पवार, गो. मा. : (१३ मे १९३२-१६ एप्रिल २०१९). गोपाळ मारुतीराव पवार. महाराष्ट्रातील ख्यातनाम समीक्षक आणि समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्याचे व्यासंगी संशोधक. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील पानगाव (ता.बार्शी) या गावी झाला.त्यांचे शालेय शिक्षण नरखेड (ता.मोहोळ) तर माध्यमिक शिक्षण सोलापूर येथील हरिभाई देवकरण प्रशाला येथे झाले. पुण्याच्या स.प.महाविद्यालयातून बी.ए. (१९५५) तर पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण (एम.ए. १९५८) त्यांनी पूर्ण केले.
वा. ल. कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना विनोदाचा औपपत्तिक विचार या विषयावर मराठावाडा विद्यापीठाची, (आताचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद) पीएच. डी. पदवी प्राप्त झाली (१९७६). विदर्भ महाविद्यालय,अमरावती ( १९५९-६० ), शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय,औरंगाबाद (१९६०-६८), मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद (१९६८-७९) येथे अधिव्याख्याता आणि प्रपाठक म्हणून त्यांनी काम केले. १९७९ ते १९९२ या काळात ते कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. साहित्य अकादमीच्या मराठी भाषा सल्लागार मंडळाचे ते दहा वर्षे समन्वयक होते. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, विद्यापीठ अनुदान आयोग व इतरही संस्थांवर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला .
विवेकनिष्ठ जीवनदृष्टी (१९६६), साहित्यमूल्य आणि अभिरुची (१९९४), विनोदः तत्त्व आणि स्वरूप (२००६), मराठी विनोद विविध आविष्काररूपे (२०१५),सुहृद आणि संस्मरणे,(२०१७),व्यंकटेश माडगूळकर साहित्य आणि व्यक्तित्व (२०११), हे त्यांचे ग्रंथ होत तर ओझं – दलित जीवनावरील कथा : व्यंकटेश माडगूळकर (१९८६), मराठी साहित्य प्रेरणा व स्वरूप : १९५० – ७५, (सहसंपादक – म. द. हातकणंलेकर,१९८७), वेचक बंडू : गंगाधर गाडगीळ (१९९०), निवडक फिरक्या : गंगाधर गाडगीळ (१९९५), निवडक मराठी समीक्षा (सहसंपादक – म . द . हातकणलेकर,१९९९) ही त्यांची संपादने आहेत.
गो . मा . पवार यांचे महाविद्यालयीन व पदव्युत्तर शिक्षणकाळात त्यांचा वावर हा समाजशील मित्रांशी व ज्येष्ठांशी होता.याच काळात त्यांचा समाज प्रबोधन संस्थेशी संबंध आला.या संस्थेसाठी त्यांनी विवेकनिष्ठ जीवनदृष्टी (१९६६) हे वैचारिक स्वरूपाचे पुस्तक लिहिले. अ. भि. शहा, दि. के.बेडेकर,पन्नालाल सुराणा, वसंत पळशीकर, मे.पु.रेगे, रा.भा.पाटणकर यांच्याबरोबरच्या स्नेहभावाने त्यांच्यातील आरंभकाळातील विचारविश्वाची घडण झाली. या सामाजिक वातावरणाचा निश्चितच त्यांच्या समीक्षेवर परिणाम झाला. त्यांच्या प्रत्येक लेखात स्वतंत्र विश्लेषक असा विचार असतो.साहित्य स्वरूपाचा अत्यंत काटेकोर,वस्तुनिष्ठ भूमिकेतूनच त्यांनी विचार केला. रूपकात्मक कविता (१९६२) हा त्यांचा पहिला समीक्षालेख.साहित्यमूल्य आणि अभिरुची (१९९४) या ग्रंथात त्यांची आरंभकाळातील समीक्षा समाविष्ट आहे.
