लक्ष्मणबोवा इगतपुरीकर : ( १८७७ – १९५२ ). वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून सर्वपरिचित. त्यांचा जन्म  वडील केरुजी आणि आई भागुबाई यांच्या पोटी इगतपुरी येथे झाला. त्यांचे पूर्वज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील अंबूर या गावचे होत. लक्ष्मणबोवा हे धनगर हाटकर समाजाचे. पंढरीचा विठोबा आणि जेजुरीचा खंडोबा ही त्यांच्या घरची आराध्य दैवते होती. लक्ष्मणबोवांचे आजोबा काळोजी खेमनर हे लढवय्ये होते. पेशवाईचा अस्त झाला होता आणि इंग्रजी राजवट स्थिरावली होती त्या काळात महाराष्ट्रात वेळोवेळी दंगे होत. अशाच एका दंग्यात काळोजींचा अंत झाला त्यानंतर मुलांची जबाबदारी काळोजींच्या पत्नी वालुबाई यांच्यावर पडली. काळोजीना दोन मुले होती. केरोजी आणि दाजीबा. हे कुटुंब इगतपुरीला आले. लक्ष्मणबोवांना दोन ज्येष्ठ बंधू मारुती, गोविंद तर तीन कनिष्ठ भगिनी म्हाळसा, गिरीजा, गंगू तसेच कनिष्ठ बंधू गोपाळ अशी ही सात भावंडे होती. १८८३ साली लक्ष्मणबोवांना शाळेत प्रवेश दिला गेला. इंग्रजी चौथी पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. बालपणापासूनच त्यांना भजनाचा छंद जडला. जी. आय. पी. रेल्वे इगतपुरीत त्यांनी नोकरी धरली. गांधी चौकातील राम मंदिरात ते नित्यनेमाने भजनास जात असत. लक्ष्मणबोवा भजनी मालिका आणि ज्ञानेश्वरीचे वाचन कामावरही करीत. त्याला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आक्षेप घेताच त्यांनी नोकरी सोडली. भजनाच्या निमित्ताने त्यांची बंकटस्वामींशी मैत्री झाली ती अखेरपर्यंत टिकली.

१८८९ साली सद्गुरू विष्णूबोवा जोग महाराजांचे बंधू मॅजिस्ट्रेट आबासाहेब जोग यांची बदली पुण्याहून इगतपुरीला झाली. त्यांच्यासोबत जोग महाराज देखील इगतपुरीला आले. इगतपुरीच्या पारमार्थिक शंकरराव आणि अप्पाराव पांगारकर यांनी जोग महाराजांना भजनासाठी आपल्या घरी बोलावले. या भजनाला लक्ष्मणबोवा, बंकटस्वामी उपस्थित झाले. जोग महाराज ज्ञानेश्वरी, अमृतानुभव  सांगत असत. त्या निमित्ताने बंकटस्वामी आणि लक्ष्मणबोवांची श्रवणभक्ती होत असे. जोग महाराजांबरोबर बंकटस्वामी आणि लक्ष्मणबोवा दर महिन्याला श्री निवृत्तीनाथांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जात असत. लक्ष्मणबोवांचे वय १४ वर्षे असताना गावात प्लेग ची साथ आली. गावाबाहेर झोपडे बांधून तेथे जोग महाराज ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आदी ग्रंथ सांगत. इगतपुरीला विष्णूबोवा जोग महाराज, बंकटस्वामी, लक्ष्मणबोबा यांचा ज्ञानयज्ञ अखंड सुरु होता. बंकटस्वमी देहू जवळच्या भंडाऱ्या डोंगरावर अनुष्ठान करीत असत तेथेच त्यांच्यासोबत लक्ष्मणबोवा अनुष्ठान करीत असत. भंडारा भामचंद्र डोंगरावरची अनुष्ठाने, जोग महाराजांच्या घरी पुण्यात घेतलेले संत वाङमयाचे शिक्षण, आळंदीतील अजानवृक्षांखाली १०८ पारायणे, डेहराडून येथील वेदान्त शिक्षण, स्वतःहून स्वीकारलेला अज्ञातवास नंतर पुन्हा जोग महाराजांची शरणागती अशा अनेक अनुभवांमधून लक्ष्मणबोवा गेले. जोग महाराजांच्या आज्ञेप्रमाणे इगतपुरी परिसरात लक्ष्मणबोवा कीर्तन, प्रवचने करू लागले.

इंदूर संस्थानचे राजे तुकोजीराव होळकर यांनी लक्ष्मणबोवांना नामसप्ताहासाठी पाचारण केले. लक्ष्मणबोवा आपले शिष्य बन्सीबोवा करवा यांना घेऊन इंदूरला नामसप्ताहाला गेले. लक्ष्मणबोवांचा सत्कार तुकोजीरावांनी केला पण त्यांची निरपेक्ष वृत्तीची पाहून राजे तुकोजीरावांना ही आश्चर्य वाटले. लक्ष्मणबोवा केवळ कीर्तन, प्रवचनकार अथवा संत साहित्याचे अभ्यासक होते इतकेच नव्हे तर बुद्धिप्रामाण्यवादी पुरोगामी विचारांचे होते. ते १५- २० भाविकांसोबत द्वारकेस निघाले तेव्हा वाटेत मातृगयेस सर्व मंडळी उतरली. तेथील पुजारी १० रुपये घेऊन तुमच्या माता पितरांना स्वर्गात जागा देतो असे सांगू लागले हे पाहून लक्ष्मणबोवा संतप्त झाले. त्यांनी तेथील पाखंडी वृत्तीचा दंभस्फोट केला. लक्ष्मणबोवांना कर्मकांड मान्य नव्हते. ते केवळ भगवत भक्त होते असे नव्हे तर देशभक्ती ही होते. १९२० साली लोकमान्य टिळकांचे निधन झाले आणि भारतीय स्वातंत्र्याची चळवळ महात्मा गांधीजींच्या हाती आली. महात्मा गांधींवर लक्ष्मणबोवांची अपार श्रद्धा होती. मिठाच्या सत्याग्रहाला प्रतिसाद देण्यासाठी त्यांनी जोग महाराज पथक  नावाची दिंडी काढली. लक्ष्मणबोवा कीर्तनाचे पैसे घेणाऱ्यांवर सडकून टीका करीत. १९४४ ते १९५२ या कालावधीत ते आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • शताब्दी महोत्सवी शतामृतधारा, वारकरी शिक्षण संस्था, आळंदी.