मेहता, नरेश : (१५ फेब्रुवारी १९२२ – २२  नोव्हेंबर २०००). हिंदी साहित्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक, भारतातील साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. काव्य, खंडकाव्य, कथा, कादंबरी, एकांकिका, नाटक, प्रवासवर्णन, समीक्षा, संपादन अशा विविध प्रकारांत त्यांनी लेखन केले. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील माळवा क्षेत्रात शाजापूर इथे एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता. त्यांना जन्मभर हताश आणि कुंठीत करणाऱ्या परिस्थितीशी संघर्ष करावा लागला. त्यांनी काशी विश्वविद्यालायातून हिंदीमध्ये पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला होता. तिथे त्यांना केशवप्रसाद मिश्र आणि आचार्य विश्वनाथ प्रसाद मिश्र यांच्या सारख्या अनेक विख्यात शिक्षकांनी प्रेरणा दिली. त्यांना वैदिक साहित्य आणि परंपरा या विषयी जागृत केले. त्यांनी १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात आणि विद्यार्थी आंदोलनातही सहभा घेतला होता. मग त्यांनी काही वर्ष कम्युनिस्ट पार्टीचे काम केले आणि त्यांच्या ट्रेड युनियन साठी एका साप्ताहिकाचे संपादनही केले. काही काल आकाशवाणीत काम केल्यानंतर मात्र ते पूर्णवेळ लेखक म्हणून कार्यरत राहिले. त्यांनी श्रीकांत वर्मा यांच्या बरोबर एक अल्पजीवी साहित्यिक नियतकालिक कृती चे संपादनही केले होते. त्या नियतकालिकाचे हिंदी नवलेखन आंदोलनात एक अत्यंत महत्वपूर्ण स्थान होते. काही वर्षांनी ते उज्जैन येथील विश्वविद्यालयातील प्रेमचंद सृजनपीठाचे संचालक होते.

हिंदीतील भारतीय दृष्टीकोनासाठी जे लेखक ओळखले जातात, त्यांच्यातील एक महत्वाचे लेखक म्हणजे नरेश मेहता होत.  भारतीय साहित्य क्षेत्रात त्यांचे एक स्वतंत्र महत्त्व यासाठी आहे की, सृजनात्मकतेच्या समस्येविषयी, त्यांचा स्वत:चा असा एक दृष्टीकोण आहे. लेखनाच्या सुरुवातीच्या काळात नरश मेहता यांच्यासाठी राजकारण आणि साहित्य हे एकमेकांना पर्यायी असे शब्द होते. नंतर त्यांच्या दृष्टीने कवितेचे अस्तित्व आकाशात विचारण करणाऱ्या काव्य कपिलेच्या रुपात झाले. त्यांच्या दृष्टीने कविता दररोज आकाशातून उतरून येते आणि त्यांच्या अस्तित्वाला विशेष अर्थ आणि महत्त्व प्राप्त करुन देते.

त्यांनी १९३६ मध्ये कविता लिहायला सुरवात केली होती. ते वर्ष प्रगतीशील लेखक आंदोलनाच्या स्थापनेचे वर्ष देखील होते. ‘समय देवता’ ही त्यांची हिंदीतील पहिली दीर्घ कविता होती. त्यातून सर्व मानवाच्या स्थिती बद्दल, सार्वभौम वास्तवाबद्दल आणि साम्राज्यवादाबद्दल नरेश मेहता यांची तात्कालिक प्रतिक्रियाच उमटलेली होती. ‘संशय की एक रात’ आणि ‘महाप्रस्थान’सारख्या कवितांच्या माध्यमातून समकालीन कविता, प्रबंध अथवा महाकाव्याच्या स्वरूपात लिहिणे शक्य नाही, हा समज त्यांनी तोडला होता. दुसरीकडे यह पथ बंधू था आणि उत्तरकथा  या सारख्या कादंबऱ्या लिहून त्यांनी वर्णनात्मक साहित्यप्रकारातही काव्याच्या अंगाने लिहिता येते हे दाखवून दिले होते.

संशय की एक रात  मध्ये नरेश मेहता पौराणिक कथेतील रामाच्या आंतरिक द्वंव्दाला अभिव्यक्त करतात. त्यातील राम अनेक संशयांनी आणि प्रश्नांनी घेरलेल्या आधुनिक माणसाच्या रूपात कल्पित केलेला आहे. महाप्रस्थानमधील युधिष्ठीर मानवमुक्तीचे प्रतिक आहे. रामायण  कवीसाठी वैयक्तिक द्वंव्दाची वेदनापूर्ण कथा आहे. तर महाभारत  सामाजिक संघर्षाची महागाथा आहे. त्यांच्या साहित्याला या दोन्ही महाकाव्याचा आधार आहे. राज्य आणि व्यक्ती यांचा संबंध ही महाप्रस्थानची मुळ कल्पना आहे. राज्य ही गोष्ट नैसर्गिकरित्या अमानवी आहे आणि कोणत्याही काळात दु:खद अनुभव देणारी आहे. एका साधारण स्रीची कथा आणि अध्यात्मिक मुक्ती शबरी मध्ये व्यक्त झालेली आहे. एका विशिष्ट काळातला अमानवी इतिहास पिछले दिनो नंगे पैर ची मुळ कल्पना आहे.

डुबते मस्तूल (१९५४), धुमकेतू एक श्रुती (१९६२), यह पथ बंधू था (१९६३), दो एकांत (१९६४), नदी यशस्वी है (१९६७),  प्रथम फाल्गुन (१९६८) आणि  उत्तरकथा  ( दोन भाग – १९७९, १९८२) या सगळ्या कादंबऱ्यातून यातानाग्रस्त मनुष्यासाठी विशेषतः स्त्री साठी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. डुबते मस्तुलमध्ये रंजना नावाच्या आधुनिक मध्यमवर्गीय स्त्रीची नियती चित्रित केली आहे. तिच्या आयुष्यात अनेक पुरुष येतात. पण कुणीही तिच्या आत्म्याचे सौंदर्य ओळखत नाही. शेवटी ती आत्महत्या करते. यह पथ बंधू था  ही श्रीधर (पती) आणि सरो (पत्नी) च्या जीवन संघर्षावर आधारित कादंबरी आहे. स्वातंत्र्य आंदोलनात आदर्श आणि मूल्य हे आपला अर्थ गमावून बसले आहेत. या दु:खद निराशापूर्ण वास्तवामुळे सगळे जीवनच व्यर्थ होत चालले आहे. श्रीधर आणि सरो यांनी दु:खाला साधारण जीवन मूल्यांच्या रूपात बघितलेले आहे. उत्तरकथा  ही त्यांची महत्वपूर्ण कादंबरी आहे. विसाव्या शतकातील माळव्यातील काही ब्राम्हण कुटुंबांची कथा यामध्ये मध्यवर्ती आहे. नरेश मेहता यांच्या या महाकाव्यात्मक कादंबरीत वसुंधरा, दुर्गा आणि गायत्री या सारख्या स्त्रियांची दु:खे, यातना विषद केलेल्या आहेत. यातील मध्यवर्ती पुरूषपात्र शिवशंकर आचार्य यांच्या नुसार इच्छा ही दु:खाचे, यातनांचे मुळ आहे. ही कादंबरी विरोधाशिवाय समर्पणाचे चित्रण करते.

तथापि  आणि एक समर्पित महिला  या संग्रहातील कथांमध्ये नरेश मेहता मानवी संबंधांचे चित्रण करताना आपल्या कवी दृष्टीचा उपयोग करतात. त्यांच्या सृजनात्मकतेच अजून एक पैलू सुबह के घंटे आणि खंडित यात्रा है  या नाटकातून प्रकट होते. काव्य का वैष्णव व्यक्तित्व मध्ये नरेश मेहता आधुनिक समिक्षेमध्ये काव्यात्मक उदात्ततेला जास्त महत्व देतात. त्यांच्या दृष्टीने अनिर्वचनीय गंध सौंदर्यात्मक आनंदाचे मुळ आहे. तोच साहित्याला आस्वाद विषय बनवण्यास पुरेसा आहे.

कवी आणि कादंबरीकार म्हणून स्थान प्राप्त केलेल्या नरेश मेहता यांना अनेक साहित्यिक पुरस्कार प्राप्त झालेले होते. सरस्वती सन्मान (१९८३), मध्यप्रदेश शिखर सन्मान (१९८४), उत्तरप्रदेश हिंदी संस्थानचा भारत भारती सन्मान (१९८५), मंगल प्रसाद पारितोषिक (१९८६), साहित्य अकादमी पुरस्कार ( १९८८) आणि १९९२ मध्ये भारतीय साहित्यातील महत्वपूर्ण योगदानासाठी ज्ञानपीठ पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.

संदर्भ :

  • http://14.139.116.20:8080/jspui/bitstream/10603/7409/7/07_chapter%202.pdf