पाश्चात्य संगीताच्या प्रभावाखाली असलेले गोव्यातील ख्रिस्ती लोकांचे कोंकणी गीत. या शब्दाची उत्पत्ती पोर्तुगीजमधील Cantar म्हणजे गायन करणे या शब्दातून झाली. गोव्यात कांतार हा शब्द गीत या अर्थाने वापरला जातो. पोर्तुगीजांच्या धर्मांतरानंतर ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या गोमंतकीयांना ग्रेगोरियन चांटसारख्या परंपरांना अंगिकारणे भाग भाग पडले. त्यातील पाश्चात्य संगीत तत्त्वांवर आधारलेली धार्मिक गीते प्रचलित झाली. या गीतांचा प्रसार चर्चमधील समूहगायनामधून मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे ख्रिस्ती लोकांच्या गीतरचनेवर पाश्चात्य संगीताचा मोठा प्रभाव सदैव राहिला. त्यांची शीघ्रकाव्ये असोत अथवा अन्य रचना असोत ती पाश्चात्य संगीताच्या नोटेशनमध्ये बांधण्यात येऊ लागली. परंतु संपन्न लोकगीतांची पार्श्वभूमी असलेला ग्रामीण कष्टकरी ज्यात माडावर चढून ताडी काढणारा मजूरासारख्या व्यक्तीचा समावेश होतो, त्यांनी लोकगीतांचा मूळ ढाचा आणि पाश्चात्य संगीतपरंपरेचा प्रभाव यांची सांगड घालत गीतरचना केली. त्यालाच कांतार म्हणतात. ख्रिस्ती लोकांच्या खेळ (फेळ) आणि गावडा जमातीच्या जागरामधून असे कांतार मोठ्या संख्येने गायले जात.

पुढे १८९२ सालीपासून सुरू झालेल्या तियात्र या नाट्याप्रकारातून जी गीते रचली गेली त्यांना कांतार या नावाने ओळखले जाऊ लागले. कांतार रचणारा तियात्रमध्ये अभिनय अथवा गायन करणारा खुद्द कलाकार असतो किंवा तियात्राचा लेखक असतो. कांतार एकट्यानेच गाता  येते किंवा दोन, तीन, चार किंवा त्याहून अधिक कलाकार एकत्र येऊन गातात. त्याला अनुक्रमे सोलो, डुओ किंवा ड्याएट, ट्रिओ, क्वार्टेट आणि सामूहिक असे म्हणतात. तियात्रात सादर केल्या जाणाऱ्या कांतारसाठी स्टील बँडची साथसंगत असते. त्यात व्हायोलिन, ट्रंपेट, ड्रम्स आणि अलिकडे क्लॅरिओनेट आणि बेस गितार यांचा समावेश असतो.

कांतारचे विषय कौटुंबिक,सामाजिक, राजकीय किंवा कथात्मक असतात. प्रत्येक कांतार हे कोणता ना कोणता संदेश देणारे असते. त्यामुळे आजवर कांतार हे समाज प्रबोधनाचे अत्यंत परिणामकारक साधन म्हणून सिद्ध झाले आहे. अनेक गायक कलाकार आपली गीते ध्वनीफिती आणि चित्रफितीच्या स्वरूपात प्रसारीत करतात. गोमंतकीय ख्रिश्चन देशात आणि देशाबाहेर जेथे स्थायिक झाले आहेत तेथे कोकणी कांतार अधिक लोकप्रिय आहे.

संदर्भ :

प्रतिक्रिया व्यक्त करा