चौधरी, जनरल जयंतनाथ : (१० जून १९०८—६ एप्रिल १९८६). भारताचे माजी भूसेनाप्रमुख. जन्म कलकत्ता येथे. शिक्षण कलकत्ता व लंडन येथे. सँडहर्स्ट (इंग्लंड) येथे लष्करी शिक्षण. १९२८ मध्ये लष्करात कमिशन. नंतर नॉर्थ स्टॅफर्डशर रेजिमेंटच्या पहिल्या पलटणीत लष्करी अनुभव घेतल्यानंतर ते भारतीय सातव्या रिसाल्यात (सेव्हंथ कॅव्हल्‌री) कामावर रुजू झाले. १९४० मध्ये क्वेट्टा येथील स्टाफ कॉलेजमध्ये त्यांनी उच्च लष्करी शिक्षण घेतले. दुसऱ्या महायुद्धात पाचव्या भारतीय डिव्हिजनमधून आफ्रिकेतील युद्धात त्यांनी भाग घेतला. त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘ऑर्डर ऑफ ब्रिटिश एंपायर ’ हा सन्मान लाभला. ऑगस्ट १९४४ मध्ये सोळाव्या घोडदळ रिसाल्याचे ते मुख्याधिपती झाले. त्यांनी जपानविरुद्धच्या युद्धातही बहुमोल कार्य केले. रंगूनवरील स्वारीतदेखील त्यांनी भाग घेतला. तसेच इंडोचायना आणि जावातही लष्करी कामगिरी केली. १९४६ मध्ये ते ब्रिगेडियर होऊन १९४७ मध्ये त्यांनी इंग्लंडमधील इंपीरियल डिफेन्स कॉलेजमध्ये अत्युच्च सैनिकी शिक्षण घेतले. १९४८ मध्ये मेजर जनरल होऊन ते पहिल्या चिलखती डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग झाले. १९४८ मध्ये पहिल्या चिलखती डिव्हिजनने निजामविरुद्ध झालेल्या ‘पोलो’ मोहिमेत महत्त्वाचे कार्य केले. या पोलीस कारवाईनंतर ते तथाकथित हैदराबाद संस्थानचे लष्करी गव्हर्नर म्हणून नियुक्त झाले. १९५३ मध्ये ते सैनिकीय सर्वोच्च कार्यालयात जनरल स्टाफचे प्रमुख होते. १९५५ मध्ये त्यांना लेफ्टनंट जनरल श्रेणी मिळून एका सैनिकी कोअरचे ते प्रमुख सेनापती झाले. १९५८ मध्ये चीनला गेलेल्या लष्करी शिष्टमंडळाचे नेते; १९६१ डिसेंबरमध्ये झालेल्या गोवा मुक्तिसंग्रामाचे प्रमुख व सदर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग प्रमुख या नात्यानेही त्यांनी कार्य केले. २० नोव्हेंबर १९६२ रोजी ते भारतीय लष्कराचे सेनाध्यक्ष झाले. त्यांच्या आधिपत्याखाली १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सेनेने यश मिळविले होते. ७ जून १९६६ रोजी ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते कॅनडात भारतीय उच्चायुक्त होते. लष्करी नोकरीत असताना टोपणनावाखाली स्टेट्समन वर्तमानपत्रात लिखाण केल्याबद्दल त्यांच्याविषयी लोकसभेत चर्चा झाली. कॅनडातील मॅक्‌गिल विद्यापीठात सैनिकी इतिहासाचे अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. जनरल चौधरी संगीतप्रेमी होते. इंडियन एक्सप्रेसचे सैनिकी प्रतिनिधी म्हणून नियमित लेखनही ते करीत. त्यांची आतापर्यंत ऑपरेशन पोलो; आर्म्स : एम्स अँड ॲस्पेक्ट्स (१९६६) ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ईजिप्तचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष नासर यांनी ग्रँड कॉर्डन ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिट, भारत शासनाने पद्मविभूषण व नेपाळच्या नरेशांनी जनरल म्हणून त्यांना सन्मानित केले आहे.

नवी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Narayan, B. K. General J. N. Chaudhuri : An Autobiography, Delhi, 1978.