व त्यातून पिल्ले बाहेर पडून पेडव्यांच्या मत्स्यसाठ्यातही वाढ होते.

पेडवे (सार्डिनेला फिंब्रिएटा) : मासेमारी.

पेडव्यांच्या जैवरासायनिक अभ्यासात असे आढळून आले की, त्यांच्यातील प्रथिनांचे प्रमाण १४—१८% असते, तर अंडोत्सर्गाच्या काळात त्या प्रथिनांचे प्रमाण कमी होते. जननग्रंथी परिपक्व होताना प्रथिने खर्ची पडतात. स्निग्धतेचे प्रमाण सरासरी १०-११% असते. मादीमधे त्याचे प्रमाण नरापेक्षा जास्त असून अंडोत्सर्गाअगोदर ते वाढते. शरीरात पाण्याचे किंवा आर्द्रतेचे प्रमाण सरासरी ७०% असते, तर राखेचे ७-८% आणि कर्बाचे ०.३०.४% इतके असते. वरील सर्व जैवरासायनिक घटकांच्या प्रमाणानुसार पेडव्यांपासून मिळणारा उष्मांक २ इतका असतो. त्यांच्या लहान आकारामुळे पर्यायाने खाण्यायोग्य मांसाचे प्रमाण कमी असल्याने पेडवे काहीसे दुर्लक्षित असले तरीही प्रथिनयुक्त अन्न म्हणून त्याकडे पाहिले जाते.

सार्डिनच्या इतर प्रजातीप्रमाणे पेडवे देखील प्राणी व वनस्पती प्लवके खातात. त्यांच्या क्लोमांवर (Gills)पूर्ण विकसित झालेल्या ७०—७५ लांबट क्लोम पटलिका (Gill rackers) असल्यामुळे वनस्पती प्लवके खाणे त्यांना सहज शक्य होते. त्यांच्या आहारात प्राणी प्लवकांचा समावेश जास्त दिसून येत असला तरी एकपेशीय शैवाल (Diatoms) तसेच तंतुमय शैवाल ह्यांचा देखील समावेश त्यांच्या आहारात दिसून येतो. समुद्रातील सूक्ष्म प्राणी व वनस्पती प्लवके खाणारे पेडवे सागरी अन्नशृंखलेच्या तळाशी असतात. त्यामुळे प्रदूषित पाण्यात सर्रास आढळणारी पारा व पॉलिक्लोरिनेटेड बायफिनॉले (Polychlorinated-biphenyls) यासारखी विषारी हानिकारक प्रदूषके या माशांच्या शरीरात खूप कमी प्रमाणात आढळतात. पेडव्यामध्ये ओमेगा-३ मेदाम्ले, ही जीवनसत्त्वे असल्याने त्यांच्या नियमित सेवनाने रक्ताभिसरण सुधारण्यास, हाडे बळकट होण्यास व मज्जासंस्था सक्षम राहण्यास मदत होते. त्यांच्या या औषधी पोषण मूल्यांमुळे (Neutraceuticals) पेडवे व त्याच्या कुलातील इतर मासे खाण्याचे प्रमाण वाढते आहे.

पेडवे ताज्या किंवा सुकवलेल्या स्वरूपात खाल्ले जातात. तसेच पेडव्यांपासून मिळणाऱ्या तेलाचे प्रमाण कमी असले तरी ते तेलाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत. ते फार काळ टिकवता न आल्याने अतिरिक्त पकडले गेलेले मासे शेतात कुटी (खत) म्हणून वापरतात. त्यांमध्ये असलेल्या असंपृक्त मेदाम्लाच्या उच्च प्रमाणामुळे जैविक इंधन बनविण्यासाठी त्यांचा वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे जैविक इंधन, पेट्रोल व डीझेल यांना पर्याय म्हणून उपयोगात आणले जाऊ शकेल.

पहा : तरळी, सार्डिन.

संदर्भ :

  • Kudale, R. G. and Rathod, J. L. Nutritional value of fringe scale sardineSardinellafimbriata(Cuv. and Val.) from Karwar waters. Int. J. Fish. Aquat. Stud. 20153(2):06-09, 2015.
  • Rilani, et al.Growth Parameter and Fecundity of Fringe Scale Sardine (Sardinellafimbriata Cuvier Valenciennes) in Alas Strait, East Lombok, West Nusa Tenggara.J.Exp. Life Sci. 2017 7(1), 2015.

समीक्षक : विनय देशमुख