हार्ट, ऑलिव्हर (Hart, Oliver) : (९ ऑक्टोबर १९४८). प्रसिद्ध ब्रिटिश-अमेरिकन अर्थशास्त्रज्ज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. हार्ट यांना करारांच्या माध्यमातून वाटप होणाऱ्या नियंत्रणाच्या, मालमत्तेच्या आणि निर्णय घेण्याच्या अधिकारांचे अधिक व्यवहारी व उपयुक्त विश्लेषण करण्याच्या कार्याबद्दल विख्यात फिनी-अमेरिकन अर्थतज्ज्ञ बेंग्ट रॉबर्ट होल्मस्ट्रॉम (Bengt Robert Holmström) यांच्याबरोबर २०१६ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

हार्ट यांचा जन्म लंडन येथे झाला. त्यांनी १९६९ मध्ये केंब्रिज विद्यापीठातून गणित या विषयात बी. ए. आणि १९७२ मध्ये वारविक विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात एम. ए. या पदव्या संपादन केल्या. १९७४ मध्ये अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र या विषयात पीएच. डी. पदवी मिळविली. त्यानंतर ते इंग्लंडला परतले आणि चर्चिल महाविद्यालयात अधिछात्र म्हणून त्यांनी काही काळ काम केले. १९७४ – १९८४ या काळात ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ख्यातकीर्त संस्थेत प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी १९९२ अखेरपर्यंत अमेरिकेतील मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (M. I. T.) येथे अध्यापन केले. १९९३ – १९९७ या काळात ते हॉर्व्हर्ड विद्यापीठ (Harvard University) येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी २००२-२००३  या काळात याच विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्षपदही भूषविले. सांप्रत अमेरिकेतील हार्व्हर्ड विद्यापीठातच ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.

हार्ट आणि बेंग्ट होल्मस्ट्रॉम यांनी बँकिंग, वित्तीय बाजारपेठ व भांडवल उपलब्धता या विषयांवर विपुल संशोधन केले. हार्ट यांनी अमेरिकेच्या बेलआउट पॅकेजवर शिकागो विद्यापीठातील प्राध्यापक ल्युंगई झिंगाल्स यांच्यासोबत केलेल्या संशोधनाच्या आधारे पॅकेजच्या धोरणावर टीका केली. बँकांना मदत करताना संबंधित धोरणकर्त्यांनी व अर्थतज्ज्ञांनी सर्व तत्त्वे गुंडाळून ठेवली आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच बँकांना मदत देण्याऐवजी थेट नागरिकांना मदत करणे योग्य ठरले असते, असे प्रतिपादनही केले. त्यांनी १९८० च्या दशकात अपूर्ण करारासंबंधीच्या संशोधनाला प्रारंभ केला. विशिष्ट करार तयार होत असताना त्यासंबंधी कसे निर्णय घेतले जातात व कोणत्या व्यक्तीला कोणत्या पातळीवर नेमण्यात येते, यावर त्यांनी अधिक भर दिला. करार सिद्धांतातील अपुरेपणा अधोरेखित करून त्यात परिस्थित्यनुरूप बदल करणे कसे गरजेचे आहे, ते स्पष्ट केले. विविध अशा संबंधित घटकांचे विश्लेषण करून सर्वसमावेशक अशा स्वरूपाचा करार-आराखडा तयार करण्याला सिद्धांतस्वरूप देण्याच्या प्रयत्नांना हार्ट व होल्मस्ट्रॉम यांना यश आले. आधुनिक अर्थशास्त्रामध्ये नोकऱ्याच्या कराराचे चित्र बदलत असल्याने ते समजावून घेण्यासाठी या सिद्धांताचा उपयोग होतो.

अपूर्ण कराराच्या सिद्धांताचे विस्तृत विवेचन करताना हार्ट यांचे निरीक्षण असे की, गुंतागुंतीच्या करारात्मक बाबीत संपादनाविषयी मोबदला ठरविण्याऐवजी निर्णयाच्या अधिकारांचे वाटप, हा महत्त्वाचा पर्याय ठरेल. त्यातून कराराची पर्याप्तता आणि तो करार कोणाला किती प्रमाणात लाभधारक आहे, हे निश्‍चित होईल. हार्ट यांनी आपल्या अपूर्ण कराराच्या सिद्धांतातून मालमत्तेच्या मालकी हक्कासंबंधी, त्यावरील नियंत्रणाविषयी आणि पर्याप्त वाटपाविषयी सखोल विवेचन केले आहे. त्याचबरोबर या सिद्धांताचा व्यावहारिक उपयोग वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय करारांमध्ये कशाप्रकारे होऊ शकतो, हेही दाखवून दिले आहे. सार्वजनिक सेवांची मालकी सरकारी असावी की खासगी, हे त्या सेवाप्रकारात केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टावर अवलंबून असते. गुंतवणुकीचे उद्दिष्ट खर्चात बचत करणे वा सेवेची गुणवत्ता सुधारणे यांपैकी काय आहे, या बाबीवर खासगीकरणाचा निर्णय अवलंबून असतो. विविध देशांच्या सरकारांना सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करण्याबाबतचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने हार्ट यांचे विवेचन अतिशय उपयुक्त आहे. विमा आणि प्रेरणा यांमधील परस्पर संघर्षाविषयी त्यांनी लेखन केले आहे. तसेच कामगारांचा मोबदला केवळ स्थिर वेतन या स्वरूपात राहतो, अशा प्रकारची मांडणी त्यांनी केली आहे.

हार्ट यांना अनेक सन्मान लाभले असून त्यांनी विविध उच्च पदेही भूषविली आहेत. त्यांपैकी काही सन्मान असे : फेलो (अधिछात्र) – दि इकॉनॉमेट्रिक सोसायटी, अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस, दि ब्रिटिश अकॅडमी व अमेरिकन फायनान्स असोसिएशन, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य, अमेरिकन लॉ अँड इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष, अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचे उपाध्यक्ष. त्याला अनेक विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट ही पदवी देऊन सन्मानित केले.

हार्ट यांनी १९९५ मध्ये फर्म्स, कॉन्ट्रॅक्ट्स ॲण्ड फाइनॅन्शिअल स्ट्रक्चर  हा ग्रंथ लिहिला असून त्यांचे पुढील लेख प्रसिद्ध झालेले आहेत : नॉनकन्व्हर्टिबल इन्व्हेस्टमेंट्स अँड रेफरन्स पॉईंट, टॅक्स शेल्टर्स ॲण्ड थिअरी ऑफ दि फर्म (२०१३), टॅक्स शेल्टर्स ऑर इफिशंट टॅक्स प्लॅनिंग (२०१४), हाउ डू इनफॉर्मल ऍग्रिमेंट्स ॲण्ड रिव्हिजन शेप, कॉन्ट्रॅक्चुअल रेफरन्स पॉइंट्स, लिक्विडिटी ॲण्ड इनसफिशंट इन्व्हेस्टमेंट (२०१५), कंटिन्यूइंग कॉन्ट्रक्ट्स, बँक्स आर व्हेअर दि लिक्विडिटी इज मोअर ऑर लेस – व्हाय पार्टीज मे डिलिबरिट्ली राइट इनकंप्लिट कॉन्ट्रॅक्ट्स’ (२०१६).

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा