रॉबिन्सन, मेरी : (२७ नोव्हेंबर १७५७ – २६ डिसेंबर १८००). एक ख्यातनाम इंग्रजी कवयित्री, अभिनेत्री, नाटककार, कादंबरीकार. तिला सॅफो या ग्रीक कवयित्रीच्या समकक्ष इंग्लिश सॅफो म्हणून ओळखले जात असे. तिने आपल्या अभिनयासाठी पेर्डीटा हे टोपणनावही मिळवले. तिचा जन्म इंग्लंडमधील ब्रिस्टॉल स्थित नौदल अधिकारी जॉन डार्बी आणि पत्नी हेस्टर या दापंत्यापोटी झाला. ती इंग्लंडमधील ब्रिस्टॉल आणि लंडन शहरात राहत होती ; ती काही काळ फ्रान्स आणि जर्मनीमध्येही राहिली. वयाच्या सातव्या वर्षापासून तिने कवितांचा रसास्वाद घ्यायला सुरूवात केली. चौदाव्या वर्षापासून शिक्षिका आणि त्यानंतर अभिनेत्री म्हणून काम करण्यास तिने प्रारंभ केला. तिने अनेक नाटके, कविता आणि कादंबऱ्या लिहिल्या. मेरी रॉबिन्सन तिच्या अभिनय आणि लेखनासाठी प्रसिद्ध होती. कुटुंबाच्या अनिश्चित आर्थिक परिस्थितीचा परिणाम मेरीच्या शिक्षणावर झाला. ब्रिस्टॉलमध्ये तिने हॅना मोरे आणि बहिणींनी गरिबांसाठी चालवलेल्या शाळेत शिक्षण घेतले.

तिचा पती टॉमस रॉबिन्सन कर्जबाजारी असल्याने फ्लीट कारागृहात डांबला गेला आणि तेथे ती त्याच्यासोबत कित्येक महिने राहिली. त्याकाळी नवरा कर्जबाजारी असताना कैद्यांच्या बायका आपल्या पतीसमवेत राहणे सामान्य बाब होती. फ्लीट कारागृहातच तिच्या साहित्यिक कारकीर्दीची सुरुवात झाली. येथे तिला जाणवले की ती पैसे मिळविण्याकरिता आणि तिच्या आयुष्यातील कठोर वास्तवातून मुक्त होण्यासाठी कविता प्रकाशित करू शकते. त्यातूनच तिचे पहिले पुस्तक पोएम्स बाय मिसेस रोबिन्सन  प्रकाशित झाले (१७७५). पती तुरूंगातून सुटल्यानंतर मेरी रॉबिन्सन यांनी अभिनेत्री म्हणून नाटकात काम करण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली आणि १७७६ मध्ये ड्युरी लेन थिएटरमध्ये विल्यम शेक्सपियरच्या नाट्यातील ज्युलियट, व्हायोला, रोझलिंड इत्यादी भूमिका रंगमंचावर सादर केल्या आणि ती प्रेक्षकांच्या प्रशंसेस प्राप्त झाली. फ्लोरिझेल आणि पेर्डीटा (शेक्सपियरच्या विंटर्स टेल  या नाटकाचे रूपांतर)  मध्ये पेर्डीटाच्या भूमिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

