गोव्यातील ख्रिस्ती लोकांचा उत्सव. तो कार्निव्हलच्या (Carnival) दिवसात साजरा करतात. इंत्रुज हा कार्निव्हलचाच एक भाग मानतात. हा शब्द मूळ पोर्तुगीज Entrudo या शब्दावरून आला. त्याचा अर्थ मांस भक्षणाला निरोप देणे असा आहे. ख्रिस्ती लोकांचा लेट सिझन, इस्टर आणि ख्रिसमस यांच्याशी इंत्रुजचा संबंध आहे. कार्निव्हल इतिहासपूर्व काळापासून युरोप खंडात साजरा होत आला आहे. मात्र देशकालपरत्वे त्यात बदल दिसून येत असले तरी मिरवणुका काढून मौजमजा करणे ही या उत्सवाची परंपरा दिसते. सागरी मार्गाने व्यापार उदीमाच्या निमित्ताने गोव्यात आलेल्या पोर्तुगीजांनी आफ्रिकन गुलामांनाही सोबत आणले होते. पोर्तुगीजांनी गोव्यात आपले पाय रोवल्यावर त्यांनी स्थानिक लोकांचे धर्मातर केले. त्यानंतर राजाचा धर्म आणि संस्कृती ती प्रजेची संस्कृती या न्यायाने त्यांनी लोकांना पूर्वापार चालत आलेला धर्म व संस्कृती अनुसरण्यास मनाई केली आणि आपला ख्रिस्ती धर्म आणि परंपरा त्यांच्यावर लादल्या. त्याचाच एक भाग म्हणून कार्निव्हल साजरा केला जाऊ लागला. या उत्सवात श्रीमंत व उच्चभ्रू लोक बॉयरूम नृत्य करून आनंद साजरा करीत. परंतु गरीब लोक एकमेकांवर सफेद रंगाने भरलेल्या छोट्या कागदी पिशव्या फेकत. त्यांना कोकाती असे म्हणत. त्याशिवाय अधूनमधून अंगावर पाणी शिंपडत आणि वाद्ये वाजवित गावातून मिरवणुका काढत असत. त्यावेळी गीते म्हटली जात. रंगी-बेरंगी कपडे परिधान करून आणि हातात कापडी पताका घेऊन या मिरवणुकीद्वारे मौजमजा करीत उत्सव साजरा केला जात असे. आजही ख्रिस्ती लोक आपापल्या गावातून इंत्रूज उत्सव कार्निव्हलच्या दिवसात म्हणजे साधारणतः फेब्रुवारी महिन्यात साजरा करतात. मात्र या उत्सवाला चर्चचा पाठिंबा अथवा सहकार्य नसते.
काही ऐतिहासिक कारणामुळे गोव्यातील डोंगरी या गावातील हिन्दू लोक इंत्रुज या सदराखाली शिगमोत्सव साजरा करतात. त्यात सुंवारी व मेळ म्हणजे अनुक्रमे घुमट-शामेळ-कांसाळे यांच्या साथीवर गायन आणि वाद्यवादनाच्या तालावर पदन्यास करीत मिरवणुकीने जाणारा मेळ असतो. पोर्तुगीजांनी हिंदूच्या धार्मिक सण आणि उत्सवांवर बंदी आणलेली असल्याने गावकऱ्यांनी सरकारकडून मान्यता घेताना आपण इंत्रुज साजरे करणार असल्याची बतावणी करून मान्यता मिळविली आणि इंत्रुजच्या नावाने गावातील शिगमो उत्सव दरवर्षी माघ महिन्यात साजरा करण्याची सुरू केलेली परंपरा आजवर चालू आहे.
डोंगरी गावातील इंत्रुज उत्सव पाच दिवस चालतो. पहिल्या दिवशी फट्या सुंवारी होते. म्हणजे थंडीचे दिवस असल्याने कांबळ पांघरून सुंवारी नावाचे वादन केले जात असे. त्यावरून याला फट्या सुंवारी हे नाव पडले. दुसऱ्या दिवशी गावातील सर्व लोक आपापल्या मांडवात जमून गुढ्या, तोरणे, अब्दागीरे सजवितात. ढोल, तासे, सनई, शिंग ही वाद्ये वाजवून शांतादुर्गा, साखळयो, रवळनाथ आणि गावच्या पंचिष्टांना आवाहन करतात. त्यानंतर भरजरी छत्र्या उघडून वाजत गाजत सर्वजण मिरवणुकीने गावची परिक्रमा करतात. त्यावेळी गावतील पाच सुंवारी पथके वादन करतात. नंतर घरोघर जाऊनही हे वाद्यवादन होते. या उत्सवात कागदी फुलानी सजविलेल्या पालखीतून देवीची मिरवणूक निघते. नाट्यप्रयोगही सादर केले जातात. गुलाल उधळून आणि गाऱ्हाणे घालून डोंगरी गावातील इंत्रूज उत्सवाची सांगता होते.
संदर्भ :
- खेडेकर, विनायक विष्णू , लोकसरिता गोमंतकीय जनजीवनाचा समग्र अभ्यास,कला अकादेमी,गोवा.