ग्रीन, ग्रेअम : ( २ ऑक्टोबर १९०४ ). इंग्रजी कादंबरीकार, कथाकार, नाटककार आणि पत्रकार म्हणून ओळख असणार्‍या हेन्री ग्रेअम ग्रीन यांचा जन्म बर्कम स्टेड, हेडफोर्टशायर येथे झाला. बर्कमहेड येथे शिक्षण. त्यानंतर लंडन येथे मानसोपचार तज्ञाकडे उपचारासाठी वास्तव्य. बलिओल कॉलेज, ऑक्सफर्ड येथे शिक्षण. १९२६ मध्ये रोमन कॅथॉलिक या धर्मामध्ये धर्मांतर. १९२७ मध्ये विविएन डेरेल-ब्राउनिंगशी विवाह. यानंतर लंडन येथे वास्तव्य. द टाइम्स  या नियतकालिकासाठी कॉपी एडिटर म्हणून १९२६ ते १९३० या काळात कार्यरत.

१९२५ मध्ये प्रकाशित झालेला बाबलिंग एप्रिल  हा कविता संग्रह हे पहिले प्रकाशन. द मॅन वीदिन (१९२९) ही पहिली कादंबरी. या कादंबरीच्या यशानंतर द टाइम्स मधील नोकरी सोडून १९४० पर्यन्त द स्पेक्टॅटर या  नियतकालिकासाठी चित्रपट समीक्षक आणि साहित्य संपादक म्हणून कार्य. १९४० नंतरची तीन दशके मुक्त पत्रकार म्हणून प्रवास आणि कादंबरीसाठी जागांचा, ठिकाणांचा शोध. स्टेबूल ट्रेन (१९३२) ही इंग्लिश खाडी ते इस्तंबूल असा रेल्वे प्रवास दर्शविणारी कादंबरी असून यात योजिलेली पात्रे एकमेकाविरुद्ध उभी राहतात त्याचे चित्रण आहे. यानंतर अ गन फॉर सेल (१९३६) ही कादंबरी प्रकाशित झाली तर १९३८ मध्ये आलेल्या बहुचर्चित द ब्रयन रॉक  ह्या कादंबरीतील मुख्य पात्रं म्हणजे एक गुन्हेगार आहे, जो इंग्लिश सी रिसॉर्टच्या गुन्हेगारी जगतात वावरतो पण ज्याची तीव्रतर अशी भावनिक गुंतवणूक असते. यानंतर द कॉन्फिडेन्शियल एजंट (१९३९), द पॉवर अँड द ग्लोरी ( १९४० ) अर्थात द लेबरिंथ वेज आणि द मिनिस्ट्री ऑफ फिअर (१९४३) या कादंबर्‍या प्रकाशित झाल्या. या सर्व कादंबर्‍यांचे चित्रपट रूपांतर झाले. द लेबरिंथ वेज चे मुख्य सूत्र हे कॅथॉलिक आहे ज्यात चर्चवर बंदी आलेल्या काळात एक ख्रिस्ती धर्मगुरू दक्षिण मेक्सिको मध्ये फिरतो आणि मृत्यूच्या धमक्या मिळाल्यावरही आपले कार्य करण्याचा प्रयत्न करतो.  द थर्ड मॅन (१९४९) ही कादंबरी म्हणजे मुळात कॅरोल रोड यांच्या एका चित्रपटासाठी लिहिलेला स्क्रीनप्ले होय. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ग्रीन यांनी फ्री टाउन, सीएरा लेओनी येथे परदेशी कचेरीत काम केले ज्यावर आधारित वसाहतवादी ब्रिटिश अधिकार्‍याची कथा सांगणारी द हार्ट ऑफ द मॅटर १९४८ मध्ये आली ज्यात पत्नी आणि प्रेयसी या दोघींबद्दल सहानुभूती असणारा हा अधिकारी शेवटी आत्महत्या करतो. जवळ जवळ संत बनू पाहणार्‍या एका धार्मिक स्त्रीच्या प्रेमात पडणार्‍या एका अईश्वरवादी व्यक्तीची कथा सांगणारी द एंड ऑफ द अफेयर  ही कादंबरी १९५१ मध्ये आली. १९६० च्या दशकात आलेल्या ग्रीन यांच्या चार कादंबर्‍या ह्या तिसर्‍या जगाविषयी आणि त्यातील राजकीय घडामोडींविषयी प्रतिपादन करतात. यात अ बर्ण्ट आऊट केस (१९६१) ही एका वास्तुविशारदाची कथा आहे जो बेल्जिअन कांगो येथे त्या वसाहतीला स्वातंत्र्य मिळण्याआधी मरण पावतो तर द क्वाएट अमेरिकन (१९५६) ही कादंबरी १९५० च्या दशकात फ्रेंच विरोधी वातावरण असणार्‍या व्हिएतनाम येथे कार्यरत एका अमेरिकन हेराची कथा आहे. क्युबा येथे घडणारी अवर मॅन इन हवाना  ही कादंबरी १९५८ मध्ये प्रकाशित झाली तर द कॉमेडियन्स (१९६६) ही हैती स्थित फ्राङ्कोईस डुवलियर च्या शासन काळातील कथा आहे. द ऑनररी कॉन्सूल (१९७३), द ह्युमन फॅक्टर (१९७८), मॉन्झिग्नर क्वीझोट (१९८२) आणि द टेंथ मॅन (१९८५) या ग्रीन यांच्या शेवटच्या चार कादंबर्‍या मात्र ती ऊंची गाठू शकल्या नाहीत. त्यांच्या कादंबर्‍यातील व्यक्तिरेखांचे चित्रण विलक्षण असून त्यात वाईटाचे न टाळता येणारे अस्तित्व प्रामुख्याने आहे. धोका, हिंसा आणि शारीरिक हानी यातून पाप आणि नैतिक अध:पतन याकडे ते निर्देश करतात. त्यांच्या कादंबरीतील चिंतेचा मुख्य विषय हा व्यक्तीचा आतला नैतिक आणि आत्मिक झगडा हा आहे. त्यांच्या सुरुवातीच्या कादंबर्‍या या युद्ध आणि हुकुमशाही यांनी ग्रस्त अशा युरोपचे चित्रण करतात तर नंतरच्या कादंबर्‍यांमधून युद्ध, क्रांती आणि इतर राजकीय घडामोडींना सामोरे जाणारे जगातले इतर दूरस्थ प्रदेश आहेत. एक कथाकार म्हणून गोष्ट सांगण्याचे विशिष्ट असे तंत्र ही लेखक म्हणून ग्रीन यांची हातोटी होय, ज्यामुळेच विसाव्या शतकातील सर्वाधिक वाचला गेलेला ब्रिटिश कादंबरीकार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.