ऐंशीच्या दशकारंभी त्यांनी तुज आहे तुजपाशी (पु.ल.देशपांडे),रायगडाला जेव्हा जाग येते (वसंत कानेटकर) तसेच गारंबीचा बापू,ऑक्टोपस (श्री. ना. पेंडसे) या साहित्यकृतीवर अतिशय परखड असे लेख लिहिले.त्यांच्या समीक्षाविचारात अभिरुची विचाराला नेहमीच केंद्रीय स्थान होते. वर उल्लेख केलेल्या साहित्यकृती रंजनपर, परंपरानिष्ठ मूल्यांच्या चौकटी सांभाळणाऱ्या आणि मध्यमवर्गीय अभिरुचीला शरण जाणाऱ्या साहित्यकृती आहेत असा विचार त्यांनी मांडला. श्री. ना. पेंडसे यांच्या कादंबऱ्या दिवास्वप्नाच्या स्वरूपाच्या,उच्च मध्यमवर्गीय समूहाच्या कामविकाराचे रंजक चित्रण करणाऱ्या, एकसुरी दीर्घकथेच्या स्वरूपाच्या असल्याचे त्यांनी नोंदविले. मराठी वाङ्मयाच्या वाढत्या विस्तारात त्यांनी अभिरुचिसंघर्षाच्या टकरावाचे स्वरूप शोधले.लेखक आणि वाचकपक्ष्यी अभिरूचीचे सामाजिक आयाम शोधले. प्राचीन कवितेपासून ते आजच्या साहित्यातील अभिरुची द्वंद त्यांच्या लेखनात दिसून येते. ग्रामीण आणि नागर, जुने आणि नवे , पारंपरिक आणि आधुनिकता या दृष्टिकोणाधारे त्यांनी वाङ्मयाभिरुचीचा विचार केला. वि. स. खांडेकरांच्या वाङ्मयातील ध्येयवाद, आदर्शवादी भूमिका, भारतीयत्व,लोकप्रिय अलंकरण शैली व वाचकांच्या हृदयाला हात घालण्याच्या सामर्थ्यामुळे वाचकमनाला आवाहन मिळाले अशी खांडेकरी वाङ्मयाच्या लोकप्रियतेची मीमांसा त्यांनी केली, वाङ्मयीन संस्कृतीतील अभिरुची संघर्षामुळे नव्या लेखकांचे यथार्थ आकलन झाले नसल्याचे सांगून गो. मा. पवार यांनी भाऊ पाध्ये,भालचंद्र नेमाडे यांच्या वाङ्मयाचे महत्त्व व सामर्थ्यस्थळे अधोरेखित केली. भाऊ पाध्ये यांच्या साहित्यातील नवनैतिकतेचे स्वरूप, मध्यमवर्गीयांचा उथळपणा,अनुत्कट शैली तसेच भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्यातील महाराष्ट्र समाजदर्शन, समूहटीका व उपरोधभाव आणि सौंदर्यपरिनिर्माणक कल्पनाचे आकलन मराठी वाइमयविश्वाला झाले नसल्यामुळे लेखक-वाचक व समीक्षकांत दुरावा निर्माण झाल्याचे ते सांगतात. साहित्य आणि सामाजिकता यातील आंतरसंबंधाबद्दल त्यांना विशेष आस्था होती.या दृष्टिकोणाचा त्यांच्या समीक्षेवर मोठा प्रभाव होता. स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी वाङ्मयाची पाहणी त्यांनी सामाजिकतेच्या संदर्भात केली. लेखकाची जडणघडण, त्याचा मनःपिंड, निर्मितिप्रेरणा, भाषा व अभिरुचीचा त्यांनी समाजसंदर्भात विचार केला. १९६० नंतरचे समाज बदल व विकेंद्रीकरणामुळे मराठी वाङ्मयाच्या कक्षा विस्तारल्यामुळे नव्या अनुभवाच्या वाङ्मयीन गुणवत्तेचे साहित्य आले. याचा त्यांनी पुरस्कार केला. साहित्याचे स्वरूप हे व्यापक भूमिकेवरून समजून घेतले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. दलित साहित्याच्या सामाजिक, सांस्कृतिक फलश्रुतीची त्यांनी रास्त अशी दखल घेतली.
त्यांची कथासमीक्षाही तिच्यातील नव्या आकलनामुळे मौलिक ठरते. व्यंकटेश माडगूळकरांच्या कथावाङ्ममयाचा आवाका, त्यांचे मानव व मानवेतर जगाचे आकलन, निसर्ग, प्रदेशाचे भान व देशी जाणिवांची सखोल मीमांसा त्यांनी केली. माडगूळकरांच्या कथेतील दलित विद्रोहात्म जाणिवेचे त्यांनी केलेले निवडक कथासंपादन (ओझं..) वैशिष्टपूर्ण ठरले. कथावाङ्मयातील बदलत्या कथारूपाची व वाङ्ममयीन गुणवत्तेची सखोल मीमांसा त्यांनी केली. साहित्यस्वरूपाबद्दल सुस्पष्ट भूमिका ,वाङ्मयाचा जीवनसंबंद्ध विचार, वास्तवता, नवी नैतिकता, आधुनिकता या मूल्यांना त्यांच्या समीक्षत स्थान आहे. साहित्यातील जीवनदर्शनाबरोबरच कलात्मकतेकडेही ते वारंवार लक्ष वेधतात. मराठी लेखकांचे परंपराप्रेम आणि जीवनविन्मुखतेबद्दलची खंत त्यांनी वारंवार व्यक्त केली.
