ग्रीक पुराणकथांमधील आख्यायिका बनलेला एक थोर ग्रेको-रोमन वीरपुरुष. हेराक्लीझ या नावानेही तो परिचित आहे. हर्क्यूलीझविषयीच्या पुराणकथा अतिशय गुंतागुंतीच्या आहेत. हर्क्यूलीझ मूलत: मानवी वीर असावा, असे दिसून येते. तो कदाचित आर्गोस या राज्याच्या अधिपतीचा पोटजहागीरदार होता. हर्क्यूलीझचा जन्म थीब्झ येथे झाल्याचे मानतात. परंपरागत कथनानुसार पर्सियसची नात राजकन्या अल्कमेनी व देवांचा राजा झ्यूस हे हर्क्यूलीझ याचे माता-पिता होते. झ्यूसची पत्नी हेरा हिला अल्कमेनीविषयी मत्सर वाटत असे व ती हर्क्यूलीझचाही तिरस्कार करीत असे. हर्क्यूलीझला हेराचा खुनशी छळ आयुष्यभर सहन करावा लागला. शिवाय ती हर्क्यूलीझचा बुद्धिभ्रंश करायला टपलेलीच असे. हर्क्यूलीझ विचार करणारा होता व त्याने खडतर, परंतु सदाचरणी जीवन जगण्याचे ठरविले होते.

पर्सिड घराण्यातील दुसरा मुलगा ग्रीसचा सत्ताधीश झाला पाहिजे, असा निर्धार झ्यूसने केला होता; मात्र हेराच्या मत्सरी हिकमतीमुळे हर्क्यूलीझऐवजी त्याच्या आधी जन्मलेला यूरिस्थेअस हा आजारी मुलगा गादीवर बसला आणि मोठा झाल्यावर हर्क्यूलीझला या राजाची सेवा करावी लागली. नंतर बिओटियातील ऑर्कोमेनसच्या राज्यावर हल्ला चढवून हर्क्यूलीझने ही लढाई जिंकली व त्याने मेगारा या राजकन्येशी विवाह केला; परंतु या वेळी हेराने त्याचा बुद्धिभ्रंश केला आणि त्याच तिरिमिरीत त्याने आपली पत्नी व मुले यांना मारून टाकले. या खुनांचे प्रायश्चित्त म्हणून हर्क्यूलीझला टायरिअसच्या यूरिस्थेअस राजाची १२ वर्षे सेवा करावी लागेल, असे त्याला डेल्फी येथील देवाच्या पुजाऱ्याने (ओरॅकलने) सांगितले. या राजाने मग पुढील साहसी, अचाट बारा कामे (लेबर्स) करण्याची आज्ञा हर्क्यूलीझला केली. या कामांमुळे त्याला अमरत्व लाभणार होते. प्राचीन लेखकांनी या बारा साहसी कामांची वर्णने केली असून त्यांत भिन्नता व बदल झालेले दिसतात. खरेतर हर्क्यूलीझच्या अशा कामांची सुरुवात त्याच्या बालपणीच झाली होती. हर्क्यूलीझ बालक असताना त्याला मारण्यासाठी हेराने त्याच्या पाळण्यात दोन विषारी साप ठेवले होते; मात्र हर्क्यूलीझने गळे दाबून ते साप मारले होते. पुढे सर्वाधिक मान्य असलेल्या बारा साहसी कामांचे वर्णन थोडक्यात दिले आहे. यांपैकी पहिली सहा साहसी कृत्ये त्याच्या जन्मगावाच्या जवळ, तर पुढील सहा साहसे त्याच्या घरापासून अधिकाधिक दूरवरच्या ठिकाणी घडली आहेत.

