गोव्यातील गावाशी संबंधित धार्मिक,सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य करण्यासाठी परंपरेने राखून ठेवलेली सामायिक मालकीची पवित्र जागा. ही जागा बहुधा गावाच्या केन्द्रभागी असते. गावाच्या मूळपुरुष अथवा गृहपुरुष नावाच्या दैवताच्या प्राकारात असलेल्या अंगणालाही मांड असतात.गोव्याच्या आदिम वसाहतीतील शबर जमातीने मांड ही संकल्पना रुजविली असे मानतात. त्यानंतर आलेल्या कोल, गोंड आणि मुंडारी जमातींनी देखील ही संकल्पना स्वीकारलेली दिसते.आदिम काळात जमातप्रमुखाशी चर्चा करणे, विचारविनिमय करणे आणि आवश्यक त्या सूचना आणि आदेश मिळविणे यांसाठी अशा सामायिक स्थळाची निर्मिती झाली, असे अभ्यासकांचे मत आहे.दिवसभराच्या कष्टानंतर थोडा फुरसदीचा वेळ गायन-कथन-नृत्य-अभिनय, थट्टामस्करी अशा मनोरंजनात्मक कार्यासाठी घालविण्याकरिता अशा जागेची गरज प्रत्येक जमातीला होती. त्यातूनच मांड संकल्पनेचे जतन-संवर्धन आजच्या काळापर्यंत झाले आहे. मांडाचा विस्तार १०० ते ५००० चौरस  मीटरपर्यंत असतो. गावातील अधिकाधिक गावकरी त्यावर बसू शकतील, अशा उद्देशाने त्याची व्याप्ती ठरलेली असते.

मांडावर अग्रभागी मातीचे अथवा काँक्रिटचे तुळशीवृंदावन असते. मूळपुरुषाची मठी, घुमटी अथवा एखादी शिळा असते. त्यामुळे ही जागा पवित्र मानण्यात येते. मांडा-गुरू हा मांडाचा देव. त्याचे अतिमानवी स्वरूप मानले जाते. मांडावरील प्रत्येक विधी मांडा-गुरूला आवाहन करून सुरू होतो. इथे होणारे सर्व विधी हे संपूर्ण जमात अथवा गावाचे असतात. मग ते सामाजिक स्वरूपाचे प्रश्न असोत अथवा सांस्कृतिक-पारंपरिक सादरीकरण असो. पारंपरिक कलाप्रकारांच्या सादरीकरणासाठी सर्वप्रथम या मांडाचा वापर केला जातो. म्हणूनच जागर, शिगमो, धालो, यांचे पहिले सादीरकण मांडावर होते. त्यानंतर शिगम्यातील मेळ (कलाकार पथके) गावाच्या परिक्रमेसाठी निघतात. परिक्रमा पूर्ण करून मांडावर परततात आणि पारंपरिक उत्सवाचे समापन होते. त्यामुळे या मांडाला जागरा-मांड, शिगम्या-मांड, धालां-मांड, गड्या मांड अशी नावे दिलेली असतात. ख्रिस्ती गावकऱ्यांच्या मांडावर तुळशी वृंदावनाऐवजी खरीस (क्रॉस) असतो. ख्रिस्ती लोकांचे धालां-मांड आणि इंत्रुजा-मांड, जागरा-मांड असे तीन मांड प्रामुख्याने असतात.

मांडावर घेतलेले निर्णय अथवा ठराव हे संपूर्ण जमातीवर किंवा गावावर बंधनकारक असतात. किंबहुना त्याकडे नियम म्हणून पाहिले जाते. आणि तेथे अन्य बाह्य शक्तींची ढवळाढवळ खपवून घेतली जात नाही. मांडाच्या संदर्भातील नियम, सिद्ध-निषिद्ध यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. गोव्यातील जाती-जमातींचे दैनंदिन जीवन आणि विशेषतः कला सांस्कृतिक जीवन यांत मांडाचे स्थान अनन्यसाधारण आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा