डग्लस, नॉर्थ : (५ नोव्हेंबर १९२० – २३ नोव्हेंबर २०१५). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचे सहमानकरी. आर्थिक व संस्थात्मक बदल अभ्यासण्यासाठी सैद्धांतिक अर्थशास्त्र तसेच संख्यात्मक विश्लेषणपद्धतींचा विनियोग करून आर्थिक इतिहासासंदर्भातील संशोधन पुनर्जीवित करण्याबद्दल दुसरे अमेरिकन अर्थतज्ज्ञ रॉबर्ट फोगेल (Robert Fogel) यांच्याबरोबरीने डग्लस यांना १९९३ मध्ये अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

डग्लस यांचा जन्म अमेरिकेतील मॅसॅच्यूसेट्समधील केंब्रिज शहरात झाला. वडिलांना नोकरीमुळे आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन अनेक ठिकाणी फिरावे लागल्याने डग्लस यांचे बालपण अनेक शहरांत व्यथित झाले, तसेच माध्यमिकपर्यंतचे शिक्षणसुद्धा अनेक ठिकाणी झाले. त्यानंतर ते कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली येथे प्रवेश घेतला. १९४२ मध्ये तेथील मानव्यविद्या विभागातून त्यांनी बी. ए. ही पदवी प्राप्त केली. राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान व अर्थशास्त्र या तीन विषयांचा अभ्यास त्यांनी पदवी स्तरावर केला. नंतर १९५२ मध्ये त्यांनी बर्कली विद्यापीठातून अर्थशास्त्रातील पीएच. डी. पदवी मिळविली.

डग्लस यांनी सुरुवातीला दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान व्यापारी नौका चालविण्याचे काम काही काळ केले. १९५० मध्ये ते वॉशिंग्टन विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे १९६० – १९८३ या कालावधीत त्याच विद्यापीठात प्राध्यापकपदी बढती मिळून त्यांनी अर्थशास्त्र या विषयाचे अध्यापन केले. १९८३ मध्ये सेंट लूईस येथील वॉशिंग्टन विद्यापीठात अर्थशास्त्र विभागात कायदा व स्वातंत्र्य या विषयांचा हेन्री आद् लूसे प्राध्यापक म्हणून प्राध्यापक  झाले. तेथेच १९८४ – १९९० या काळात पॉलिटिकल इकॉनॉमी या केंद्राचे संचालक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. डग्लस यांनी कोपनहेगन कॉन्सेन्सस संस्थेत तज्ज्ञ म्हणून तसेच जगभरातील अनेक देशांत आर्थिक व शासकीय सल्लागार म्हणून काम पाहिले. मेरिलंड व स्टॅनफोर्ड या विद्यापीठांत त्यांनी संशोधक प्राध्यापक म्हणून काम केले. विशेषत: तेथील सहकारी प्राध्यापकांच्या बरोबरीने विविध देशांचा दीर्घकालीन आर्थिक विकास कसा झाला, कोणती स्थित्यंतरे घडली यांबाबतचा विशेष अभ्यास त्यांनी केला. इकॉनॉमिस्टस फॉर पीस ॲण्ड सिक्युरिटी या संस्थेचा विश्वस्त तसेच विपानी या विख्यात स्वयंसेवी संघटनेचा सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांनी लिहिलेल्या संशोधनपर लेखांचा संग्रह ड्यूक विद्यापीठाच्या ग्रंथालयात ठेवण्यात आला आहे. वॉशिंग्टन विद्यापीठ, सेंट लूईस व स्टॅनफोर्ड विद्यापीठातील हूव्हर इन्स्टिट्यूटशीही ते संलग्नित होते.

