नमनखेळे : महाराष्ट्रातील उत्तर कोकणातला लक्ष्यवेधी असा विधीनृत्य प्रकार. धार्मिक विधी म्हणून त्याची ओळख आहे. हा नृत्यप्रकार लग्नकार्य, सत्यनारायण, नामविधी अशा प्रसंगी केला जातो. हा रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाजाचा प्रसिद्ध असा विधीनृत्य प्रकार आहे. होळी सणाला हा नृत्य प्रकार कुणबी समाजातील लोक सादर करतात, यात सहभागी होणाऱ्या कलावंताला खेळे म्हणतात. हे खेळे होळी सणाला पालखी नाचविताना नमनखेळे कला सादर करतात. देवीचे खेळे आणि फिरतीचे खेळे असे काही त्याचे सादरीकरण प्रकार आहेत. कर्नाटकातील यक्षगान प्रकाराशी साम्य दर्शविणारा हा कलाप्रकार आहे. खेळगड्यांची मानवी कमान तयार होते. मृदंगधारी कमानीच्या दोन्ही बाजूस मृदंग वाजवितात आणि नमन सादर करतात.
देव पयला नमान, देव गणेश देवाला
देव आकाशी मेघाला देव पाताळी शेषाला
देव दुसरं नमान देव धरतरे मातेला
देव तिसरं नमान देव तिरलोक देवाला
देव चवथं नमान देव चौतीच्या चांदला
देव पाचवा नमान देव पाचा हो पांडवाना
अशी बारा नमने झाली की मानवी कमानसमोर पडदा धरला जातो, त्यासमोर श्रीगणेशाचा मुखवटा नाचविला जातो. त्यानंतर संकासूर प्रवेश करतो. हा संकासूर दशावतारातील संकासूराशी साम्य दर्शविणारा असतो. मात्र संकासूर शेवटपर्यंत रंगमंचावर राहतो आणि दोन पात्रांच्या आगमन निर्गमनाच्या मधल्या कालावधीत नृत्य करतो. त्यानंतर नटवा आणि सूत्रधार यांचे संवाद होतात. नटया हे पात्रही हास्यनिर्मिती करते. मग गवळण सादर होते आणि त्यानंतर उत्तररंगाला सुरुवात होते. उत्तररंगात रामायणातील एखादे कथानक खंडरुपात सादर करतात, गायक आणि सूत्रधार गाण्यातून कथानक पुढे नेत असतो. शेवटी दहा तोंडाचा मुखवटा घालून रावणाचे आगमन होते. रावणवधाने नमनखेळेची सांगता होते. रावण वधानंतर खेळ्याचा सूत्रधार यजमानाकडून आरती घेतो. खेळे देवांची आरती म्हणतात आणि हे विधीनृत्य पूर्ण होते. प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांचे घाशीराम कोतवाल हे नाटक याच नमनखेळे कलाप्रकारावर बेतलेले आहे.
संदर्भ : https://www.thinkmaharashtra.com/node/1614