इस्लामी तत्त्वज्ञानानुसार ईश्वराची नावे. कुराणात (कुरआनात) अल्लाहचे गुणविशेष दाखविणारे ९९ शब्द आहेत. या शब्दांना विशेषण म्हणता येईल. इस्लामी तत्त्वज्ञानानुसार अल्लाह (ईश्वर) निर्गुण-निराकार आहे. यातील निर्गुण हा शब्द गोंधळ घालणारा आहे. दया हा ईश्वराचा गुणविशेष आहे; पण दया दिसत नाही. सत्तार‒पापावर पांघरूण घालणारा‒बदनामीपासून वाचविणारा, हा गुण आहे; पण तो दिसत नाही. पण अवयव जे दृष्य आहेत‒हात, पाय, नाक, कान, डोळे इ.‒ते अल्लाहला नाहीत. या अर्थाने अल्लाह निर्गुण आहे. निराकार तर तो आहेच आहे.
रेहमत या शब्दापासून अल्-रेहमान आणि अल्-रहीम या संज्ञांची व्युत्पत्ती झाली असून अरबी भाषेत हा शब्द हळुवारपणा किंवा नजाकत या अर्थाने वापरला जातो. याशिवाय प्रेम, अनुकंपा, दिलदारपण, लोकहित अशा अनेक अर्थांनीही तो वापरला जातो. अल्-रेहमान म्हणजे करुणाकर (करुणावंत) आणि अल्-रहीम म्हणजे आपल्या करुणेचा प्रत्यय आणून देणारा (दयावंत). समग्र विश्वातील प्रत्येक वस्तुमात्राला प्राप्त होणारी भव्यता आणि उदात्तता या दोन संज्ञांतूनच प्राप्त होते, असाही एक अर्थ इस्लामी विचारवंत मौलाना अबुल कलाम आझाद (१८८८‒१९५८) यांनी त्यांच्या तर्जुमान-अल्-कुराण या भाष्यग्रंथात दिला आहे. आझाद यांनी पुढे असेही म्हटले आहे की, “जीवनात जे सुंदर आणि भव्योदात्त आहे, ते सर्व ईश्वरीय करुणेचा किंवा अनुकंपेचा आविष्कार असतो”.
आपण जेव्हा विश्वाच्या अस्तित्वाचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा या विश्वाच्या सर्व व्यवहारांत एक नियमबद्धता आणि नियमितपणा असल्याचे आपल्याला जाणवते. या नियमबद्धतेच्याद्वारेच आपण निसर्गाच्या जवळ येतो आणि निसर्गाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. निसर्गनियमांच्या या जाणिवेतूनच विश्वव्यवहाराच्या नियमांपलीकडे आणखी एक व्यापक वास्तव कार्यरत असते आणि त्यावरच विश्वव्यवहाराची नियमबद्धता अवलंबून असते. हे वास्तव म्हणजे अंतहीन काळाच्या प्रवाहात टिकून राहण्याची विश्वाची क्षमता; पण केवळ सातत्य राखणे एवढाच काही त्यामागे हेतू नसतो, हेही आपल्या लक्षात येते. किंबहुना, सातत्य हे साध्य नसून विश्वातील वस्तुमात्रांचे साधन असते. या सर्व व्यवस्थेत समतोल राखण्याचा प्रयत्नही नियतीने (कुदरतने) केलेला असतो.
