सिंह, केदारनाथ :  (१९ नोव्हेंबर १९३५). भारतीय साहित्यातील नामवंत हिंदी कवी. पत्रकार, कवी, काव्यसमीक्षक अशी त्यांची प्रमुख ओळख आहे. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्याच्या चकिया गावी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणानंतर वाराणसीच्या उदय प्रताप कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर १९५६ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी हिंदी विषयात एम.ए केले. त्यानंतर १९८४ मध्ये आधुनिक हिंदी कवितामें बिंब विधान (प्रतिमासृष्टी) या विषयावर त्यांनी डॉक्टरेट (आचार्य) पदवी प्राप्त केली. गोरखपूरला काही दिवस शिक्षक म्हणून काम केल्यानंतर पुढे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ते हिंदीचे प्राध्यापक झाले, तेव्हापासून ते नवी दिल्लीतच स्थायिक आहेत.

केदारनाथ सिंह यांचा उदय एक गीतकार म्हणूनच झाला. आपल्या पुरबिहा मातीचा विसर त्यांना कधीच पडला नाही. आपल्या गावाशी, मातीशी असलेले घट्ट नाते त्यांच्या अनेक कवितातून प्रकट झालेले दिसते. ग्रामीण भागातील निसर्गाचे, लोकगीतांचे, शेतीप्रधान जीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत दिसते. अभी बिलकुल अभी  हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. जमीन पक रही हैा (१९८०), यहाँसे देखो, अकालमें सारस, उत्तर कबीर और अन्य रचनाएँ, तालस्टॉय और साईकल, बाघ  हे त्यांचे काव्यसंग्रह. कुछ चिठ्ठियाँ  हा पत्रसंग्रह. कल्पना और छायावाद, आधुनिक हिंदी कवितामें बिंबाविधान, मेरे समयके शब्द, मेरे साक्षात्कार  हे भाषाविषयक आणि कविताविषयीचे चिंतन मांडणारे संशोधनात्मक लेखसंग्रह आहेत. याशिवाय ब्रेख्त, बाँद लेयर या लेखकांच्या साहित्यकृतीचे अनुवादही त्यांनी केले आहेत. तसेच रूसी कविताएँ, तानाबाना  हे संपादित ग्रंथही त्यांचे प्रकाशित झाले आहेत.

माणूस आणि निसर्ग यांच्यातील नाते, भाषेचे मानवी जीवनातील स्थान, जगण्यातील करुणा तसेच आजचे अवतीभवतीचे प्रश्न अशा अनेक आशयांनी युक्त अशी त्यांची कविता आहे. प्रतिमासृष्टी हा त्यांच्या कवितेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. उत्स्फूर्तता, सहजता आणि तीव्र संवेदनशीलता ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. मूळ भोजपुरी बोलीत बोलणारा हा कवी पुढे खडी बोलीत काव्यरचना करू लागला. या दोन्ही भाषेविषयी त्यांना आपलेपणा आहे, भाषा, जीवनशैली, बालपणाच्या काळातील कृषीसंस्कृती आधुनिक जगाचे प्रश्न, कवीच्या अंतर्मनातील उलथापालथ या साऱ्यांचा वेध घेणारी अशी त्यांची कविता आहे.

केदारनाथ सिंह यांच्या कवितेची मूळे ही गावात रूतलेली आहेत. त्यामुळे गावच्या मातीतील असंख्य प्रतिके, प्रतिमांच्या रूपाने व्यक्त होताना दिसतात. अनेक लोककथा, लोकपरंपरा, श्रद्धा, लोकसमजुती या साऱ्यांशी त्यांच्या कवितेचे अतूट असे नाते आहे.‘कुछ सूत्र जो किसान बापने बेटे को दिए’ या कवितेत अनेक लोकधारणा सूक्ष्म रूपात प्रगटताना दिसतात. या कवितेतील शेतकरी आपल्या मुलाला काही गोष्टी सांगतो. बाघ, बैल, सारसपक्षी अशा पक्षी, प्राण्यांबद्दलही ते आपल्या कवितांतून लिहितात. ‘बाघ’ या कवितेत वाघाची निरनिराळी रूपे सादर केली असून कवीचे चिंतन, आयुष्याबद्दलचा त्याचा दृष्टिकोन या कवितेत व्यक्त झाला आहे. गाव आणि महानगर यातील ताण त्यांच्या कवितेला एक नवी ऊर्जा देतो. पण शहरातून गावाकडे आल्यावरही एक प्रकारची तुटलेपणाची भावना ते व्यक्त करतात.

अज्ञेय यांनी संपादित केलेल्या तिसरा सप्तकच्या माध्यमातून केदारनाथ सिंह यांची कविता पुढे आली. त्यांचा संपूर्ण काव्यप्रवास हा एका सामान्य माणसाच्या दैनंदिन जगण्याचे प्रतिबिंब आहे आणि या जगण्यात सातत्याने एक आशा ते पेरत राहताना दिसतात. ‘मी लोकांच्या जीभेवरील भाषा कवितेत ओतण्याचा प्रयत्न करतो’, असे सांगणाऱ्या या कवीचा गौरव ज्ञानपीठ पुरस्काराने होतो – हा खरंतर त्यांच्या कवितेचाच गौरव आहे. त्यांच्या अकाल में सारस या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. याव्यतिरिक्त मैथिलीशरण गुप्त पुरस्कार, कुमारन आशान पुरस्कार, दिनकर पुरस्कार, जीवन भारती सन्मान, व्यास सन्मान आणि २०१३ चा ज्ञानपीठ पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

संदर्भ : http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/kedarnath_singh.pdf