गो. मा. पवार यांच्या समीक्षालेखनाचा महत्त्वाचा विशेष म्हणजे त्यांची तात्त्विक स्वरूपाची समीक्षा, नाटकाच्या संदर्भात त्यांनी सुखान्तिकेची संकल्पना मांडली. विनोद – तत्व आणि स्वरूप या ग्रंथात त्यांनी विनोदात्म वाङ्मयाचा संकल्पनात्मक नकाशा मांडला. प्लेटो,ॲरिस्टॉटल,हॉब्ज,ऑर्थर कोस्लर, बर्गसाँ तसेच भरतमुनी ते न.चि.केळकर या पाश्चात्य व भारतीय साहित्यशास्त्रज्ञांनी मांडलेल्या उपपत्तीच्या आधारे त्यांनी नवा विनोदविषयक सिद्धांत मांडला.व्यंगकल्पना,अभिव्यक्तिवैशिष्ट्ये, क्रीडावृत्ती, हास्यमीमांसा व चैतन्यतत्त्वाशी संबंधीत विविध उपपत्ती मांडून विनोदाची संकल्पना मांडली. संकल्पनात्मक लेखनाबरोबरच त्यांची मराठी विनोदी वाङ्मयाची समीक्षा मराठी विनोद – विविध आविष्काररूपे या ग्रंथात समाविष्ट आहे. चक्रधर, तुकारामांच्या विनोदापासून आधुनिक मराठी वाङ्मयातील विनोदी वाङ्मयाची त्यांनी मौलिक अशी समीक्षा केली. लीळाचरित्रातील व तुकारामांच्या जीवनसंबंद्ध विनोदात्म वाङ्मयाचा वारसा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व चिं. वि.जोशी यांनी चालवला, जीवनाभिमुख व मूल्यनिष्ठ विनोदाचा वारसा स्वातंत्र्यानंतर लोप पावल्याचे त्यांनी नमूद केले. गो . मा . पवार यांनी केलेली ही विनोदी वाङ्मयाची संकल्पनात्मक मांडणी केवळ मराठीच नव्हे तर भारतीय पातळीवर देखील अपवादभूत अशी आहे. त्यांच्या या लेखनामुळे विनोदी वाङ्मयाच्या काव्यशास्त्राचे नवे दालन उघडले गेले आहे असे सुधीर रसाळ यांनी म्हटले ते रास्तच आहे.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवनकार्यावरील संशोधन हा गो. मा. पवार यांच्या आयुष्याचा ध्यास होता. सत्तरच्या दशकात ते या संशोधानाकडे वळले. महर्षी शिंदे यांच्या जीवनकार्यासंबंधी त्यांनी अफाट अशी साधनसामग्री भारतातूनच नव्हे तर परदेशातून देखील मिळवली. महर्षी शिंदे यांच्या कार्यावर जवळपास छोटी – मोठी दहा पुस्तके त्यांनी लिहिली, ती पुढीलप्रमाणे – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( राष्ट्रीय चरित्रमाला,१९९० ) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( भारतीय साहित्याचे निर्मात, साहित्य अकादमी, २०००), महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( कुमार वाचकांसाठी ,२००४ ), महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन आणि कार्य (बृहतचरित्र,२००६), निवडक विठ्ठल रामजी शिंदे , (१९९९), महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्मय खंड-१ ( २००९ ), खंड-२ (२०१६). या ग्रंथांशिवाय विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न ह्या प्रबंधाचे आणि रोजनिशीचे त्यांनी संपादन केले आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य या बृहत चरित्रग्रंथास साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासात दुर्लक्षिलेल्या महषींच्या कार्याचा संगतवार व्यापक पट त्यांच्या या संशोधनामुळे उपलब्ध झाला.मराठी चरित्रवाङ्मयाला व विचारविश्वाला समृद्ध करणारा हा चरित्रग्रंथ होय. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्याचा व विचारविश्वाचा सांगोपांग धांडोळा घेणारा लेखनऐवज यामुळे प्राप्त झाला. ही त्यांची मराठी विचारविश्वातील मोठी उपलब्धी आहे
गो.मा.पवार यांचे व्यक्तिविषयक लेखन सुहृद आणि संस्मरणे या लेखसंग्रहात समाविष्ट आहे. पवार यांच्या अनेक ग्रंथांचे इंग्रजी, कन्नड भाषांत अनुवाद झाले आहेत. त्यांना साहित्य अकादेमी पुरस्कारासह महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार, महाराष्ट्र फांऊडेशन, दमाणी पुरस्कार तसेच सोलापूर विद्यापीठाच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. १९७० नंतरच्या समीक्षापरंपरेत गो.मा. पवार यांची समीक्षा मौलिक आणि महत्वाची ठरते.तात्त्विक आणि उपयोजित समीक्षापरंपरेत मोलाची भर या समीक्षेने घातली आहे. जीवनसंबंद्ध समीक्षाविचार, सामाजिक दृष्टिकोण, वाङ्मयाभिरूची संबंधीचा नवा विचार ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट होत. वाङ्मयीन परंपरेचे भान, साहित्यस्वरूपाबद्दल व्यापक भूमिका, सुसंगत आणि सुस्पष्ट विचार ही त्यांच्या लेखनाची काही वैशिष्ट्ये. पवार यांची विनोदी वाङ्मयाची समीक्षा आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच संशोधन हा महाराष्ट्राच्या विचारविश्वातला महत्त्वाचा टप्पा आहे.
सोलापूर येथे अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.
संदर्भ : गणोरकर प्रभा ; टाकळकर उषा आणि सहलेखक,संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (१९२०-२००३),जी.आर. भटकळ फाउन्डेशन, मुंबई, २००४.