डग्लस यांचे संशोधन मूलत: सैद्धांतिक स्वरूपाचे आहे. केवळ तांत्रिक नव-प्रवर्तनामुळे (Innovation) आर्थिक विकास शक्य होतो, हे त्यांना मान्य नव्हते. विपणन अर्थव्यवस्था वृद्धिंगत व्हायची असेल, तर त्यासाठी सामाजिक व कायदेशीर स्वरूपाचे मालमत्ता हक्क व्यक्तींना असले पाहिजेत, असे त्यांचे मत होते. त्यांच्या याच संकल्पनेला नव-संस्थात्मक (Institutional) अर्थशास्त्र असे संबोधले गेले. इंग्लंड व नेदरलँड्स या देशांचे वेगाने औद्योगीकरण होऊ शकण्याचे कारण म्हणजे तेथील श्रेणी व्यवस्था (Guild System) होय, हे डग्लस यांनी अभ्यासाने दाखवून दिले. विविध व्यवसायांचा प्रारंभ व कार्यपद्धती यांवर इतर यूरोपियन देशांच्या तुलनेत श्रेणी व्यवस्थेमधील कमी जाचक बंधनामुळे या दोन देशांची अधिक प्रगती होऊ शकली. डग्लस यांनी पुढे असे गृहीतक मांडले की, जेव्हा समाजातील विविध घटकांना अधिक फायदा मिळविणे प्रचलित संस्थात्मक व्यवस्थेत शक्य होत नाही, तेव्हा ते घटक एकत्र येऊन संस्थात्मक बदल घडविण्यास भाग पाडतात व परिणामत: अधिक फायदा मिळविणे शक्य होते. शेती, बँकिंग व वाहतूकव्यवस्था या क्षेत्रांतील आर्थिक धोरणे डग्लस यांचे वरील गृहीतक सिद्ध करतात. १९८० ते १९९० च्या दशकात त्यांनी आर्थिक विकासासाठी संस्थात्मक बदल आपोआप होतात, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अकार्यक्षम अशा कायदा, सुव्यवस्था व न्यायदान या व्यवस्थांमुळे संस्थात्मक जीवन विस्कळित होते. करार व मालमत्ता हक्कांची अंमलबजावणी होत नाही, तेव्हा अशा अकार्यक्षम संस्थात्मक व्यवस्थेमुळे समाजाची अधोगती होते. जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते, तेव्हा सामाजिक व आर्थिक संस्थामध्ये समन्वय साधणे कठीण होऊन बसते, असेही मत त्यांनी मांडले. डग्लस यांनी देशातील प्रगत, औपचारिक (फॉर्मल) व अनौपचारिक संस्थांमुळे आर्थिक उत्पादकतेत कसा सकारात्मक बदल होतो, हेही सोदाहरण दाखवून दिले. उदा., अमेरिकेत व्यावसायिक उधारीवर माल विक्री करतात; कारण त्यांना तेथील भक्कम संस्थात्मक व्यवस्थेमुळे पैसे मिळण्याची खात्री असते. भांडवलशाही व्यवस्थेत मालमत्ता हक्कांचे रक्षण करणारी व्यवस्था त्यास कारणीभूत असते. लोकांनी अधिक कार्यक्षम व्हावे यासाठीची तेथील प्रोत्साहनात्मक व्यवस्था व संस्थात्मक चौकट (Institutional Framework) यांमुळे अमेरिकेचा विकास व प्रगती झाली असल्याचा निष्कर्षही त्यांनी काढला.

डग्लस यांच्या विकसनशील विचारांमुळे जगातील अनेक देश – विशेषत: साम्यवादी देश तसेच पूर्व युरोपमधील काही देश – त्यांचे मार्गदर्शन घेत असत. पूर्व यूरोपमधील व्यवस्थापकांना अमेरिकन शैलीच्या अर्थव्यवस्थेचे धडेही त्यांनी दिले.

डग्लस यांचे काही उल्लेखनीय ग्रंथ पुढील : दि इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ दि युनायटेड स्टेटस (१९६१), ग्रोथ ॲण्ड वेल्फेअर इन दि अमेरिकन पास्ट (१९७४), स्ट्रक्चर ॲण्ड चेंज इन इकॉनॉमिक हिस्ट्री  (१९८१), इन्स्टिट्यूशन्स, इन्स्टिट्यूशनल चेंज ॲण्ड इकॉनॉमिक परफॉर्मन्स (१९९०), अंडरस्टॅडिंग दि प्रोसेस ऑफ इकॉनॉमिक चेंज (२००५), व्हायोलन्स ॲण्ड सोशल ऑर्डर्स : ओ कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क ऑर… (२००९). शिवाय त्यांनी अनेक शोधनिबंधही प्रसिद्ध झालेले आहेत.

डग्लस यांच्या संशोधनकार्याबद्दल त्यांना अनेक मानसन्मान लाभले : फोर्ड फॅकल्टी फेलोशिप (१९६६-६७), गुज्जेनहेम फेलोशिप फॉर ह्यूमॅनिटिज-यूएस व कॅनडा (१९७२), इकॉनॉमिक्स फॉर पीस ॲण्ड सिक्युरिटीचे विस्वस्त, इंटरनॅशनल सोसायटी फॉर दि न्यू इन्स्टिट्यूशनल इकॉनॉमिक्सचे संस्थापक (१९९७).

डग्लस यांचे बेंझोनिया, मिशिगन येथे निधन झाले.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा