गुलाबराय, बाबु : (१७ जाने १८८८ – १३ एप्रिल १९६३). भारतीय हिंदी साहित्यातील समर्थ निबंध लेखक. हिंदी भाषेत तत्त्वज्ञानपर विचारांची मांडणी करणारा पहिला लेखक म्हणून बाबु गुलाबराय यांची ओळख आहे. हिंदी भाषेतील खडी बोलीमध्ये त्यांनी लेखन केले आहे. तत्त्वज्ञानपर व साहित्यपर अशा दोन विभागात त्यांनी लेखन केले आहे.
त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील इटावा येथे झाला.त्यांचे वडील भवानी प्रसाद धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांची आई देखील श्रीकृष्णाची भक्त होती. त्यांचे प्रारंभिक शिक्षण मैनपुरी येथे झाले. माध्यमिक शिक्षण पुर्ण झाल्यावर ते इंग्रजी शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी गेले.त्यांनी आग्रा येथे पदवी शिक्षण पूर्ण केले. इथेच त्यांनी तत्त्वज्ञानात पद्वुत्तर पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यावर छतरपुर येथील राजांचे खाजगी सचिव म्हणून त्यांनी प्रारंभी कार्य केले. पुढे ते या संस्थानचे दिवाण झाले व नंतर मुख्य न्यायाधीश म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली. राजाच्या निधनानंतर त्यांनी नोकरी सोडली व ते आग्रा येथे येऊन राहू लागले. आग्रा येथे त्यांनी सेंट जॉन्स महाविद्यालयात हिंदी विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली.आयुष्याच्या अंतीम क्षणापर्यंत ते साहित्य साधना करीत राहिले. घरातील धार्मिक वातावरणाचा गुलाबराय यांच्यावर प्रभाव पडला व त्याचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात पडले.
बाबु गुलाबराय यांचे निबंध लेखन प्रसिद्ध आहे, ते पुढीलप्रमाणे – प्रभाकर, फिर निराश क्यों, मेरी असफलताएँ, मेरे निबन्ध, कुछ उथले कुछ गहरे, ठलुआ क्लब, अध्ययन और आस्वाद, सिद्धांत और अध्ययन इत्यादी. त्यांचे तत्त्वज्ञानपर ग्रंथ देखील प्रकाशित आहेत, त्यामध्ये कर्तव्य, शास्त्र, तर्कशास्त्र, बौद्ध धर्म ,पाश्चात्य दर्शनो का इतिहास, भारतीय संस्कृती की रुपरेखा या ग्रंथांचा समावेश होतो. त्यांचे विज्ञान वार्ता व बाल प्रबोध हे दोन बालसाहित्यावरील पुस्तके देखील प्रकाशित आहेत. सत्य हरिश्चंद्र, भाषा-भूषण, कादंबरी कथा-सार हे त्यांचे संपादित ग्रंथ होत. याशिवाय त्यांच्या अनेक स्फूट रचनाही प्रसिद्ध आहेत.
आधुनिक युगातील निबंध लेखकांमध्ये बाबु गुलाबराय यांचे स्थान अतिशय वरचे आहे. त्यांचे टीका आणि निबंध सिद्धांत आणि व्यवहार या दोन्ही पातळीवर वाचकांपर्यंत पोहचले आहेत. विवेचन आणि भाव या दोन्ही अंगाने त्यांचे लेखन समृद्ध आहे. विनोदी अंगाने देखील त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या लिखानातून नैतिकतेचा संदेश मिळतो. समाजाच्या विकासाला प्रेरणा देणारे व समाजशील दृष्टिकोण रुजविणारे लेखन त्यांनी सातत्याने केले आहे. तत्त्वज्ञानातील किचकट विचारांना साध्या सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
त्यांच्या साहित्य सेवेबद्दल आग्रा विद्यापीठाने त्यांना डी. लिट. पदवी देवून सन्मानित केले. त्यांच्या सन्मानार्थ भारतीय डाक विभागाने २२ जून २००२ रोजी एक तिकीट काढले. बाबु गुलाबराय यांनी एक मौलिक निबंधकार, उत्कृष्ट तत्त्ववेत्ता व समाजतज्ञ तसेच यशस्वी संपादक म्हणून हिंदी साहित्यात आपले अढळ स्थान प्राप्त केले आहे.
आग्रा येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ : स्नातक, विजयेन्द्र, हिंदी साहित्य का इतिहास, साहित्य अकादमी, न्यु दिल्ली, २००९.