  • हर्क्यूलीझने नेमिअन या भयंकर सिंहाला ठार मारले. हा सिंह शस्त्राने मरणारा नव्हता. या सिंहाचे कातडे विजयाचे प्रतीक म्हणून हर्क्यूलीझ वस्त्राप्रमाणे अंगावर घेत असे व यामुळे तो अजिंक्य झाला होता.
  • लेर्नाच्या नऊ डोकी असलेल्या हायड्रा नावाच्या भयंकर सापाला हर्क्यूलीझने आयओलाउस या जवळच्या भावाच्या मदतीने ठार मारले. याची डोकी कापली की, ती लगेच परत वाढत असत. त्यामुळे हर्क्यूलीझने डोके छाटल्यावर आयओलाउस अग्नीने दाहकर्म करून मान सीलबंद करीत असे. यामुळे डोके परत वाढण्यास अटकाव होत असे. हायड्राला एक अमर डोके होते. ते हर्क्यूलीझने छाटून दगडाखाली पुरले. मग हर्क्यूलीझने हायड्राचे रक्त आपले बाण विषारी करण्यासाठी वापरले.
  • आर्काडियाच्या झुकांडी देऊन पळून जाणाऱ्या काळविटाला (हरिणाला) हर्क्यूलीझने अपहरण करून बंदिवान केले. आर्टेमिसला पूज्य असलेल्या या काळविटाचे खूर पितळी, तर मृगशृंगे सोन्याची होती. ब्रिटिश म्यूझियममध्ये इ.स.पू. ५४०चे चंबूसारखे एक पात्र आहे. त्यावर सदर हरिणाची मृगशृंगे तोडणारा हर्क्यूलीझ दाखविला असून त्याच्या दोन बाजूंना अथेना व आर्टेमिस दाखविल्या आहेत.
  • मौंट एरिमँथसवरील प्रचंड मोठे रानडुक्कर हर्क्यूलीझने पकडले.
  • एलिसच्या ऑगिअस राजाचे जनावरांचे तबेले हर्क्यूलीझने एका दिवसात धुऊन त्यांचे शुद्धीकरण केले. यासाठी त्याने अल्फीअस व पेनीअस या नद्यांचे पाणी वळवून ते जोराने तबेल्यांतून नेले. या तबेल्यांमुळे घातक साथीचे रोग पसरत असत.
  • स्टायंफलस सरोवरालगतच्या वनामधील हिंस्र पक्ष्यांचा थवा हर्क्यूलीझने शिकार करून नष्ट केला. या राक्षसी नरभक्षक पक्ष्यांना बाणासारखी पिसे होती व ते ती लोकांना फेकून मारीत असत. हे पक्षी भयानक करकोचा व शहामृग यांचा संयोग झाल्यासारखे होते.
  • क्रीट बेटावर दहशत निर्माण करणाऱ्या मिनॉस राजाचा मस्तवाल बैल हर्क्यूलीझने पकडला. हा बैल मुखातून ज्वाला ओकीत असे.
  • हर्क्यूलीझने बिस्टोनीस राजाच्या थ्रेस येथील नरभक्षक घोड्या पकडल्या. त्या यूरिस्थेनीसला आणल्या व त्याने त्या माणसाळविल्या.
  • हर्क्यूलीझने ॲमेझॉन्सच्या हिप्पोलाइट राणीचा पराभव करून तिचा कमरपट्टा मिळविला.
  • प्राचीन जगाच्या अगदी पश्चिम सीमेपर्यंत जाऊन हर्क्यूलीझने एरिथिइआ (लाल) बेटावर सत्ता गाजविणाऱ्या तीन देह असलेल्या गेरिऑन या भयंकर राक्षसाचे पशुधन पकडले. या राक्षसाला तीन धडे, सहा हात व सहा डोकी होती.
  • प्राचीन जगाच्या अंतिम टोकाशी असलेल्या हेस्पराइड्स बागेतील जीवनवृक्षावरील (Tree of Life) सोन्याची सफरचंदे हर्क्यूलीझने चोरून आणली. या कामात त्याला ॲटलासने मदत केली, तेव्हा ॲटलासच्या खांद्यावरील पृथ्वी हर्क्यूलीझने आपल्या खांद्यावर घेतली होती. न झोपणारा लेडॉन व ॲटलास राक्षस हे या बागेचे रक्षक होते.
  • हर्क्यूलीझ मृतांच्या खालील जगात उतरला व तो सेर्बेरस या तीन डोक्यांच्या रखवालदार कुत्र्याला वरील जगात घेऊन आला.

ही बारा साहसी कामे राशिचक्रातील तारकासमूहांशी जुळणारी आहेत. हर्क्यूलीझची शेवटची तीन अचाट कामे ही मृत्यूवरील विजयाची प्रतीके असून त्यांमुळे त्याला अमरत्व प्राप्त झाल्याचे मानतात.

