रंगनाथ महाराज परभणीकर : ( ? १८८९ – ४ जानेवारी १९७० ). वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार. मूळ नाव – रंगनाथ कोंडीबा चिद्रेवार. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील परभणी जिल्ह्यात सोनपेठ या गावी झाला. त्यांचे वडील कोंडीबा व आई मनुबाई हे दोघे भगवतभक्त व अध्यात्मिक वृत्तीचे होते. महाराजांचे पणजोबा राणोबा हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. त्यांना तुकाराम महाराज गाथा तोंडपाठ होती. सोनपेठ ते पंढरपूर वारी ते करीत असत. तसेच रंगनाथ महाराजांचे आजोबा म्हणजे आबा हे निष्ठावंत वारकरी होते. त्यांनी पंढरीची मासिक वारी सुरु केली. रंगनाथ महाराजांचे विठ्ठल हे थोरले बंधू व लक्ष्मण आणि मारुती ही लहान भावंडे होती. महाराजांचे लौकिक शिक्षण हे इयत्ता ४ थी – ५ वी झाले होते. लहानपणापासून त्यांना अध्यात्माची ओढ होती.

तसेच आजोबा, पणजोबाकडून त्यांना वारकरी संप्रदायाचा वारसा मिळाला होता. रंगनाथ महाराज ६ ते ७ वर्षाचे असतानाच त्यांचे मातृ – पितृ हरपले. त्यांच्या घरी कापसाचा व्यापार केला जात होता. त्या व्यापारात तोटा आल्याने तो व्यापार सोडला व अध्यात्माकडे वळले. रंगनाथ महाराजांनी पैठण येथील ठाकूरबुवा महाराजांकडून तुळशीची माळ घालून घेऊन वारकरी संप्रदायात प्रवेश केला. रंगनाथ महाराजांनी सोनपेठ येथील सत्पुरुष योगानंद यांचे शिष्य गंगाराम यांच्याकडून अध्यात्माचे प्राथमिक धडे घेतले. तसेच प. पू. श्री. शंकरानंद सरस्वती स्वामी यांच्याकडून विचार सागर  व वृत्ती प्रभाकर  या गूढ तत्त्वज्ञान दर्शक ग्रंथांचे मार्गदर्शन घेतले व सखोल अभ्यास केला. तसेच काशीक्षेत्री जाऊन संस्कृत भाषेचे शिक्षण व वेदांत ग्रंथांचे अध्ययन केले. अध्यात्माच्या गोडीने महाराजांनी विवाह न करण्याचा निर्णय घेतला व छोटे बंधू लक्ष्मणचा विवाह संपन्न करून ते सरळ आळंदीच्या साधकाश्रमात पोहचले.

गुरुवर्य ह. भ. प. विनायक महाराज साखरे तथा दादा महाराज यांना गुरुस्थानी ठेवून साधकाश्रमात त्यांनी अध्यात्मिक अध्ययनाला निष्ठापूर्वक सुरुवात केली. अनेक वर्षे चिकाटीने, जिद्दीने व अध्यात्म्याच्या ओढीने ते शिकत राहिले. श्रद्धापूर्वक अध्ययनामुळे ते आपल्या गुरूंचे लाडके शिष्य होते. गुरूंनी घेतलेल्या परीक्षेत ते यशस्वी ठरले व तेथून ते अधिकारी पुरुष म्हणून प्रबोधन कार्यासाठी बाहेर पडले. त्यांच्या ठायी असलेल्या विद्ववत्तेमुळे काशीच्या ब्राह्मण सभेत त्याचा गौरव करण्यात आला. साधकाश्रमातील वास्तव्य व अध्ययनामुळे महाराजांच्या अंगी प्रखर वैराग्य प्राप्त झाले. म्हणून प्रबोधन कार्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेले वडिलोपार्जित घर नगरेश्वर मंदिराला दान देऊन टाकले.

