विषयप्रवेश : राष्ट्राची हवाई परिवहन क्षमता देशाच्या एकूण हवाई शक्तीचे अभिन्न अंग असून देशाच्या सुरक्षिततेसाठी ती अत्यंत महत्त्वाची ठरते. देशाची सीमित मारकशक्ती, कमीत कमी वेळात एका संग्रामक्षेत्रातून दूरवरच्या दुसऱ्या संग्रामक्षेत्रात त्वरेने हलविण्यासाठी हवाई परिवहन अपरिहार्य ठरते. साधारणपणे लष्करी मालवाहू विमानांत खालील वैशिष्ट्ये आढळून येतात :
- वजनक्षमता : निरनिराळ्या विमानांची एकूण माल वाहून नेण्याची क्षमता त्यांच्या आकारमानावर अवलंबून असते. मध्यम आकाराच्या विमानात केवळ पाच टन, तर भल्या मोठ्या विमानात पन्नास टनांहूनही अधिक माल पाठविता येतो.
- बहुढंगी कार्यक्षमता : विमानातून सैनिक, शस्त्रास्त्रे, अवजड सामान, छत्रीधारी सैनिक, रसद, दारुगोळा किंवा चिलखती गाड्या वाहून नेणे शक्य होते.
- सर्वगामित्व : कसल्याही हवामानात किंवा अनोळख्या प्रदेशावरूनही उड्डाण करण्याची क्षमता.
- सर्वकामी प्रचालन क्षमता : कच्च्या किंवा अपुऱ्या लांबीच्या धावपट्टीवरूनही प्रचालन करण्याची क्षमता (STOL).
- दीर्घ पल्याची क्षमता : मध्यम श्रेणीच्या, दोन हजार कि.मी. अंतर पार करणाऱ्या, विमानांपासून ते दहा हजार किंवा त्याहूनही अधिक पल्ला पार करणारी विमाने.
- परिवर्तन क्षमता : आकाशात इंधन भरणे, आकाशात रडार केंद्र प्रस्थापित करणे किंवा गरजेनुसार आक्रमक भूमिका पार पाडण्यासाठी योग्य ते परिवर्तन सहजपणे करण्याची क्षमता.
- नागरी संसाधनांचा वापर : लष्करी मालवाहू विमानांची क्षमता अपूरी असल्यास प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थितीत नागरी विमानेदेखील सैनिकांची ने-आण करण्यासाठी किंवा माल वाहतुकीसाठी वापरता येतात.
मालवाहू विमानांना शत्रूच्या लढाऊ विमानांपासून किंवा विमानवेधी क्षेपणास्त्रांपासून धोका असल्यामुळे आपल्या वायुदलाला अनिर्बंध रीत्या संचार करण्यासाठी वायूमंडलावर आपला प्रभावी ताबा असणे आवश्यक आहे. याला हवाईप्रभुत्व (Air Superiority) अशी संज्ञा आहे.
हवाई मालवाहू क्षमता : लष्करी मालवाहू विमानांचा दोन तऱ्हेने प्रभावी उपयोग करता येतो : एक, रसद पुरवठा आणि दोन, रणांगणातील मदतकार्य. शांततेच्या काळात किंवा युद्धजन्य परिस्थितीत माल आणि उतारूंची वाहतूक करणे, हे पुरवठाव्यवस्थापनाखाली मोडते. रणांगणातील मदतकार्यात वायूसेनेसाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांची योग्य ठिकाणी हलवाहलव करणे किंवा लढाऊ विमानांना लागणारा दारुगोळा किंवा सुट्या भागांचा पुरवठा करणे याचा अंतर्भाव होतो. तर सैन्यदलांसाठी निष्णात कर्मचारी आणि अत्यंत गरजेच्या सामानाचा पुरवठा, ज्याला जमीनमार्गे एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात हलविण्यासाठी प्रचंड वेळ लागला असता, तो त्याहून कितीतरी कमी वेळात दुसऱ्या ठिकाणी उपलब्ध करण्याचे काम मालवाहू विमाने करू शकतात. लष्करी विमाने अडचणीच्या ठिकाणी तैनात केलेल्या सैन्यदलांना लागणारी गरजेची रसद हवाई छत्र्यांच्या साहाय्याने पोहोचविण्याचे कामदेखील करू शकतात.
हवाई चढाई कारवाई : आक्रमक कारवायात मालवाहू विमानांतून पॅराशूटच्या साहाय्याने सैनिकी तुकड्या थेट संग्रामक्षेत्रात उतरविणे शक्य होते. उदा., १९७१च्या भारत-पाक युद्धात पाक सैन्याचा माघारीचा रस्ता बंद करण्यासाठी वायुसेनेच्या विमानांनी दि. ११ डिसेंबर १९७१ रोजी थलसेनेचे छत्रीधारी सैनिक पूर्व पाकिस्तानच्या (आताचा बांगला देश) टंगेल गावाजवळ उतरविले होते.
