सच्चिदानंद राउतराय : (१३ मे १९१६-२१ ऑगस्ट २००४).भारतीय साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध उडिया लेखक. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे सच्चिदानंद राउतराय हे ओडिया भाषेतील दुसरे साहित्यिक होत.ओडिया काव्य आणि समीक्षा या क्षेत्रात राउतराय यांचे योगदान आहे. विशेषरूपात त्यांनी कवी म्हणून समकालीन साहित्यावर एक खोलवर ठसा उमटवला आहे. राउतराय यांचा जन्म ओडियातील पुरी जिल्ह्यातील खुदी सागानीत येथे झाला. वयाच्या १२ व्या वर्षांपासूनच ते काव्यलेखन करू लागले होते.
आपल्या वडिलांप्रमाणे त्यांना वकील व्हायचे होते. परंतु ब्रिटिश सरकारने त्यांच्या राजकीय हालचाली पाहून एल.एल. बी. किंवा एम. ए.चा अभ्यास करायला परवानगी नाकारली होती. बेकार बसण्यापेक्षा नोकरी करावी म्हणून त्यांनी १९३९ मध्ये कोलकात्याला बिर्ला ग्रुपच्या केशेराम ज्यूट मिलमध्ये नोकरी केली. वेगवेगळ्या खात्यात नोकरी करीत वीस वर्षांनी ते त्या मिलचे कार्यकारी संचालक झाले. पुढे कामगारविषयक बाबींवरून व्यवस्थापनाशी मतभेद झाले आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी कटक येथील ओरिसा गिरणी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले व तेथूनच मग ते निवृत्त झाले. नोकरी करीत असतानाही त्यांचे लेखनकार्य सतत सुरूच होते. त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. पुढे त्यांनी किसान चळवळीतही सक्रिय काम केले. क्रांतिकारी कविता लेखनामुळे त्यांना अडीच महिन्यांची सजा झाली. पण अटक चुकविण्यासाठी ते वर्षभर भूमीगत राहिले. पण त्यांच्या काही कवितांवर ब्रिटिश सरकारने बंदी आणली होती.
कविता, कथा, समीक्षा, संशोधन कार्य अशा विविध प्रकारे लेखनाची साधना करून राउतराय यांनी साहित्याच्या सर्व लेखनप्रकारांवर आपल्या रचना कौशल्याचा ठसा उमटवलेला आहे. सत्य, न्याय, संघर्षमय जीवन, मानवता यांच्या बाजूने त्यांनी सातत्याने लेखन केले आहे.पाथेय (१९३२),पूर्णिमा (१९३३),अभिजान (१९३८), रक्त शिखा (१९३९) बाजी राऊत (१९४२), हांसत (१९४८), कविता (१९६२), एशियार स्वप्न (१९६९) इत्यादी २१ कवितासंग्रह ; चित्रग्रीवा (१९३५) ही कादंबरी; मसानीर फूला (१९४७), माटीर ताज (१९४७), छई (१९४८) हे कथासंग्रह ; साहित्यविचार (१९६२), साहित्यार मूल्यबोध (१९८३) व आधुनिक साहित्यार केतक दिधा (१९८५) इत्यादी समीक्षाग्रंथ अशी त्यांची विपुल साहित्य संपदा प्रसिद्ध आहे.
राउतराय शाळेत शिकत असतानाच वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली. १९३२ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा पाथेय हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाने त्यांच्या काव्यजीवनाचा विकास केला. त्यांच्या पाथेय आणि पाण्डुलिपीतील कवितांनी ओडिया साहित्यात नव्या युगाची सुरुवात केली. बाजी राऊत या दीर्घकवितेने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. बारा वर्षांचा एक नावाडी मुलगा ब्रिटिशांविरुद्ध बंड करतो. ब्रिटिशांच्या रोषाला बळी पडतो व पोलीसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडतो. कवितेतील या रोमहर्षक कहाणीने ओडिशातील तरुण पिढी भारावून गेली. हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी या दीर्घ कवितेचे इंग्रजीत भाषांतर केले. त्यांच्या कवितांची केवळ आपल्या राज्यातीलच नव्हे तर त्याबाहेरील लोकांनाही प्रेरणा दिली.पल्लीश्री (१९४२) या त्यांच्या काव्यसंग्रहातील कवितात ग्रामीण जीवनाचे दर्शन घडते. कविता (१९६२) या संग्रहात त्यांनी कवितेची भूमिका विस्ताराने मांडली आहे. त्यांनी कवितेविषयीचे विचार त्यांच्या काव्यसंग्रहांच्या प्रस्तावनांमधून वेळोवेळी मांडले आहेत. सातत्याने त्यांनी लोकांच्या भाषेत, लोकांसाठी लिहून लोककवी, जनकवी हे बिरुद सार्थ केले. दिगंत या त्रैमासिकाचे संपादक म्हणून राउतराय यांची कामगिरी लक्षणीय आहे. आदर्श समाजाची त्यांची कल्पना त्यांनी दिगंत मधून वेळोवेळी विविध माध्यमातून मांडली आहे. समाजातील प्रत्येक मनुष्य स्वतंत्र आहे, समान आहे व तो सन्मानाने आशावादी जीवन जगतो आहे. अशी त्यांची आदर्श समाजाची धारणा होती. त्यांनी कारकून, दुकानदार, शेतकरी इ. सर्वसामान्य लोकांवर लिहिले. कविता ही लोकांसाठी आहे, ती लोकांची आहे, असे मानून त्यांनी काव्यलेखन केले.