रंगनाथ महाराजांनी महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचने केली. अद्वैत वेदांताचा गाढा अभ्यास असल्यामुळे अतिशय सहज सोप्या भाषेत वेदांत सांगण्याचे कौशल्य महाराजांकडे होते. महाराजांचा वेद, वेदांत, उपनिषदे, संतसाहित्य याचा गाढा अभ्यास होता. त्यामुळे कलीयुगात मोक्षप्राप्तीसाठी भक्ती व नामस्मरणाचे महत्व ते लोकांना पटवून देत असत. आपल्या कीर्तन -प्रवचनातून त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. लोकांना वारकरी होण्याचा आग्रह त्यांनी धरला. अतिशय सहज, सोपी भाषाशैली, मराठवाड्याच्या बोली भाषेचा वापर, उदाहरणे, दृष्टांत देऊन विषय पटवून देण्याची पद्धत, तसेच सामान्यजनांना पटेल, रुचेल, समजेल, पचेल अशा पद्धतीने गहन, गूढ, अवघड, क्लिष्ट भाग समजावून देणे या महाराजांच्या कीर्तन – प्रवचनातील वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या कीर्तनाला हजारो श्रोत्यांची गर्दी जमे. पंढरपूर येथे चातुर्मासात राहून त्यांनी ज्ञानेश्वरीअमृतानुभव या ग्रंथांचे विवरणही सांगितले तसेच पाठाच्या माध्यातून वेद – वेदांत ग्रंथांचे विश्लेषण समजावून देण्याचा नवीन प्रकार रूढ केला. महाराजांनी आपल्या कीर्तन – प्रवचनातून देह , आत्मा, परमात्मा, मनोनिग्रह, भक्तिमार्ग,संतसंगती, नामस्मरण, परमार्थ व जीवनमुक्ती अशा विषयांवर समाजाचे अध्यात्मिक प्रबोधन सहज, सोप्या भाषेत केले. संसारासक्ती, संसारातील फोलपणा, संसारातील विरक्ती, संसार आणि परमार्थ, सद्गुरुंचे महत्त्व, सद्गुरूंचा शोध, सद्गुरूंची शिकवण, सद्गुरुंच्या सेवेचा लाभ, मोहनिवृत्ती, वारकरी संप्रदाय, ज्ञान – अज्ञान सर्वांमध्ये ईश्वराचा अंश, अनीती, अनाचा , व्यसनमुक्ती व भक्तीचा खरा मार्ग या विषयावर समाजाचे प्रबोधन केले.

रंगनाथ महाराजांनी आपल्या कीर्तन – प्रवचनातून देहावर मनुष्याचे संस्कार आवश्यक, वैराग्य, ज्ञान, मोक्ष, श्रवण, भक्ती, वारकरी संप्रदाय, पर्यावरण रक्षण, समता, समरसता, मानवता, भूतदया, मदतीचा भाव, संघटन, अन्यायाविरुद्ध संघर्ष, स्त्री – पुरुष समानता या संदर्भातील सामाजिक जाणिवा विकसित केल्या. महाराजांनी केलेल्या अध्यात्मिक प्रबोधनामुळॆ लाखो वारकरी संप्रदायात आले. तसेच अनेक गावे व्यसनमुक्त झाली. पन्नासवर्षाहून अधिक काळ त्यांनी वारकरी संप्रदायाच्या प्रचार – प्रसारासाठी कार्य केले. लाखो लोकांच्या जीवनात भगवतभक्ती निर्माण केली. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ते महाराष्ट्रभर कीर्तन – प्रवचनासाठी फिरत राहिले . महाराजांच्या ठायी प्रखर वैराग्य होते. त्यामुळे त्यांची राहणी आणि खान – पान अतिशय साधे होते. महाराज कीर्तन – प्रवचनासाठी कधी मानधन घेत नसत. कोणी देण्याचा प्रयत्न केला किंवा घेण्याचा आग्रह केला तर ते तो कार्यक्रम घेत नसत. कोणी कपड्याचा आहेर करू लागले तर प्रथम नम्रपणे नाकारत पण कोणी जबरदस्ती करू लागले तर काडीपेटी घेऊन त्या कपड्याना आग लावू का ? असे म्हणत असत. कीर्तन – प्रवचनासाठी ते नेहमी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करीत असत. महाराजांच्या ठायी असलेल्या वैराग्यामुळे ते प्रसिद्धीपासून नेहमी लांब राहिले. त्यांनी शिष्य जमवले नाहीत किंवा गादी निर्माण केली नाही. त्यांच्या निर्वाणानंतर त्यांनी केलेल्या कीर्तन -प्रवचनाची संपादित ग्रंथ प्रसिद्ध झाले .

आयुष्भर कीर्तन – प्रवचनातून प्रबोधनाचे कार्य करणारे रंगनाथ महाराज यांचे परभणी येथे निधन झाले. या अंत्ययात्रेत वारकरी संप्रदायातील सर्व अधिकारी पुरुष, वीस ते बावीस हजार वारकरी सामायिक झाले होते. आळंदी येथे रंगनाथ महाराज परभणीकर यांचा मठ आहे. त्यांच्या परमार्थाचा वारसा या मठात चालविला जातो.

संदर्भ :

  • क्षेत्रसंशोधन