कॉलबेअर, झां बातीस्त : (२९ ऑगस्ट १६१९—६ सप्टेंबर १६८३). प्रसिद्ध फ्रेंच मुत्सद्दी व चौदाव्या लुईचा अर्थमंत्री. रीम्झ येथे एका सधन व्यापारी कुटुंबात त्याचा जन्म झाला. तो १६३९ मध्ये युद्ध खात्याचा सचिव व पुढे १६६५ मध्ये अर्थमंत्री बनला. १६६९ मध्ये आरमाराचे खातेही त्याच्या अखत्यारीत आले.

आपल्या कारकिर्दीत त्याने फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल केले. प्रथम त्याने अनावश्यक कार्यालये बंद करून अंतर्गत खर्चात काटकसर केली; फ्रान्सच्या व्यापारास उत्तेजन देऊन लहानमोठे धंदे सुरू केले व परदेशांशी व्यापार करण्यासाठी अनेक व्यापारी कंपन्या स्थापन केल्या. एवढेच नव्हे, तर त्याकरिता काही वसाहतीही स्थापण्यास त्याने सुरुवात केली. व्यापारवाढीसाठी त्याने काही बंदरे दुरुस्त केली, तर काही नवीन उभारली व आरमार वाढविले. त्याच्या मृत्यूसमयी फ्रान्सजवळ जवळजवळ ३०० युद्धनौका होत्या. त्याने कला व शिक्षण ह्यांसही प्रोत्साहन दिले. विद्वानांना राजाकडून आर्थिक साहाय्य मिळवून देण्याची त्याने व्यवस्था केली; कला व विज्ञान ह्यांच्या अकादमी स्थापन केल्या. तसेच ‘एकोल द रोम’ सारख्या शैक्षणिक संस्था व वेधशाळा सुरू करून संशोधनकार्यास चालना दिली. ह्याशिवाय त्याने एका आयोगाद्वारे फौजदारी व दिवाणी कायद्यांत सुधारणा केल्या आणि दिवाणी कायद्याचे संस्करण केले. तसेच त्याने सागरी व वसाहतविषयक कायद्यांच्या संहिता तयार केल्या. अर्थक्षेत्रातील हा सुधारक व मोठा संघटक पॅरिस येथे मरण पावला.

 

 

संदर्भ :

  • Cole, C. W. Colbert and a Century of French Mercantilism, 2 Vols., London, 1939.