पाण्यामधील गढूळपणा आणि रसायनांच्या साहाय्याने, तसेच कणसंकलनामुळे उत्पन्न झालेले कण पाण्यापासूल अलग करणे हे निवळणाचे काम आहे. पाण्यापेक्षा जड असणारे कण (उदा., वाळू) गुरुत्वाकर्षणामुळे निवळण टाकीमध्ये सहज खाली बसतात. परंतु रसायनांच्या साहाय्याने आणि कणसंकलनामुळे तयार झालेले कणांचे विशिष्ट गुरुत्व जवळजवळ पाण्याइतकेच असल्यामुळे त्यांना टाकीच्या तळापर्यंत पोहोचण्यास बराच वेळ लागतो.  त्यासाठी साठवण टाकीचा आकार (साठवण काळ) बराच मोठा असावा लागतो.  उदा., वाळू, माती ह्यांसारखे जड पदार्थ सांडपाण्यामधून अलग करण्यास ५ – १५ मिनिटे पुरतात, परंतु जलशुद्धीकरणामध्ये हाच काळ २ तास ते ६ तासांपर्यंत ठेवावा लागतो.

आ. ७ अ. आयताकृती निवळण टाकी

निवळण टाक्यांचे प्रकार : (अ) खंडित प्रकार : ह्यांमध्ये पाणी भरून विशिष्ट काळापर्यंत ठेवले जाते, गाळ तळाशी बसू दिला जातो आणि त्यानंतर निवळलेले पाणी टाकीमधून काढले जाते.

(आ) अखंडित प्रकार : गढूळ पाण्याचा प्रवाह ह्या टाक्यांमध्ये सतत सोडला जातो, त्या प्रवाहाचा वेग टाकीच्या साठवणकाळाशी बांधलेला असतो.  त्यामुळे सतत प्रवाह असला तरी गाळ खाली बसण्यास पुरेसा वेळ मिळतो.  ह्या टाक्यांमधून निवळलेले पाणी वरून आणि गाळ पाण्याच्या दाबाखाली खालून काढला जातो.

आ. ७ ब. गोल निवळण टाकी

(इ) प्राथमिक निवळण टाक्या : कोणत्याही रसायनांच्या मदतीशिवाय फक्त गुरुत्वाकर्षणामुळे गाळ बसविण्याची क्रिया ह्या टाक्यांमध्ये होते.

(ई) रासायनिक मदतीसह निवळण टाक्या : रसायने (किलाटक) वापरून, कणसंकलन करून गाळ तळाशी बसविण्याची क्रिया ह्या टाक्यांमध्ये होते.

(उ) आकाराप्रमाणे : चौरस, आयताकृती, गोल, कणसंकलन मध्यभागी ठेवून त्याच्या बाजूने निवळण टाकी बांधलेली समकेंद्री (concentric) असे.

आ. ८. समकेंद्री कणसंकलन व निवळण टाकी

(ऊ) पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेप्रमाणे : क्षितिजसमांतर, जमिनीशी काटकोन करणारी दिशा, वर्तुळाच्या मध्यांतून परिघाकडे वाहणारे (Central inlet and peripheral outlet).

(ए) जलद निवळक : नलिका निवळक व पट्टिका निवळक अस्तित्वात असलेल्या निवळण टाक्यांची निवळणक्षमता वाढविण्यासाठी ह्यांचा उपयोग होतो, तसेच कमी जागेमध्ये अधिक पाण्याचे शुद्धीकरण करता यावे ह्यासाठी सुद्धा अशा टाक्या वापरतात.

नैसर्गिक पाण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गढूळपणा असेल तर प्रथम ते एका मोठ्या प्राथमिक निवळण टाकीमध्ये साठवतात. त्याच्यामधील गढूळपणा कमी करून मग ते किलाटन व कणसंकलन ह्यांच्या साहाय्याने अधिक स्वच्छ करून घेतात. ह्यामुळे किलाटकाची मात्रा कमी असली तरी चालते, तसेच निवळणानंतर केल्या जाणाऱ्या निस्यंदनाच्या प्रक्रियेवर ताण पडत नाही.

आ. ८अ. गोल निवळक टाकी (आडवा काटच्छेद)

गाळाची विल्हेवाट  : प्रगत देशांमध्ये गाळाची विल्हेवाट पुढीलप्रमाणे करतात : (१) घरगुती सांडपाण्यामध्ये मिसळणे, (२) कृत्रिम तळ्यांमध्ये साठविणे, (३) यांत्रिक पद्धतीने गाळामधील पाण्याचे प्रमाण कमी करणे, (४) ओझोन वायू वापरून गाळ निर्जंतुक करणे, (५) गोठविणे आणि (६) गाळाचे पुनर्चक्रीकरण करणे.  गाळामधील पाण्याचे प्रमाण कमी केल्यामुळे त्याचे आकारमान खूप कमी होते आणि तो हाताळणे सोपे होते.  घरगुती सांडपाण्यामध्ये हा गाळ मिसळल्यामुळे सांडपाण्यामधील फॉस्फेटचे प्रमाण कमी होते.  तसेच जलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये मिसळल्यामुळे गाळामधील रासायनिक प्रक्रिया न झालेल्या किलाटकांचा कणसंकलनासाठी पुन्हा उपयोग करून घेता येतो.

आ. ८ब. गोल निवळण टाकी (उभा काटच्छेद)

खूप मोठी  शुद्धीकरणक्षमता (१०० दशलक्ष लिटर दर दिवशी आणि त्याहून अधिक) असणाऱ्या केंद्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या किलाटकांचे प्रमाण खूप असल्यामुळे त्यांची पुनर्प्राप्ती करणे किफायतशीर होऊ शकते. त्यासाठी (अ) आम्ल पुनर्प्राप्ती पद्धत  किंवा (आ) क्षारीय पुनर्प्राप्ती पद्धत किंवा (इ) द्रव आयन विनिमय प्रक्रिया वापरली जाते.  ह्या पद्धतींचा उपयोग विशेषतः तुरटीच्या पुनर्प्राप्तीसाठी होतो.  तसेच हा गाळ पुढील कामासाठी वापरता येतो : (१) चिनी मातीची भांडी तयार करणे, (२) बांधकामासाठी विटा बनविणे, ३) रस्तेबांधणीच्या कामामध्ये वापरणे, ४) उत्तापसही विटा घडविणे, ५) शेतामध्ये पसरून मातीची जलधारणक्षमता बदलणे.

प्लवन (तरण) : पाण्यापेक्षा हलके पदार्थ उदा., तेल काढून टाकण्यास प्लवन ह्या प्रक्रियेचा उपयोग होतो.  असे पदार्थ निवळून खाली बसविता येत नाहीत, म्हणून पाण्याच्या टाकीच्या तळाशी हवेचे सूक्ष्म बुडबुडे सोडून त्यांना पाण्याच्या पृष्ठभागावर आणावे लागते. हवेच्या बुडबुड्यांची प्लवनशक्ती येथे उपयोगी पडते.

किलाटन, कणसंकलन आणि निवळण केल्यामुळे पाण्यामधील गढूळपणा आणि आलंबित आणि कलिल पदार्थांचे प्रमाण कमी होऊन पाणी पुढील प्रक्रियेसाठी – निस्यंदनासाठी योग्य होते.

संदर्भ :

  1. Journal of the Institution of Public Health Engineers, India Vol. 2004 P. 5. Vol. P.20, Vol. 2015-16, P. 39, P. 5; Vol. 2014-15, P. 21; Vol. 2012-13, P. 50.

 

समीक्षक : विनायक सूर्यवंशी