सृष्टीच्या या सर्व व्यवस्थेतून लालित्याचा आणि सौंदर्याचा आकृतिबंध निर्माण होत असतो. या आकृतिबंधाचे गुणधर्म समजून घेतले की, त्यातील सुप्तावस्थेत असलेले सौंदर्यही आपल्याला दृष्टीगोचर होऊ लागते आणि आपली जाणीव जशी प्रगल्भ होऊ लागते, तसतसे निसर्गातील अभिजात सौंदर्याचे विविध पैलूही आपल्याला स्पष्टपणे दिसू लागतात. निर्झराचे लयबद्ध गीत, अनेक रंगांची-अनेक गंधांची फुले, हळुवार स्पर्शाने त्या फुलांना नृत्य करायला लावणारा आणि स्वत: सुगंधित होणारा वारा, मावळतीची सोनेरी सूर्यकिरणे किंवा सागराची घनगंभीर गाज (आवाज), ही सारी किमया म्हणजे निसर्गातील अभिजात संगीताचा आणि सौंदर्याचा आविष्कार असतो. पण या साऱ्या व्यवस्थेतून व्यक्त होणारे अभिजात संगीत असो किंवा नयनवेधक सौंदर्य असो, नियतीने त्यांना दिलेल्या नियमांच्या चौकटीत या प्रत्येक घटकाने आपली भूमिका वठवली पाहिजे, हा निसर्गनियम आहे. निसर्गातल्या एखाद्या घटकाने आपला मार्ग बदलला किंवा नियम मोडला की, मग विध्वंसाला सुरुवात होते. वारा बेलगाम होतो, समुद्रावर वादळे उठतात, नद्यानाल्यांना पूर येतात, पावसाच्या मुसळधारा कोसळतात, कधी उष्णता वाढते, कधी असह्य थंडी पडते, ही सगळीच विध्वंसाचीच रूपे असतात; पण विध्वंस म्हणजे नियम नसतो. तो फक्त अपवाद असतो. अल्पकाळातच सर्वकाही शांत होते, सुरळीत होते. सृष्टीचे सर्व व्यवहार पूर्ववत होतात.
कुराणाच्या सातव्या अध्याया(आयता)तील १५६व्या श्लोकात (सूरा) रेहमत या गुणविशेषाचा पुढील उल्लेख आहे :
अल्लाह म्हणाला, “माझी इच्छा असेल त्यालाच मी शिक्षा करेन. पण माझ्या दयेचे छत्र मात्र सर्व वस्तुमात्रांवर आहे. म्हणून मी त्याचा अशा लोकांवर वर्षाव करेन, जे सदाचाराने वागतात व दानधर्म करतात आणि आमच्या संदेशावर विश्वास ठेवतात”.
या आयतामध्ये ‘माझी इच्छा असेल त्यालाच मी शिक्षा करेन. पण माझ्या दयेचे छत्र मात्र सर्व वस्तुमात्रांवर आहे’, अशी परस्परविरोधी दिसणारी विधाने आली आहेत. ‘माझी इच्छा असेल त्याला मी शिक्षा करेन’, या विधानात जी व्यक्ती सन्मार्गापासून ढळली आहे किंवा जिने काही अपकृत्य केले आहे, तीच व्यक्ती शिक्षेस पात्र ठरते, हा अर्थ आहे; पण ती व्यक्ती जर पश्चातापदग्ध आणि पर्यायाने सदाचारी झाली असेल व त्याबरोबरच ईश्वराच्या संदेशावर श्रद्धा ठेवून दानधर्म करत असेल, तर ती व्यक्तीसुद्धा ईश्वराच्या दयेला पात्र ठरेल, असाही अर्थ आहे. ‘माझ्या दयेचे छत्र सर्व वस्तुमात्रांवर आहे’ या विधानातून हा अर्थ सूचित होतो. या अर्थाने ‘रेहमत’ ही संकल्पना सर्वसमावेशक आहे.
रेहमान ही संज्ञा जास्त व्यापक अर्थाची आहे; कारण त्यामध्ये अल्लाह हा सर्व मानवांचा, मुस्लीम धर्मीयांचा अथवा नास्तिकांचाही उपकारकर्ता आहे, हा अर्थ अंतर्भूत आहे; तर रहीम या संज्ञेचा अर्थ अल्लाहची इस्लाम धर्मीयांवरील कृपादृष्टी एवढ्यापुरताच मर्यादित आहे, असे वैदावी याने कुराणातील १/१ या आयतावरील भाष्यामध्ये म्हटले आहे.
संदर्भ :
- Husain, Athar, Prophet Muhammad and His Mission, New Delhi, 1967.
- Kidwai, Mohammad Asif, What Islam Is?, Lucknow, 1967.
- Salahi, M. A. Muhammad : Man and Prophet, Massachusetts, 1995.
- Watt, W. Montgomery, Muhammad : Prophet and Statesman, Edinburgh, 1960.
- अबुल हसन अली नदवी, इस्लाम : एक परिचय, नई दिल्ली, २०१६.
- केळकर, श्रीपाद, अनु. इस्लामची सामाजिक रचना, पुणे, १९७६.
समीक्षक : गुलाम समदानी