पारंपारिक मतप्रवाहातून बाहेर पडून राउतराय आपली शैली बदलत राहिले. पारंपारिक संकेत, बंधने, शैली यातून त्यांनी ओडिया काव्याला मुक्त केले आणि नवे आधुनिक वळण लावले. त्यांनी ओडिया काव्य अनअलंकृत पण सहजसुंदर बनविले. ओडिया काव्यात जेव्हा कल्पनारम्यतेचा अतिरेक झाला होता व समाजात दिखाऊ शिष्टाचार पाळले जात होते, तेव्हा स्पष्टपणे समाजातील काळी बाजू मांडून, गरीब बहिष्कृत माणसाला भोगाव्या लागणाऱ्या कष्टांचे वर्णन करणारे वास्तववादी काव्य त्यांनी लिहिले. काव्याचे सामाजीकरण केले.आशय व अभिव्यक्ती या दोन्ही बाबतीत त्यांची कविता नवीन आहे. ओडिया काव्यात त्यांनीच प्रथम मुक्तछंदाचा यशस्वी वापर केला. म्हणूनच राउतराय यांना आधुनिक ओडिया कवितेचे भगीरथ व मुक्त छंदाचे पितामह अशा पदव्या प्राप्त झाल्या आहेत.
राउतराय हे काव्यलेखनाइतकेच आपल्या गद्य लेखनासाठीही वाचकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांची एकमेव कादंबरी चित्रगीवा (१९३६) मध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीपासून ओडिया साहित्यात मार्क्सवाद आणि मनोविश्लेषणात्मक लेखनाला सुरुवात झाली. पौराणिक व लोककथांचा आपल्या साहित्यात वापर करीत असतानाच ते त्यांना आधुनिकतेचा पेहराव चढवतात. त्यांच्या कथांमधून ही बाब लक्षात येते. ‘एक उत्तीर्ण श्रावण’ या कथेत येणारा पावसाळा सूचित करताना त्यांनी एका स्थानिक अविवाहित तरुणीचे चित्र रेखाटले आहे. ‘प्रतिमा नाईक’ या कथेत स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या व त्यासाठी खस्ता खाणाऱ्या नायिकेचे वर्णन केले आहे. ‘हट’ ही त्यांची दीर्घकथा तर सामाजिक उपहासात्मक लेखनाचे उत्तम प्रतिक आहे. ढोंगी व बढाईखोर व्यक्तींकडून अंधश्रद्धा, ताईत, गंडादोरा यासारख्या गोष्टींना भुलून जाऊन आशा निराशेच्या गर्तेत बळी पडलेल्या व्यक्तींचे प्रभावी वर्णन या कथेत केले आहे. आपल्या अनेक कथांमधून तसेच आपल्या कादंबरीलेखनातून राउतराय यांनी सिग्मंड फ्राईड व कार्ल युंग यांच्या मनोविश्लेषणात्मक विचारांचा आधार घेऊन आपल्या पात्रांचे मनोविश्लेषण केलेले आहे.
राउतराय यांनी ओडिया साहित्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण असे शोधकार्य केलेले आहे. भारतीय साहित्यातील मूल्य आणि आदर्शांचा विकास या संबंधातील त्यांचे शोधकार्य १९७२ मध्ये प्रकाशित झाले. त्यात त्यांनी पूर्ववैदिक युगापासून, सतराव्या शतकापर्यंत चर्चा केलेली आहे. असामान्य बुद्धिमत्ता व संवेदनशील जाणिवेचा प्रत्यय त्यांच्या टीकात्मक निबंधामध्येही परिणामकारक रीत्या येतो.
ऑल इंडिया पोएट्स कॉन्फरन्स, कोलकाता, ओडिशा साहित्य अकादमी या संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. वेळोवेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय साहित्यिक परिषदांमधून सक्रीय भाग घेऊन भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. फिल्म सेन्सार बोर्डाचेही ते सदस्य होते. ओडिया कला-संस्कृती संग्रहालयाची स्थापना त्यांनी केली आहे . त्यांचे बरेच साहित्य रशियन भाषेत अनुवादित झाले आहे. आंध्र विश्वविद्यालय व बरहामपूर विद्यापीठाने डी.लीट्. देऊन राउतराय यांना सन्मानित केले आहे. भारत सरकारचे पद्मश्री (१९६२), साहित्य अकादमी पुरस्कार (१९६२) तसेच सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार (१९६५) हे सन्मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे भारतीय साहित्याला अमूल्य योगदानासाठी १९८६ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याचे समजताच त्यांनी व्यक्त केलेली, “अशा प्रकारचा पुरस्कार मिळाल्याने कवीच्या अंतप्रेरणा स्फुरण पावतात, असे मला वाटत नाही. कारण कवी हा जन्मावाच लागतो”, ही त्यांची परखड प्रतिक्रिया बोलकी आहे.
कटक येथे त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
संदर्भ : www.veethi.com/india-people/sachidananda_routray-profile-2396-25.htm