हर्क्यूलीझने यांव्यतिरिक्त अनेक साहसी कृत्येही केली. सोन्याच्या लोकरीचा शोध घेण्यासाठी आर्गनॉटिसने काढलेल्या जलप्रवासाच्या मोहिमेत हर्क्यूलीझ सहभागी झाला. तेव्हा त्याने ईजिप्तचा राजा बुरसिरिस व आरेसचा पुत्र सिंकस यांना मारले. हर्क्यूलीझने कुस्तीत मृत्यूचा पराभव करून राजा ॲडमेंटसच्या अल्सेस्टिस या पत्नीला परत जिवंत केले. शिवाय हर्क्यूलीझने अँटीअस या राक्षसालाही मारले. हा राक्षस त्याच्या आईच्या म्हणजे पृथ्वीच्या संपर्कात असला की, त्याला पुन्हा सामर्थ्यप्राप्त होत असे. त्यामुळे तो दुर्बल होईपर्यंत हर्क्यूलीझने त्याला पृथ्वीपासून दूर ठेवून त्यांच्यातील संपर्क तोडला होता. यूरोपातील जिब्राल्टरचा खडक आणि त्याच्या अगदी विरुद्ध बाजूचा आफ्रिकेतील स्यूता बंदरालगतचा जेबेल मूसा या जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीच्या पूर्वेकडील टोकाजवळ दोन बाजूंना असलेल्या उंचवट्यांना प्राचीन काळी हर्क्यूलीझचे स्तंभ म्हणत असत; कारण यामागे त्याच्याविषयीची पुढील कल्पित कथा आहे : प्राचीन जगाच्या पश्चिमेकडील प्रवासाच्या शेवटी हर्क्यूलीझने हे उंचवटे उभारले अथवा त्याने एका पर्वताचे दोन भाग करून जिब्राल्टरची सामुद्रधुनी तयार केली.

बारा साहसे पूर्ण केल्यावर काही काळाने हर्क्यूलीझने राजकन्या दीआनिरा हिच्याशी विवाह केला. नेसस या नरतुरंगमाने (नराश्वाने) दीआनिरावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, म्हणून हर्क्यूलीझने त्याला विषारी बाण मारला. मरणपंथाला लागलेल्या नेससने दीआनिराला सांगितले की, माझे रक्त तू साठवून ठेव; कारण या रक्ताने माखलेले कपडे घातल्यावर हर्क्यूलीझ तिच्यावर शाश्वत प्रेम करील. यानंतर अनेक वर्षांनी हर्क्यूलीझ ओकालियाच्या युरिटस राजाच्या आयोले या कन्येच्या प्रेमात पडला; मात्र दीआनिराला आयोले ही आपली घातक प्रतिस्पर्धी होईल असे वाटले. म्हणून तिने नेससच्या रक्ताने माखलेला झगा हर्क्यूलीझला पाठविला. मात्र हे रक्त हर्क्यूलीझच्या बाणामुळे विषारी झाले होते व त्यामुळे हर्क्यूलीझ मृत्यू पावला. या विषाने त्याच्या अंगाचा इतका दाह झाला की, त्याने स्वतःला माउंट ओएटा (ग्रीक ओइटा) येथे सरणावर ठेवायला सांगितले. त्याचा पार्थिव भाग नष्ट झाला व दैवी भाग स्वर्गात गेला. तेथे तो देवाचे घर असलेल्या ऑलिंपिसमध्ये जाऊन देवरूप झाला. तो हर्क्यूलीझ तारकासमूहाच्या रूपात दिसतो, असेही मानतात. स्वर्गात त्याने हेराशी समेट करून हेबेशी (वरुण देवता) विवाह केला, असेही म्हणतात.

इटलीत व्यापारी व उद्योजक यांची देवता म्हणून हर्क्यूलीझची पूजा करतात. शिवाय सुदैवी व धोक्यापासून मुक्ती देणारा या त्याच्या गुण-वैशिष्ट्यांमुळे इतर लोक त्याची प्रार्थना आणि उपासना करतात.

साहित्य व कला यांमध्ये हर्क्यूलीझ प्रचंड शक्तिमान आणि धाडसाची अचाट कामे करणारा मानला जातो; मात्र तो माफक उंची असलेला, खादाड, मद्यपी, अतिशय कामुक पण दयाळूही होता, असे मानतात. प्रसंगी त्याला पाशवी क्रोधाचा झटका येत असे. त्याचे बाण हे खास शस्त्र होते; पण अधूनमधून तो गदाही वापरीत असे, असे म्हणतात. सामर्थ्याचे मानवीकरण केलेल्या हर्क्यूलीझने ऑलिंपिक क्रीडा सामन्यांची स्थापना केल्याचे मानतात.

ताकद, धैर्य किंवा कष्ट या बाबतींत अचाट शक्तिशाली व्यक्तीला हर्क्यूलीझ हे विशेषण लावतात. तसेच राक्षसी, करायला कठीण अशा अचाट शक्तीच्या कामाला इंग्रजीत त्याच्यावरून ‘हर्क्यूलियन टास्क’ किंवा ‘लेबर’ म्हटले जाते.

संदर्भ :

  • Pinsent, John, Greek Mythology, Oxford, 1982.
  • Lurker, Manfred, The Routledge Dictionary of Gods and Goddesses, Devils and Demons, Routledge, London, 1984.
  • https://www.ancient.eu/article/733/the-life-of-hercules-in-myth–legend/
  • https://www.history.com/topics/ancient-history/hercules