अलीकडे २०१० मध्ये रॉबिन्सनच्या समग्र साहित्याची आठ खंडांची अभ्यासपूर्ण आवृत्ती प्रकाशित झाली आहे. तिच्या २५ वर्षांच्या लेखन कारकीर्दीत आठ कवितासंग्रह, आठ कादंबऱ्या, काही नाटके, स्त्रीवादी ग्रंथ आणि एक आत्मचरित्र (अप्रकाशित) अशी साहित्य संपदा वाचकांसमोर आली आहे. ती पुढीलप्रमाणे : कादंबरीवान्सेन्झा : डेंजरस ऑफ क्रेडूलिटी,अ मोरल टेल (१७९२), एंजेलिना : अ नोव्हेल, दि विडो : अ पिक्चर ऑफ मॉडर्न टाइम्स (१७९४), वॉलसिंघम : द प्युपील ऑफ नेचर (१७९७),द फॉल्स फ्रेंड (१७९९), नॅचरल डॉटर विथ पोट्रेट्स ऑफ द लीडनहेड फॅमिली (१७९९) ; नाटक – द लकी एस्केप, ए कॉमिक ऑपेरा (१७७८), केट ऑफ अ‍ॅबर्डीन (१७९३), नोबडी : ए कॉमेडी इन टू अ‍ॅक्ट्स (१७९४), द सिलियनलव्हर : अ ट्रॅजेडी इन फाइव्ह अ‍ॅक्ट्स; कविता – पोएम्स बाय मिसेस  रॉबिन्सन (१७७५), सॅफो आणि फायन (१७७६), कॅप्टिविटी (१७७७), पोएम्स – खंड १,२.(१७९१,९४), मॉडर्न मॅनर्स (१७९३), साईट, द सेव्हर्न ऑफ़ वो ऍण्ड सॉलिट्यूड (१७९३), लिरिकल टेल्स  (१८००) इत्यादी.

एंजेलिना… ही कादंबरी शिष्ट (फॅशनेबल) जगातील आचार आणि विचाराविषयी भाष्य करते. वॉलसिंघम.. या कादंबरीच्या माध्यमातून लेखिका तिचे साहित्यिक जीवन आणि व्यक्तिगत आयुष्य यावर व्यक्त होते. साहित्यिक जगातील स्त्रीच्या स्थानाबद्दल तिने यात उहापोह केला. अ लेटर टू द वुमन ऑफ इंग्लंड आणि द नॅचरल डॉटर  या दोन कलाकृतीतून तिने महिलांच्या भूमिकेवर उदारतेच्या दृष्टीने प्रकाश टाकला आहे. पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांशी कसे वर्तन केले जाते याकडे लक्ष वेधण्याचा तिने प्रयत्न केला आहे. द नॅचरल डॉटर ही तिची आत्मचरित्रात्मक कादंबरी असल्याचा अंदाज येतो. यातील पात्रे तिच्या स्वत: च्या जीवनाची आणि तिच्या आयुष्यातील अनेक टप्प्यांची – अवस्थांची तिच्या आयुष्यात तिला भेटलेल्या व्यक्तींची प्रतीकं आहेत असे भासते. तिच्या कादंबर्‍या तिच्या अपेक्षेइतक्या यशस्वी झाल्या नाहीत. मात्र तिच्या काव्यप्रतिभेने तिला नवी उंची दिली. ती अल्पावधीतच तिच्या कवितांसाठी विख्यात झाली आणि तिला इंग्लिश सॅफो म्हणून गौरविले गेले. कविता निर्मितीची तिची क्षमता तिच्या सॅफो  आणि फायन या कवितांमध्येही स्पष्ट  दिसून येते आणि म्हणूनच प्रेसने तिला इंग्लिश सॅफो हे नाव दिले. या कविता आणि तिच्या साहित्यिक नावात स्पष्ट संबंध निर्माण होऊ शकतो. तिच्या बर्‍याच कविता ह्या प्रेम कविता आहेत. अनेक अभ्यासकांनी असा निष्कर्ष काढला आहे तिच्या कविता प्रिन्स ऑफ वेल्सच्या आणि तिच्या प्रेमाचं प्रतिनिधित्व करतात. रॉबिन्सन हिची केवळ कवितांसाठीच नव्हे तर इतर साहित्य कृतींसाठीही साहित्यिक वर्तुळात प्रशंसा झाली आहे.

संदर्भ :

  • Byrne, Paula., Perdita: The Literary, Theatrical, and Scandalous Life of Mary Robinson, New York: Random House, 2004.