कादंबरी खेरीज नाईण्टीन स्टोरीज (१९४७), जो पुढे ट्वेंटीवन स्टोरीज (१९५४) झाला हा कथासंग्रह द लिव्हिंग रूम (१९५२) आणि द पॉटिंग शेड (१९५७) ही नाटके आणि कलेक्टेड एसेज (१९६९) हा निबंध ग्रंथ त्यांच्या नावावर आहे. जीवनातील आठवणी शब्दबद्ध केलेले अ सॉर्ट ऑफ लाईफ (१९७१) आणि वेज टू एस्केप  हे दोन ग्रंथ तसेच चित्रपट समीक्षा असणारे मॉर्निंग्ज इन द डार्क : द ग्रेअम ग्रीन फिल्म रीडर (१९९३) हे वेगळ्या स्वरूपाचे लेखन त्यांच्या नावावर आहे. २००७ मध्ये त्यांच्या पत्रांचे एक पुस्तक ग्रेअम ग्रीन : अ लाईफ इन लेटर्स  प्रकाशित करण्यात आले. हॉथोरल प्राइज, जेम्स टेत ब्लॅक मेमोरिअल प्राइज, शेक्सपियर प्राइज या साहित्यासाठीच्या सन्मानाखेरीज ब्रिटनच्या ऑर्डर ऑफ मेरीटने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या स्मृतीत दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ग्रेअम ग्रीन आंतर्राष्ट्रीय महोत्सव हा एक विशेष समारोह आहे.

संदर्भ :

  • Donaghy, Henry J.,Graham Greene, an Introduction to His Writings, Amsterdam, 1986.