हेरा ही स्त्री, न्याय्यविवाहसंबंध, जन्म या गोष्टींची अधिष्ठात्री ग्रीक देवता होय. विवाहित स्त्रियांच्या हक्कांची रक्षणकर्त्री. रोमनांमध्ये यूनो या नावाने ती प्रसिद्ध आहे. क्रोनस व रीया यांची ती कन्या. झ्यूसची ज्येष्ठ बहीण-पत्नी असलेली हेरा ऑलिंपस पर्वतावरील देवतासमूहातील महाराणी होती. युद्धदेव एरिस, हीफेस्टस, अपत्यजन्मदेवता इलिथिआ आणि हेबे यांची ती माता.

पत्नीशी एकनिष्ठ नसलेला पती असे झ्यूसचे, तर आत्यंतिक मत्सरी पत्नी असे हेराचे चित्रण ग्रीक साहित्यात आढळते. झ्यूसच्या विवाहबाह्य संबंधांमुळे त्या दोघांतील कलह अनेकदा विकोपाला गेल्याचे आढळतात. झ्यूस व मीटिस यांची कन्या अथेना जेव्हा झ्यूसच्या मस्तकातून बाहेर पडली, तेव्हा हेरा इतकी संतापली की तिने टायफॉन या राक्षसाला जन्म दिला, ज्याला झ्यूसने शर्थीच्या प्रयत्नांती बंदिवान केले. हेरा झ्यूसच्या अनौरस मुलांना शासन करण्यात बराच काळ गुंतलेली दिसते. एकदा स्वतःविरुद्ध कारस्थान रचल्याचे उघडकीस आल्यानंतर शिक्षा म्हणून झ्यूसने हेराला सुवर्णशृंखला बांधून लटकावले होते.

ट्रोजन युद्धात हेरा ग्रीकांच्या पक्षात होती; कारण ॲफ्रोडाइटीला सुवर्णफल प्रदान केल्याबद्दल तिला ट्रोजनांचा तिरस्कार होता. मोरांचा रथ हे तिचे वाहन असून मोर, बदक, कोकीळपक्षी हे तिचे सहचर होत. आर्गोस हे ठिकाण हेराचे पूजास्थान. तेथे दर पाच वर्षांनी तिच्या सन्मानार्थ उत्सव साजरा केला जात असे. सुमारे आठव्या शतकात सॅमोस येथे तिचे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. तसेच सुमारे पाचव्या शतकातील मॅग्ना ग्रेशीया येथील तिच्या मंदिराचे अवशेष आढळतात.

सिंहासनावर विराजमान किंवा मुकुटधारी, दंडधारी व हातात सुफलनाचे प्रतीक म्हणून डाळिंब धारण करणाऱ्या हेराच्या मूर्ती आढळून येतात.

संदर्भ :

  • Cotterell, Arthur, The Illustrated Encyclopedia of Myths & Legends, London, 1989.
  • Rengarajan, T. Dictionary of World Gods and Goddesses, Delhi, 2008.
  • Smith, William, Ed. A Dictionary of Greek and Roman Biography and Mythology, vol.1, New York, 2007.
  • https://greekgodsandgoddesses.net/goddesses/hera
  • www.ancient.eu/Hera/

                                                                                                                                                                    समीक्षक : शकुंतला गावडे