सामंतसिंहार, अभिमन्यु : (२३ फेब्रु १७६० — १५ जून १८०७). ओरिसातील कवी. कटक जिल्ह्यातील बलिया या गावी क्षत्रिय कुलात त्याचा जन्म झाला. काव्य आणि युद्धकलेत तो पारंगत होता. वयाच्या नवव्या वर्षी त्याने त्याचे पहिले काव्य रचले होते. आरंभी त्याने वाघाची शिकार, बुलबुलाची शिकार ह्यांसारख्या विषयांवर काव्यरचना केली. प्रौढ वयात मात्र विदग्धचिंतामणी हे प्रसिद्ध काव्य त्याने रचिले. राधा-कृष्ण-प्रेमावर आधारलेल्या गौडीय वैष्णव तत्त्वज्ञानाचा ह्या काव्यास त्याने आधार घेतला. धर्माच्या आवरणाखाली त्यात पुरेपूर विषयलोलुपता दडलेली आढळत असली, तरी तेथील जनमानसावर ह्या काव्याची विलक्षण मोहिनी आहे. प्रेमकला, रासबाती, सुलख्यान, प्रेम तरंगिणी, बाघ गीता, चाढेई गीता, प्रेम चिंतामणी ही त्याची इतर प्रसिद्ध असणारी काव्ये होत. आर्तवल्लभ महांती यांनी ह्या काव्याची आवृत्ती परिश्रमपुर्वक संपादून प्रसिद्ध केली आहे.

संदर्भ :