पायदळाच्या आक्रमक कारवायांसाठी वाहतूक : सैनिकांच्या तुकड्या आघाडीच्या विमानतळावर विमानातून उतरून त्यापुढे आगेकूच करून शत्रूवर आक्रमक कारवाया हाती घेऊ शकते. परंतु त्या साठी आपली विमाने निर्वेधपणे उतरू-उडू शकण्यासाठी त्या विमानतळावर आपला संपूर्ण ताबा असणे महत्त्वाचे आहे. ‘ऑपरेशन कॅक्टस’ हे याचे उत्तम उदाहरण आहे. त्यात मालदीवचे राष्ट्रपती गयूम यांच्या विनंतीनुसार दि. ३ नोव्हेंबर १९८८ रोजी वायुसेनेच्या क्र. ४४ स्क्वाड्रनच्या आयएल−७६ या विमानांनी माले विमानतळावर उतरून सत्तापालट करण्याचा बंडखोर सैनिकांचा प्रयत्न उधळून लावला होता.
इलेक्ट्रॉनिकीय युद्धतंत्र व विमानगामी रडार केंद्र : या भूमिकेसाठी मालवाहू विमानात शत्रूची इलेक्ट्रॉनिकीय संसूचन यंत्रणा निष्क्रिय करण्यासाठी काही विशिष्ट संवेदक, रडार, व संचारण नियंत्रण यंत्रणा त्यांच्या प्रचालकांसह, प्रस्थापित केली जाते.
आकाशात इंधनभरणी : लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स यांचा पल्ला वाढविण्यासाठी किंवा त्यांत अधिक शस्त्रास्त्रे इ. नेता यावीत म्हणून हवेतल्या हवेत त्यांत इंधन भरण्यासाठी वाहतुकी विमानांचा उपयोग करता येतो. त्या साठी अशा विमानांत इंधनाची मोठी टाकी व ते प्रदान करण्यासाठी सुयोग्य यंत्रणा बसविली जाते.
हवाई रुग्णवाहिका : युद्धभूमीवरील जखमी सैनिकांना, रुग्णांना तात्काळ वैद्यकीय मदत पोहोचविण्यासाठी, अथवा त्यांना सुयोग्य रुग्णालयात पोहोचविण्यासाठी, वायुसेनेच्या वाहतुकी विमानांचा वापर करता येतो. नैसर्गिक आपत्तींत जखमी नागरिकांच्या मदतीसाठीदेखील असा वापर करता येतो.
बंधविमोचन : परदेशात अचानक सुरू झालेल्या यादवी युद्धामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूपस्थळी पोहोचविण्यासाठीदेखील वायुसेनेच्या वाहतुकी विमानांचा वापर केला जातो. एप्रिल २०१५ मध्ये येमेन देशात अशा तऱ्हेने अडकुन पडलेल्या ५,६०० भारतीय व अन्य देशांच्या नागरिकांची जिबूती व एडन येथून नौसेनेच्या जहाजांचा व वायुसेनेच्या विमानांच्या साहाय्याने मुक्ती साधण्यात आली होती.
टेहळणी व निरीक्षण : वाहतुकी विमानांच्या दूरगामी पल्ल्याच्या क्षमतेमुळे ती सागरी क्षेत्रात दूरपर्यंत टेहळणी करण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी वापरता येतात. नौसेनेकडील अशाप्रकारची विमाने पाणबुडीविरोधी टेहळणी व निरीक्षणासाठी वापरली जातात. सामान्य परिस्थितीत वाहतुकी विमाने सरहद्दीवर नजर ठेवण्यासाठी, नागरी गरजांमुळे उद्भविणाऱ्या हवाई चित्रणासाठी किंवा इलेक्ट्रॉनिक टेहळणीसाठी वापरता येतात.
बॉम्बफेक : वायुसेनेच्या वाहतुकी विमानांचा वापर शत्रुप्रदेशात बॉम्बफेकीसाठी करण्यात येतो. १९७१च्या भारत-पाक युद्धात वायुसेनेच्या एएन्−१२ वाहतुकी विमानांचा वापर पश्चिमी पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील सैनिकी लक्ष्यांविरुध्द केला गेला होता.
रणगाडाविरोधी शस्त्र : अमेरिकी वायुसेनेने वाहतुकी विमानांच्या वापरात आणखी एक कल्पकता दाखविली. एसी−१३० जातीच्या वाहतुकी विमानात रणगाडाविरोधी शस्त्रे बसवून व्हिएटनाम युद्धात त्यांचा भरपूर वापर केला गेला.
अशाप्रकारे वायुदलाची वाहतूकक्षमता युद्धाच्या आघाडीवर आणि पिछाडीच्या क्षेत्रात विविधप्रकारे अमूल्य योगदान देते.
संदर्भ :
- Chakravarty, P. The Indo-Pak Bangladesh Liberation War 1971, India Strategic Magazine, Dec 2011.
- Luthra, Gulshan, IAF’s Innovative use of Transporters as Heavy Bombers, India Strategic Magazine, April 2013.
- http://www.bits.de/NRANEU/others/amd-us-archive/FM55-40%2871%29.pdf
- http://indiafacts.info/interesting-facts-about-raw/
- https://www.scribd.com/doc/109721067/Basic-Doctrine-of-Indian-Air-Force-2012-PDF
- https://www.thefreedictionary.com/tactical+air+transport+operations
समीक्षक : शशिकांत पित्रे
भाषांतरकार : उत्तम पुरोहित