मनसुख, रामदासबाबा  : (जन्म. १९१७ – मृत्यू. १९९९). महाराष्ट्रातील प्रसिध्द वारकरी कीर्तनकार. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मंगरूळ पारगाव येथे झाला. १९२६ मध्ये श्री क्षेत्र आळंदी येथे त्यांनी वारकरी संप्रदायाची दिक्षा घेतली. श्रीमदभगवतगीता, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, सकल संतगाथा यांचे अध्ययन करून, त्यावर चिंतन करून रामदासबाबांनी प्रवचन आणि कीर्तन सेवा सुरू केली. १९२९ मध्ये महात्मा गांधीजींच्या असहकार आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. १९३८ मध्ये त्यांनी पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्यातील खिलारवाडी येथून आळंदी पर्यंत पहिला दिंडी सोहळा सुरू केला.

रामदासबाबा मनसुख यांच्यावर पुणे जिल्हयातील तत्कालीन कीर्तनकार सहादूबाबा वायकर, नारायणबाबा मनसुख, कोंडाजीबाबा डेरे, गोपाळबुवा येणेरेकर, मारूतीबुवा ठोंबरे आदींचा मोठा प्रभाव होता. मामासाहेब दांडेकर यांच्या कीर्तन परंपरेचे संस्कार रामदासबाबा मनसुख यांच्यावर झाले. १९४२ च्या चलेजाव आंदोलानात त्यांचा सक्रिय सहभाग होता. याच काळात त्यांनी श्रीराम मंदिर कॉटनग्रीन मुंबई  येथून आळंदी, पंढरपूर येथे दिंडी सोहळा सुरू केला. १९४८ साली रामदासबाबांनी नेपाळ नरेश यांच्या निमंत्रणावरून नेपाळ येथे ज्ञानेश्वरी पारायण आयोजित केले. मामासाहेब दांडेकर यांच्याहस्ते १९५२ मध्ये पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्यातील निमगाव येथे त्यांनी ज्ञानमंदिर नावाने वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. तेथेच १९५३ मध्ये वारकरी विद्यालय सुरू केले. राज्यातील सर्व वारकरी बांधवांना एकत्र करण्यासाठी १९६७ मध्ये त्यांनी वारकरी महामंडळाची स्थापना केली. रामदासबाबांच्या पुढाकाराने ८ जुलै १९६८ मध्ये पहिली अखिल भारतीय वारकरी परिषद स्थापन झाली. या परिषदेतर्फे महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करांविरूध्द लढा उभा करण्यात आला. या लढयाचे नेतृत्व रामदासबाबा यांनी केले. या लढयाच्या अंतर्गत देहू, त्र्यंबकेश्वर येथे १९६९ मध्ये मोर्चा आणि सत्याग्रह आयोजित करण्यात आला. तीर्थक्षेत्र कर विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आळंदी येथे १९७० मध्ये काढलेल्या मोर्चामुळे रामदासबाबांना अटक झाली. तसेच तुरूंगवासाची शिक्षा झाली. २७ जून १९७७ रोजी रामदासबाबा यांनी त्यांच्याच नेतृत्वाखाली हजारो वारकऱ्यांसमवेत पंढरपूर येथे मोर्चा काढला, आंदोलन केले परिणामस्वरूप ३० जून १९७७ रोजी महाराष्ट्र शासनाने सर्व तीर्थक्षेत्रांवरील यात्रा कर रद्द केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील बडवे, उत्पातांचे वर्चस्व कमी करण्यासाठी ७ एप्रिल १९८० मध्ये रामदासबाबांच्या नेतृत्वाखाली भायखळा ते मंत्रालय असा मोर्चा काढण्यात आला. जून १९८१ मध्ये श्री विठोबा मुक्ती संग्राम समितीची स्थापना झाली. २५ फेब्रुवारी १९८५ रोजी बडवे, उत्पात मंडळ बरखास्त करून महाराष्ट्र शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार पंढरपूर देवस्थान कायदा लागू केला. रामदासबाबा मनसुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात अनेक कीर्तनकार उदयाला आले. रामदासबाबा स्वानंद प्रदीप हे मासिक प्रसिध्द करीत असत. केंद्रीय स्तरावर रामदासबाबांच्या कार्याचा गौरव झाला असून त्यांना संतवीर आणि प्रचार केसरी अशा नामाभिधानाने दिली गेली आहेत. ७ मार्च १९९९ रोजी निमगाव ता. जुन्नर येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : क्षेत्रसंशोधन