माळगावकर, मनोहर : (१२ जुलै १९१३ – १४ जून २०१०).भारतीय साहित्यातील प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक.कादंबरीकार आणि इतिहासकार ही त्यांची मुख्य ओळख आहे. त्यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील लोंडा जवळील जगबेट गावात झाला. त्यांचे आजोबा देवास संस्थानचे राज्यपाल होते. त्यांनी बेळगावमध्येच प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर धारवाड, मुंबई येथून पुढील उच्च शिक्षण प्राप्त केले. सैन्यात दाखल होऊन मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये लेफ्टनंट कर्नलच्या पदावर त्यांनी कार्य केले. वयाच्या ३९ व्या वर्षी त्यांनी सेवेतून निवृत्ती घेतली.नंतर ते खाणीच्या व्यवसायात पडले.नंतरच्या काळात त्यांनी केवळ शेती आणि लेखनावरच आपले लक्ष केंद्रीत केेले. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते कर्नाटकात ढांडेलीजवळ जुगलपेठ येथे आपला प्रसिद्ध बंगल्यात एकटे राहत होते. माळगावकरांचे व्यक्तिमत्त्व आणि लेखन अष्टपैलू होते.
दि स्टेट्समन आणि डेक्क्न हेरॉल्ड या इंग्रजी वृत्तपत्रांमुळे त्यांनी विविध विषयांवर स्तंभलेखन केले. स्तंभलेखक म्हणून त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. कथा, कादंबऱ्या, चरित्रे व ललित लेखन, वृत्तपत्र स्तंभलेखन त्यांनी मोठ्या प्रमाणात केले. परंतु त्यांची ओळख वाचकांना प्रिन्सेस या कादंबरीमुळे झाली. त्यानंतर त्यांची ए बेंड द गँगेस आणि मेन हू किल्ड गांधी ही दोन पुस्तके देशात आणि परदेशात गाजली. सूड आणि क्रौर्य यांचे रोमांचकारी दर्शन घडवणारी डिस्टंट ड्रम ही माळगावकरांची पहिली कादंबरी ही कादंबरी १९६० मध्ये प्रसिद्ध झाली. माळगावकर यांची साहित्य संपदा – कादंबरी : कॉम्बॅट ऑफ शॅडोज (१९६२), दि प्रिन्सेस (१९६३), ए बेंड इन द गँगेस (१९६४), दि डेव्हिल्स विंड (१९७२), गारलँड किपर्स (१९८६), कॅक्टस कन्ट्री (१९९२), कथासंग्रह : ए टोस्ट इन वॉर्म वाईन (१९७४), बॉम्बे बिवेअर (१९७५),रुम्बल तम्बल (१९७७),फोर ग्रेव्स अँड अदर स्टोरीज (१९९०); ऐतिहासिक लेखन : कान्होजी आंग्रे द सी हॉक मराठा ऍडमिरल (१९५९), पुअर्स ऑफ देवास (१९६३), सिनियर आणि छत्रपतीज ऑफ कोल्हापूर (१९७१) द मेन हु किलड गांधी (१९७८) डेड अँड लिविंग सिटीज (१९७७) इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले.
डिस्टंट ड्रम ही त्यांची कादंबरी म्हणजे वसाहत काळात ब्रिटीश भारतीय सैन्यात इंग्रज आणि भारतीय यांचे परस्पर संबंध आणि सैन्यातले भारतीय आणि पाकिस्तानी सैनिक यांच्या नैतिक प्रश्नांविषयीही आहे. दि प्रिन्सेस ही त्यांची सर्वोत्कृष्ट साहित्यकृती स्वातंत्र मिळाल्यावर संस्थानांच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेत सापडलेल्या बेगवाड नावाच्या संस्थानाची कहाणी सांगणाऱ्या या कादंबरीला खूप मोठे यश मिळाले. संस्थानिकांबद्दल एक प्रकारची ओढ बाळगूनही सरंजामशाही आणि लोकशाही यांच्यातील द्वंद त्यांनी समतोलपणे रंगवले आहे. द डेव्हिल्स विंड या कादंबरीचा विषय १८५७ चे बंड आहे. भा. द. खेर यांनी माळगावकरांच्या कादंबऱ्यांचे मराठीत अनुवाद केल्याने माळगावकर मराठी वाचकांपर्यंत पोहोचले.
माळगावकरांना भारतीय इतिहासाचे खूप आकर्षण होते. त्यांनी कान्होजी आंग्रे द सी हॉक मराठा ऍडमिरल, पुअर्स ऑफ देवास, सिनियर आणि छत्रपतीज ऑफ कोल्हापूर हे इतिहास ग्रंथ लिहिले. द मेनू हू किल्ड गांधी हे त्यांचे गाजलेले पुस्तक म्हणजे भारताची फळणी, स्वातंत्र्य आणि गांधीजींचा खून याचा पुनर्प्रत्यय आहे. वेधक कथावस्तूची निवड, कथनाचे कौशल्य, नाट्यमय प्रसंगांची विखुरणी ही माळगावकरांच्या कथा-कादंबऱ्याची लक्षणीय वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या साहित्य योगदानाबाबत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
संदर्भ : http://sahitya-akademi.gov.in/pdf/Manohar-Malgaonkar.pdf